FILM REVIEW : आत्मविश्वासू आणि जिद्दी 'शंकुतलादेवी'चा प्रेरणादायी प्रवास... 

संतोष भिंगार्डे
Friday, 31 July 2020

या चित्रपटात शकुंतला देवीची भूमिका विद्या बालनने साकारली आहे आणि तिच्या मुलीची अर्थात अनुपमा बॅनर्जीची भूमिका सन्या मल्होत्राने केली आहे. शकुंतला देवीच्या जावयाची भूमिका अमित सादने केली आहे

मुंबई : सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिकचा ट्रेण्ड चांगलाच रुजलेला आहे. एकापाठोपाठ एक बायोपिक येत आहेत आणि प्रेक्षक त्यांचे चांगले स्वागत करीत आहेत. केवळ प्रसिद्ध कलाकार, खेळाडू किंवा राजकीय व्यक्तींचेच बायोपिक येत आहेत असे काही नाही तर समाजातील अन्य मान्यवर व्यक्तींवरही बायोपिक बनविले जात आहेत. गेल्या वर्षी आनंद कुमार यांचा बायोपिक 'सुपर 30' आला होता. त्यामध्ये हृतीक रोशनने आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली होती. आनंद कुमार हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते आणि त्यंचा एकूणच खडतर असा जीवनप्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला होता. आता मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवीवर चित्रपट आला आहे- 'शकुंतला देवी.' 

औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

या चित्रपटात शकुंतला देवीची भूमिका विद्या बालनने साकारली आहे आणि तिच्या मुलीची अर्थात अनुपमा बॅनर्जीची भूमिका सन्या मल्होत्राने केली आहे. शकुंतला देवीच्या जावयाची भूमिका अमित सादने केली आहे. बंगळूर येथे 4 नोव्हेंबर 1939 मध्ये एका पुराणमतवादी ब्राह्मण कुटुंबात शकुंतला देवीचा जन्म झाला. शकुंतला देवीची बुद्धिमत्ता अफाट होती. कोणतेही गणित ती चुटकीसरशी सोडवायची. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिने आकड्यांशी खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या आठव्या वर्षांपासून ती कठिणातील कठीण गणित काही क्षणात सोडवायची. मात्र योग्य शिक्षण काही तिला घेता आले नाही. वयाच्या पंधराव्या वर्षी ती लंडनला गेली आणि तेथून तिचा जो प्रवास सुरू झाला तो कधी थांबलाच नाही. 

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...​

एखाद्या मशीनपेक्षाही जास्त वेगाने ती आकडेमोड करायची. तिची ही हुशारी पाहून अनेक जण आश्चर्यचकित व्हायचे. काही जणांनी तिची परीक्षाही घेतली पण तिने त्यांनाही आपल्या आकडेमोडीने चकित केले. जगभर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड'नेही तिच्या गुणवत्तेचीआणि हुशारीची दखल घेतली. सगळ्यात जलद आकडमोड करणारी मानवी संगणक असा तिचा गौरव केला. तिने काही अंकगणिताच्या पुस्तकांचे लेखनही केले आहे. शकुंतला देवी ही स्वतंत्र विचारांची आणि स्वतःचे जीवन मोठ्या हौसेने जगणारी होती. तसेच जिद्दी अशी महिला होती. 

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

दिग्दर्शिका अनू मेननने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तिने शकुंतला देवीचा हा प्रवास उत्तम रेखाटला आहे. शकुंतला देवी ही मानवी संगणक म्हणून ओळखली जात असली तरी तिचे विविध पदर तिने सुरेख मांडले आहेत. ती एक आई होती आणि विशेष म्हणजे धाडसी, जिद्दी आणि बिनधास्त अशी महिलाही होती. 'मै कभी हार नही मानती...' या शकुंतला देवीच्या संवादामध्ये मोठा आत्मविश्वास जाणवतो आणि तो आत्मविश्वास आज खूप काही सांगणारा आहे. दिग्दर्शिकेने शकुंतला देवीचे विविध पैलू हसत-खेळत उलगडले आहेत. आई आणि मुलगी यांच्यातील प्रेमळ नात्याचा संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे. विद्या बालनने शकुंतला देवीची भूमिका छान वठविली आहे. विद्याने या भूमिकेतही आपले अभियनकौशल्य दाखविले आहे. 

हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...

शकुंतला देवीची हुशारी तसेच तिची बोलण्याची ढब तिने उत्तम साकारली आहे. सन्या मल्होत्रा आणि अमित साद यांच्याही भूमिका दमदार आहेत. शकुंतला देवीच्या पतीची भूमिका जिशू सेनगुप्ताने सहजरित्या केली आहे. चित्रपटातील काही सीन्स लंडनमध्ये चित्रित झालेले आहेत आणि ते सिनेमॅटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात छान टिपले आहेत. चित्रपटाच्या शेवटी 'पास नही तो फेल नही..' हे गाणे झकास झाले आहे. ही कथा शकुंतला देवीची असली तरी आई आणि मुलगी यांच्यातील हळव्या नात्याचीही आहे. हा चित्रपट मनोरंजन करणारा आहे. 

रेटिंग : साडेतीन स्टार
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: film review of movie shankuntala devi starring vidya balan