कोरोना महामारीवर येणार दहा-बारा चित्रपट; 'इम्पा' आणि चित्रपट महामंडळात नावनोंदणीला सुरुवात...

संतोष भिंगार्डे 
शुक्रवार, 31 जुलै 2020

इम्पाचे संचालक विकास पाटील म्हणाले, की कोरोनाचा फटका संपूर्ण विश्वाला बसला आहे. अशा प्रकारचे लॉकडाऊन पहिल्यांदाच होत आहे आणि त्यावर मधुर भांडारकर व आनंद एल. राय यांच्यासारखे मोठी मंडळी चित्रपट बनवत आहेत. प्रेक्षक अशा चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद देतील असे मला वाटते.

मुंबई : सध्या कोरोना महामारीने अख्ख्या जगाला वेठीस धरलेले आहे. अचानक जगाला घातलेल्या या रोगाच्या विळख्याने सगळे जग हादरले आहे. कोरोनामुळे चार महिन्यांपासून लॉकडाऊन झालेले आहे. आता याच विषयावर अर्थात कोरोना महामारी आणि त्यानंतर झालेले लॉकडाऊन या विषयावर हिंदी व मराठी चित्रपट येणार आहेत. इम्पा (इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन) आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ येथे काही प्रॉडक्शन कंपन्यांनी नावे रजिस्टर्ड केली आहेत. आनंद एल. राय यांच्या 'कोरोना व्हायरस' या नावाला मंजुरी मिळाली आहे, तर अन्य नावांना लवकरच मंजुरी मिळणार आहे.

औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

कोरोनामुळे सर्वसामान्यांना बसलेला फटका, आलेली आर्थिक मंदी, काही जणांचा झालेला मृत्यू अशा सगळ्या विषयांवर हे चित्रपट बनणार आहेत. इम्पामध्ये 'कोरोनाच्या आयचा घो' या नावाने मराठी चित्रपटाचे शीर्षक नोंदविण्यात आले आहे. तसेच 'कोव्हिड-19', 'कोव्हिड-21', 'अराऊंड कोरोना', 'कोरोना 2020', 'कोरोना के रोना', 'कोरोना लॉकडाऊन', 'कोरोना व्हायरस', 'धारावी व्हर्सेस कोरोना 2020', 'गो कोरोना गो', 'हाय कोरोना', 'प्यार कोरोना' अशी नावे इम्पामध्ये विविध प्रॉडक्शन हाऊसनी नोंदविली आहेत. त्यामध्ये भांडारकर एन्टरटेन्मेंटने 'अराऊंड कोरोना', 'कोरोना लॉकडाऊन' आणि 'कोरोना 2020' अशी तीन नावे नोंदविली आहेत. 

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...​

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडेही 'लॉकडाऊन ऑफ लव्ह', 'लॉकडाऊन', 'लॉकडाऊन ऑफ रिलेशन' अशा काही नावांची नोंदणी करण्यात आली आहे. निर्माते रणजित डोळे यांनी 'लॉकडाऊन' या मराठी चित्रपटाची नोंदणी महामंडळात केली आहे. ते म्हणाले, की आम्ही पुढील महिन्यात चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत. सागर ननवरे आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी आपले बजावलेले कर्तव्य आम्ही या चित्रपटात दाखविणार आहोत शिवाय आमच्या चित्रपटात लॉकडाऊनमध्ये घडणारी लव्हस्टोरीही आहे. 

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

इम्पाचे संचालक विकास पाटील म्हणाले, की कोरोनाचा फटका संपूर्ण विश्वाला बसला आहे. अशा प्रकारचे लॉकडाऊन पहिल्यांदाच होत आहे आणि त्यावर मधुर भांडारकर व आनंद एल. राय यांच्यासारखे मोठी मंडळी चित्रपट बनवत आहेत. प्रेक्षक अशा चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद देतील असे मला वाटते. आता मोठ्या प्रमाणावर कोरोना या नावाने शीर्षकांची नोदणी होत आहे. निर्मात्यांना विनंती आहे की हा विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने आपल्या चित्रपटात हाताळावा. कारण परिस्थिती खूप गंभीर आहे आणि ती तितक्याच गंभीरपणे दाखविणे आवश्यक आहे.  हास्यास्पद काही करू नये असे मला वाटते. 
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many films names registered on corona desease to imfa and chitrapat mahandal