कोरोनाचे संकट आणि मालिकांचे चित्रिकरण; काय सांगतायत कलाकार...

marathi serial shooting
marathi serial shooting

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. सगळीकडचे चित्रीकरण बंद होते. परंतु आता हळूहळू चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. तब्बल तीन ते साडेतीन महिन्यांनी सेलिब्रेटी चित्रीकरणात सहभागी झाले आहेत. विविध ठिकाणी चित्रीकरण हळूहळू सुरू झाले आहे. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून ते केले जात आहे. मोठ्या कालावधीनंतर कलाकार चित्रीकरणात सहभागी झाले आहेत. नेमके त्यांना काय वाटते आहे...चित्रीकरण स्थळी कोणकोणते उपाय केले गेले आहेत..त्यांच्या मनात भीती आहे की उत्साह हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.... 

प्राजक्ता माळी : सोनी मराठीवरील 'हास्यजत्रा' या शोची सूत्रसंचालक प्राजक्ता माळी आहे. आता या शोचे शूटिंग सुरू झाले असले तरी प्रेक्षकांशिवाय शूटिंग सुरू आहे. प्राजक्ता म्हणते की आमचा दीडशे जणांचे युनिट होते आणि ते फक्त पन्नास जणांचे आहे. आता आमच्यासमोर प्रेक्षक नाहीत तसेच कॅमेरा सेटअप काहीसा बदलला. त्यामुळे तेथील माणसे कमी झाली. प्रत्येकासाठी हेअर आणि मेकअप पहिल्यांदा वेगवेगळा असायचा. आता सगळ्यांसाठी एकच ठेवण्यात आला आहे. सगळ्यांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केला आहे. प्रत्येकाचे तापमान आणि ऑक्सिजन तपासले जाते. सॅनिटायझर्सची मशीन आणलेली आहे आणि तेथूनच सगळ्यांनी सॅनिटाईज करून यायचे आहे. मास्क, फेस शिल्ड सगळ्यांनी लावलेले आहे.  वाद्यवृंदातील काही माणसे कमी केली आहेत. बसण्याची ही सगळी व्यवस्था नव्याने करण्यात आली आहे. दुसरे म्हणजे ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा त्रास आहे. त्यांनी सेटवर यायचे. परफॉर्म करायचा आणि थेट घरी निघून जायचे. व्हॅनिटी तसेच अन्य ठिकाणी सतत सॅनिटाईज केले जाते. आम्हाला हातात स्क्रीप्टही दिली जात नाही. मोबाईलवर आम्हाला अगोदरच ती दिली जाते. सेटवर कुणी कुणाशी गप्पा मारीत नाही. 

आशुतोष गोखले : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत आशुतोष काम करतो. त्याची डॉ. कार्तिकची भूमिका सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या मालिकेचीदेखील शूटिंग सुरू झाली आहे. तो सांगतो, की सरकारच्या नियमानुसारच आम्ही काम करीत आहोत. स्टुडिओमध्ये एन्ट्री केल्या केल्या सॅनिटायझर्सची फवारणी संपूर्ण अंगावर तसेच अन्य सामानांवर होते. त्यानंतर डॉक्टर सगळ्यांची आरोग्य तपासणी करतो आणि मगच पुढे सोडण्यात येते. प्रत्येकाला हेड गिअर तसेच हॅण्ड ग्लोज देण्यात आलेले आहेत. मी एकेक दिवस मोजत होतो आणि कधी शूटिंग सुरू होणार याची वाट पाहात होतो. 17 मार्चला आम्ही शेवटचे शूटिंग केले होते आणि आता बरोबर 105 दिवसांनी पुन्हा शूटिंग करीत आहोत. आता युनिटमधील माणसे कमी करण्यात आली आहेत. स्वतःचा मेकअप स्वतः करायला लागला आहे. पहिल्यंदाच स्वतः मेकअप केला आहे. काही गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत आणि त्या केल्या पाहिजेत. तीनेक महिन्यांपूर्वी साकारलेल्या भूमिकेचा पुन्हा सूर सापडणे कठीण काम असते. परंतु मागील एपिसोड पाहिले आहेत आणि आता काम करीत आहे. थोडासा गोंधळ पहिल्याच दिवशी उडाला आहे. पण तीदेखील एक गंमत आहे. सेटवरील वातावरण आनंदी आहे. कारण पुन्हा तीन महिन्यांनी आपल्या आवडीचे काम करायला मिळत आहे. शिवाय प्रत्येक जण आपापली काळजी घेत होता. 

