
Womens Day Special : वयाच्या 22 व्या वर्षी गर्भाशय काढले जाते आणि ती बनते परमनंट ऊसतोड मजूर!
आज सहजच एका शेजाऱ्यांच्या कार्यक्रमाला जाणं झालं. तिथं नटलेल्या महिला एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत होत्या. बारशाचा कार्यक्रम असल्याने बाळाला पाळण्यात घातलं आणि लगेचच जेवणाची पंगंत सुरू झाली. पहिल्या पंगतीत काय माझा नंबर लागला नाही. म्हणून वाट पाहत बसले. सोबत सासूबाईही होत्या. त्याही मग टाईमपास म्हणून मोबाईल पाहत बसल्या.
कार्यक्रम मोकळ्या जागेत होता. त्यामूळं तिथं बाजूलाच असलेल्या शेती होती. शेतात ऊसतोडणी सुरू होती. ऊसतोड कामगारांची पोरं झाडाखाली खेळत होती. अधून मधून येणाऱ्या गाड्यांच्या आवाजाकडे आकर्षित होत होती. तर, ऊस भरायला थांबलेल्या ट्रॅक्टरवर मोठ-मोठ्याने गाणी सुरू होती. गाणं लागताच पोरं उठायची अन् नाचायची गाणं थांबली की मातीत लोळायची.
हे असं त्यांचं सुरू होतं आणि मी त्यांचं निरीक्षण करत बसले. तेवढ्यात त्या जवळच्या झाडाखाली एक ऊसतोड करणारी महिला येऊन बसली. अंगाने सडपातळ, रंगाने सावळी, उभ्या चेहऱ्याची. लांब नाकात नथ अन गळ्यात काळं मणी एवढीच आभुषणे. घामाचे डबडबलेली ती झाडाखाली येऊन बसली.
मीही तिला पाणी देऊ का विचारलं आणि तिच्याशी बोलू लागले. ती बार्शीकडच्या गावातली. तिचं बालपण, तरूणपण ऊसतोड करण्यातच गेलं. आताही वयाच्या चाळीशीतही ती तेच काम करतेय. तीच तिच्या कामाबद्दल सांगू लागली. पहाटे चारला झोपडीच्या बाजूलाच दगड ठेऊन त्यावर बसून अंघोळ करायची. भाकऱ्या बडवायच्या त्या बांधून घ्यायच्या आणि शेताच्या वाटेला लागायाचं. सोबत असलेली तान्ही बाळ, पोर यांना उठवून, कधी अर्ध झोपेत असलेल्यांना कडेवर घेऊन जायचं.

जिथ तोडणी असेल तिथ पोरांना झोपवून कामाला लागायचं. कधी नवरा पुढं जाऊन ऊस तोडून ठेवतो त्याच्या मोळ्या बांधांयचं काम वाट्याला येतं तर कधी स्वत: कोयता घेऊन रानात राबावं लागतं. दुपारपर्यंत बांधलेल्या मोळ्या घेऊन त्या ट्रकमध्ये चढवायच्या. दिवसा एक आणि रात्री एक असं दिवसाला दोन ट्रक भरावे लागतात. बैलगाडी असेल तर दिवसभरात गाडीच्या अनेक खेपा कारखान्यावर होतात. कधीकधी बैलांचे नेपथ्य कराले लागते.तर कधी बैलाच्या बरोबरीनं खांदा द्यावा लागतो.
हे झालं कामाचं, पण ८ तास काम करून रात्री आराम करणाऱ्यांना आमची व्यथा कळत नाही. हेच दुख: आहे. लोक आम्हाला गृहीत धरतात. आम्ही कामासाठीच आहोत त्यामूळे सहा महिने आजिबातच आराम न करता मुकादम सांगेल त्यावेळी काम करावं लागतं.
या सहा महिन्याच्या काळात या ऊसतोड मजूरांना उघड्यावर रहावं लागतं. त्यांच्या शौचालयाची अंघोळीची गैरसोय होते. पण, जेव्हा त्यांना मासिक पाळी येते तेव्हा काय? मासिक पाळीच्या दिवसात कापड वापरणं आणि जेव्हा झोपडीत परत जाईल तेव्हा ते धुवून टाकणं हीच काय ती आमची स्वच्छता, अशी ती म्हणाली.
आमच्यात ऊसतोडकामगार परिवारामध्ये कमीत कमी चौदा व जास्तीत जास्त १७ व्या वर्षी मुलींचे लग्न होते. लग्नानंतर ती ऊसतोडीच्या कामाला जुंपली जाते. कारण मुकादमा कडून पैसे घेऊनच लग्न केले असते. किंवा ऊसतोड मुकादम लग्नासाठी आवर्जून पैसे देतात. ज्या मुकादमाने पैसे दिलेले असतात. त्या मुकादमाच्या सोबतच ऊसतोडीला जावे लागते.
