विधानसभा निवडणुकीची गोष्ट लवकरच डिजिटल माध्यमांवर; 'भाडिपा' आणणार वेबसिरीज...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे 'भाडिपा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल कंटेट ब्रँडने या पुस्तकाचे डिजिटल पडद्यावर रुपांतर करण्यासाठीचे हक्क मिळविले आहेत. 

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात चर्चित, अनपेक्षित आणि धक्कादायक निवडणूक ठरली ती 2019 ची विधानसभा निवडणूक.  याच निवडणुकीची उत्कंठावर्धक गोष्ट कमलेश सुतार यांनी '36 डेज्' या आपल्या पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आणली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी सर्वपक्षांनी केलेले खटाटोप आणि राजकीय राजनीतींचे डावपेच याचा सविस्तर वृत्तांत या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. निवडणुकीची ही रंजक गोष्ट लवकरच डिजिटल माध्यमावर वेबसिरिजच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे 'भाडिपा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल कंटेट ब्रँडने या पुस्तकाचे डिजिटल पडद्यावर रुपांतर करण्यासाठीचे हक्क मिळविले आहेत. 

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी जम्बो सुविधा; तब्बल 'इतक्या' खाटांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण...

''2019 ची विधानसभा निवडणुकीमध्ये घडलेल्या विविध घडामोडींबाबत मी खूपच उत्सुक होतो.  ही आपल्या पिढीने पाहिलेली सर्वात रोमांचक निवडणूक ठरली. यात कोणीही नायक, खलनायक किंवा चांगले- वाईट असे काहीही नव्हते. कमलेश सुतार यांच्या लेखणीतून उतरलेले '36 डेज्' पुस्तकातील कथा दृकश्राव्य माध्यमासाठी अगदी योग्य  आहे. आम्हाला ही कथा जशी घडली आहे तशीच सांगायची आहे. हा एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास 'भाडिपा' तसेच 'गुलबदन टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड'चे उपसंस्थापक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक सारंग साठ्ये यांनी व्यक्त केला.

बॉलीवूडवर शोककळा; चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन...

ही कथा आम्हाला खूप भावली. ही निवडणूक बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे झाली. प्रत्येक जण आपले हुकमी प्याद लपवून होते आणि वेळ येईल तेव्हा ते समोर काढत होते. या कथानकामध्ये एक्स्ट्रा मसाला लावण्याची गरज नाही. ते  पूर्णतः नाट्यमय घडामोडीप्रमाणे घडले आहे. त्यामुळे रहस्य आणि नाट्यमयता आधीच आहे, असे सारंग यांनी सांगितले. सध्या याची पटकथा लेखनाचे काम सुरू आहे. एक दोन महिने पटकथा लिहिण्यासाठी लागतील. याची पटकथा खूप स्ट्रॉंग असावी याकडे जास्त लक्ष देत आहोत. पाश्चात्य देशांमप्रमाणे भाडिपमध्ये रायटर रूप आहे. त्यामध्ये पाच-सहा लेखक एकत्र मिळून पटकथा लिहितात. सिक्रेड गेम आणि पताललोक या वेबसिरिजमध्ये असा प्रयोग झाला. तसाच प्रयोग या कथानकाबाबतही केला जाणार आहे, अशी माहिती सारंग यांनी दिली. 

मालगाडी ठरली मसीहा; लॉकडाऊनमध्येही रेल्वेने अनेक रुग्णांपर्यंत पोहोचविले औषध...   

निवडणुकीच्या 36 दिवसात नेमकी राजकीय समीकरणे कशी बदलली याचा केवळ आढावा न घेता मनोभावनांच्या आविष्काराचे चित्रण असलेले हे '36 डेज् ' हे पुस्तक आता डिजिटल नाट्यरुपात येणार असल्याचा आनंद पत्रकार कमलेश सुतार यांनी व्यक्त केला. बेस्ट सेलर ठरलेले हे पुस्तक आम्ही प्रकाशित केले याचा आनंद व्यक्त करताना याच्या डिजिटली व्हर्जनची उत्सुकता आहे, असे  रूपा पब्लिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक कपिश मेहरा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra vidhansabha election stroy will come in form of webseries soon by bhadipa