विराजस कुलकर्णी : झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेचे चित्रीकरण ठाण्यातील येऊरमधील एका मोठ्या बंगल्यात चालते. गेले पंधरा एक दिवस या मालिकेतील सगळे कलाकार या बंगल्यातच क्वारंटाईन झाले होते. त्यानंतर आता त्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या मालिकेत विराजस कुलकर्णी मुख्य भूमिका साकारतो. तो म्हणतो, की आम्ही सगळे जण सेटवरच राहात होतो. गेटमधून कुणालाही आत सोडले जात नाही आणि कुणी अतिमहत्त्वाच्या कामासाठी आले तर त्याची आरोग्य तपासणी केली जाते. आमचा सेट दिवसातून तीन वेळा सॅनिटाईज केला जातो. कुठलीही बाहेरची गाडी आली तर तिलादेखील सॅनिटाईज केले जाते. पीपीई किट घातल्याशिवाय आमचा मेकअप केला जात नाही. संपूर्ण क्रू तोंडाला मास्क व हातात ग्लोव्ह्ज घालून असतो. कुणाला काही त्रास वगैरे झाला तर लगेच डॉक्टरांकडे पाठविले जाते. सगळेच खूप दिवसांनी भेटले आहेत. आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. येऊरला शूटिंगला असल्यामुळे आणि सेटही लोकवस्तीपासून दूर असल्याने इतर कुणाचा त्रास जाणवत नाही. 

नंदिता धुरी-पाटकर : सहकुटुंब सहपरिवार या स्टार प्रवाहवरील मालिकेत नंदिता काम करीत आहे. त्यांच्या मालिकेचे चित्रीकरण मालाड-मालवणी येथे होते. ती म्हणते, की निर्मिती संस्था तसेच वाहिनी आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत आहे. आमच्या सगळ्यांचा इन्शुरन्स उतरविण्यात आला आहे. सेटवर एन्ट्री केल्या केल्या आरोग्य तपासणी केली जाते. संपूर्ण सेट सॅनिटाईज केला जातो आणि नंतरच चित्रीकरण सुरू होते. आमच्या गाड्याही सॅनिटाईज केल्या जातात आणि मगच आम्हाला आत सोडले जाते. चित्रीकरण करताना इकडे-तिकडे हात न लावणे हे आम्ही कटाक्षाने पाळतो. पहिल्याच दिवशी काही सूचना आम्हाला दिल्या गेल्या आणि आम्ही त्यांचे पालन करीत आहोत. सेटवर अन्य ठिकाणी कुठेही न फिरणे...कुणाशीही फारशा गप्पा न मारणे आणि मारल्याच तर खूप अंतर ठेवून बोलणे वगैरे. 

शरयू सोनावणे : प्रेम पॉयजन पंगा या झी युवावरील मालिकेत शरयू काम करते. या मालिकेचे शूटिंग मालाड-मढ येथे चालते. ती म्हणते, की चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी आमचे निर्माते आदिनाथ कोठारे आले होते. त्यांनी सेटवर डॉक्टर ठेवलेले आहेत. आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतली जाते. सकाळी, दुपारी मास्क आणि हॅण्डग्लोव्हज दिले जातात. सॅनिटायझर्सची बाटली सोबत असते तिचा वापर करतो. मेकअपमन तसेच अन्य कामगार यांना पीपीई किटस् देण्यात आले आहेत. पहिल्यांदा आम्हाला एकत्र जेवण यायचे पण आता वेगवेगळे डबे येत आहेत. आनंदी वातावरण आहे. भीती कुणाच्या मनात नाही. 
 

हिंदी तसेच मराठी मालिकांचे चित्रीकरण येथे सुरू आहे. सगळ्या निर्मिती संस्था सरकारच्या नियमानुसार चित्रीकरण करीत आहेत. प्रत्येकाच्या सेटवर आरोग्य तपासणी होत आहे. प्रत्येक सेटवर 33 टक्केच उपस्थिती आहे. आम्ही निर्मिती संस्थांकडून एक फॉर्म भरून घेतलेला आहे. विशेष म्हणजे सेटवर सरकारचे नियम पाळले जात आहेत की नाहीत याची आम्ही कसून पाहणी करीत आहोत. आम्ही त्याकरिता एक कमिटी नेमली आहे. त्यातील सदस्य सेटवर भेट देतात आणि पाहणी करतात.
- मंगेश राऊळ, जनसंपर्क अधिकारी, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com