सोळा-सतराव्या वर्षी लग्न, वीस वर्षांपर्यंत दोन-तीन मुले होतात आणि बाविसाव्या वर्षी गर्भाशयाचा रोग होतो आणि मग डॉक्टरच्या सल्ल्याने गर्भाशय काढले जाते. आणि त्या स्त्रीला परमनन्ट ऊसतोड मजूर केले जाते. बाईला ऊसतोडीला घेऊन जाताना तिची मासिक पाळी आणि तिची गर्भारपण या दोन गोष्टी अडचणीच्या असतात. गर्भाशयाचे ऑपरेशन करून ती अडचण कायमची दूर केली जाते. ऊसतोडीला जाणाऱ्या १०० महिलांपैकी ८० ते ८५ टक्के महिलांचे गर्भाशय बाविसाव्या वर्षीच काढले जाते.
बीड जिल्ह्यात गर्भपात करण्याचा एक विशिष्ट कालावधी आहे. या काळात जास्त गर्भपात होतात. त्याचा अभ्यास केला असता ऊसतोडीला जाण्याच्या हंगामाच्या सुरुवातीला हे गर्भपात जास्त होतात असं लक्षात येते. म्हणजे ऊसतोडीला जायच्या वेळी जर बाई गरोदर असेल तर तिचा गर्भ तपासला जातो आणि गर्भ मुलीचा असेल तर गर्भपात करून त्या बाईला मोकळं करून ऊसतोडीला घेऊन जातात.
पाळीच्या काळात स्वच्छता न केल्याने महिलांना योनी मुखाचा संसर्ग वाढून पांढरा पदर, लाल पदर सुरू होतो. हा आजार पराकोटीला जाऊन शरिरावर त्याचे परिणाम दिसायला लागल्याशिवाय बाई या आजारासंबंधी कुणालाही बाहेर सांगत नाही. डोकं दुखणे, चक्कर येणे, हातपायाला मुंग्या येणे, इथपासून सुरु झालेले हे आजार पुढे पुढे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापर्यंत पोहोचतात. मग त्या बाईला आणि घरच्यालाही असं वाटत की ती आजारी आहे.
बाई अंथरूणाला पडल्याशिवाय ती आजारी आहे. हे कुणाला वाटतच नाही. ऊसतोडीच्या महिलेला अंथरूणावरही पडून चालत नाही. कारण काम बुडाले की अनामत अंगावर राहते आणि पुन्हा ऊसतोडीच्या कामात अडकून राहावे लागते.
बाई अंथरूणाला पडल्याशिवाय ती आजारी आहे. हे कुणाला वाटतच नाही. ऊसतोडीच्या महिलेला अंथरूणावरही पडून चालत नाही. कारण काम बुडाले की अनामत अंगावर राहते आणि पुन्हा ऊसतोडीच्या कामात अडकून राहावे लागते. ऊसतोडकामगार महिलांच्या लैगिंक शोषणा संबंधी किंवा लैंगिक जीवनासंबंधी बोलल्यास त्याही फारशा तयार नसतात. जिथे पोटाचीच खळगी भरलेली नसते तिथे लैंगिकतेसंबंधी बोलणे त्यांना आवडत नाही किंवा परवडल्यासारखे सुद्धा नाही.
खरंच या महिलांच्या आरोग्याच्या समस्या आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या आहेत. तरीही त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं असं वाटतंय. त्या महिला ज्या कारखान्यावर कामाला असतात, त्यांनी किमान त्यांच्या शौचालय आणि स्वच्छतागृहांची सोय करावी. ऊसतोड कामगारांच्या पोरांसाठी साखर शाळा असतात पण महिलांसाठी सोयी नाहीत. त्यांना सॅनिटरी पॅड, स्वच्छता किट पुरवावेत ज्यामूळे त्यांना त्याची सवय लागेल आणि पैशांचा विचार न करता त्याही सॅनिटरी पॅड विकत घेऊन घालतील.
जेव्हा तिला मी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा ती सहजच बोलून गेली. महिला असणे आमच्यासाठी शाप आहे, ना आमचे आरोग्य चांगले ना काम. मग आम्ही महिला होऊन काय कमावलं. अपार कष्ट असत्यात बाईमाणसाच्या आयुष्यात. पुरूष फक्त काम करतो अन् झोपतो. त्याच्या वाट्याला बाळंतपण, किरेटीन नसतंय. ते भोगत आम्ही कामही करायचं. त्यामूळं बाईचा जलम लय वाईट ग पोरी!