
Kishore Kumar यांना एक 'नकार' पडलेला महागात, इंदिरा गांधींनी अशी दिलेली सजा
Kishore Kumar किशोर दा, किशोर कुमार(Kishore Kumar) किंवा आभास कुमार गांगुली...किशोर कुमार यांना ओळखत नसेल असा विरळाच. अगदी आजच्या जमान्यातही त्यांच्या गाण्यांची जादू कायम आहे. १९४८ मध्ये सुरु झालेला त्यांचा सांगितिक प्रवास तब्बल २७ फिल्म फेअर नॉमिनेशन्स आणि हजारो गाण्यांच्या आठवणीतून पुढे गेला आहे. ४ ऑगस्ट हा किशोर कुमार यांचा वाढदिवस, त्यानिमित्तानं एक खास आठवण किशोर कुमार यांच्या आयुष्यातील इथे शेअर करत आहोत.(Kishore Kumar was banned by Indira Gandhi from singing on the radio for refusing to obey her orders)
कदाचित खूप कमी जणांना माहित असेल की किशोर कुमार सारख्या दिग्गज गायकाला कधी गायक बनायचेच नव्हते. किशोर कुमार यांच्या जन्मदिनी आज आपण एक असा किस्सा जाणून घेणार आहोत जो इंदिरा गांधी सरकारशी संबंधित आहे. संजय गांधी यांच्या निमंत्रणावर किशोर कुमार दिल्लीला गेले नव्हते आणि मग इंदिरा गांधी सरकारनं त्याचा चांगलाच बंदला घेतला होता.
१९४८ मध्ये किशोर कुमार यांना गाण्याची पहिली संधी मिळाली,जेव्हा मुंबईच्या एका संगीतकारानं त्यांना गुणगुणताना ऐकलं,त्यानं त्यांना हार्मोनिअम दिलं आणि २ मिनिटांच्या ऑडिशननंतर सिनेमात गाण्याची थेट संधीच देऊन टाकली. ते संगीतकार होते खेम चंद प्रकाश,जे १९४९ मध्ये रिलीज होणाऱ्या 'जिद्दी' सिनेमातील गाण्यांच्या संगीताची जबाबदारी सांभाळत होते. त्यांचे रेकॉर्डिंग जिथे सुरु होते तिथे जवळच किशोर कुमार यांचे थोरले बंधू अशोक कुमार यांचे ऑफिस होते आणि त्यावेळी अशोक कुमार हिंदीतल्या दिग्ग्ज अभिनेत्यांपैकी एक होते. किशोर कुमार यांना पहिलं गाणं मिळालं त्याचे शब्द होते, 'जीने की तमन्ना कौन करे'. हे गाणं १९४९ मध्ये रिलीज झालं आणि ज्या सिनेमासाठी किशोर कुमार यांनी गाणं गायलं होतं त्यातील इतर गाणी शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांनी देखील गायली होती.
असा सुरु झाला किशोर कुमार यांचा सांगितिक प्रवास. किशोर कुमार आपल्या मूडी स्वभावासाठी मात्र खूप प्रसिद्ध होते. कितीदातर गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यानही त्यांच्या बेफिक्री स्वभावामुळे त्यांच्या सोबत गाणाऱ्या दुसऱ्या गायकाला त्याचा त्रास व्हायचा. सचिन देव बर्म आपला मुलगा आरडी बर्मनला म्हणायचे, ''किशोर दा सारखं दुसरं कुणीच नाही. तो थोडा सनकी आहे पण उद्या त्याला खरं सोनं म्हणतील लोक''. ८० च्या दशकात किशोर कुमार यांनी आपल्या गाण्यांनी हे सिद्ध देखील करून दाखवलं. त्याच दरम्यान देशात आणीबाणी ची परिस्थिती निर्माण झाली होती. १९७४ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीनंतर दिल्लीमध्ये संजय गांधी यांनी एका सांगितिक कार्यक्रमासाठी मुंबईतील अनेक प्रसिद्ध गायकांना निमंत्रण दिलं होतं.
अर्थात किशोर कुमार यांना देखील निमंत्रण होते. पण किशोर कुमार यांनी त्या निमंत्रणास नकार दिला, काही कारणही सांगितलं नाही. यामुळे संजय गांधी त्यांच्यावर नाराज झाले. आणि प्रकरण इंदिरा गांधी सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचलं. मंत्री विद्याचरण शु्क्ला इंदिरा गांधीच्या दिल्लीतील बंगल्यावर गेले आणि तिथेच मग आदेश काढण्यात आला की किशोर कुमार यांना दिल्लीत आले नाहीत म्हणून सजा देण्यात यावी. आदेश संजय गांधी यांचा होता,तर मग टाळण्याची हिम्मत कोणात. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर किशोर कुमार यांच्या गाण्यांवर तातडीनं बंदी ठोठावण्यात आली. कोणत्याही सरकारी माध्यमावर किशोर कुमार यांचा आवाज जाणार नाही असा आदेश देशभरात पोहोचवण्यात आला. मुद्दा इथवर पोहोचला की ज्या सिनेमांसाठी किशोर कुमार गाणी गायचे त्यांना सेन्सॉरकडून सर्टिफिकेट दिलं जायचं नाही. पण एवढ्या कठीण काळातही किशोर कुमारांचा सांगितिक प्रवास काही थांबला नाही.