वडील मुलाचं नातं उलगडणारा, 'हिज फादर्स व्हॉईस'!

His_Fathers_Voice
His_Fathers_Voice

मुंबई : बारा वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या वडील आणि मुलाचं हळुवार नातं उलगतं. बासरी आणि गिटार यांच्या अनोख्या फ्युजनची अनुभूती मिळते. मनाचा ठाव घेणाऱ्या नृत्य व संगीताची अनोखी मैफल पहायला मिळते. अश्‍विनी प्रतापराव पवार निर्मित व कार्तिकेयन किरूभाकरन दिग्दर्शित 'हिज फादर्स व्हॉईस' या चित्रपटाचा देखणा आणि भव्य प्रिमियर गुरुवारी (ता. 6) पार पडला. या प्रिमियर सोहळ्याला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

"कावडी प्रॉडक्‍शन' या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट इंग्रजीसह अन्य दहा भाषांमध्ये बनविण्यात आला आहे. या चित्रपटात अश्‍विनी प्रतापराव पवार, पी. टी. नरेंद्रन, ज्युलिया कोच, जेरेमी रोस्के, सुधर्मा वैथीयंतन, ख्रिस्तोफर गुरूसामी, आशा भोला या कलाकारांनी काम केले आहे. गिरगाव येथील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता-लेखक-दिग्दर्शक टीनू आनंद, ऍड गुरू प्रल्हाद कक्कड, इंडियन आर्ट स्कॉलर-आर्ट हिस्टोरियन-अकॅडमी अँड क्युरेटर शरयू दोशी, दिग्दर्शिका गौरी शिंदे, डॉ. विशाखा देसाई, डॉ. रॉबर्ट ऑक्‍झम, नृत्यदिग्दर्शक आस्ताद देबू, आर्किटेक्‍ट आभा लांबा, कलाकार जितिश आणि रीना कलाट, दिग्दर्शक सुमात्रो घोषाल, मोहिनीअट्टम नृत्यांगणा सुनंदा नायर, तस्निम जाखरिया-मेहता, आशिष दोशी, सुदर्शन शेट्टी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे निर्मात्या अश्‍विनी प्रतापराव पवार आणि लेखक-दिग्दर्शक कार्तिकेयन किरूभाकरन यांना शुभेच्छा देण्यासाठी खास उपस्थित होते. 

या वेळी चित्रपट संपल्यानंतर चित्रपटाच्या टीमशी प्रश्‍नोत्तरे झाली. त्यावेळी चित्रपटाबद्दल माहिती देताना लेखक व दिग्दर्शक कार्तिकेयन किरूभाकरन म्हणाले, की या चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी सुमारे सहा महिने लागले. या कथेसाठी भवभूति यांच्या उत्तर रामचरित्र नाटकाचा संदर्भ घेण्यात आला. त्यामध्ये राम व लव-कुश यांची पहिल्यांदा भेट होते. त्या प्रसंगांना अनुसरून या चित्रपटाची कथा आजच्या काळाची जोड देत लिहिण्यात आली. भारतीय संस्कृती, नृत्य आणि चित्रकला यांचा अनोखा संगम चित्रपटात दाखविण्यात आला आहे. 

चित्रपटाच्या निर्मात्या व अभिनेत्री अश्विनी प्रतापराव पवार म्हणाल्या, की या चित्रपटामध्ये संगीत आणि नृत्य हा महत्त्वाचा भाग आहे. चित्रपटामधील क्‍लाराचे डोहाळे जेवणाचे मराठी गाणे आहे ते माझ्या बहिणीने नीता पाटीलने लिहिले आहे. चित्रपट इंग्रजी भाषेत असला तरी माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे मराठी गाणे घेतले आहे. या चित्रपटातील गाणी खूप सुंदर आहेत आणि त्याचे श्रेय संगीतकार वेदांत भारद्वाज यांचे आहे. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक पी. टी. नरेंद्रन आहेत. 

चित्रपटातील क्‍लायमॅक्‍सच्या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल कार्तिकेयन किरूभाकरन म्हणाले की, वल्ली आणि क्रिस नृत्य करत आहेत. त्या नृत्यामध्ये दोघे वेगवेगळ्या दिशेने नृत्य करत होते. त्या क्षणाचे चित्रीकरण करणे अत्यंत अवघड गेले. हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. संगीतकार वेदांत भारद्वाज यांनी या चित्रपटातील संगीत रचना खूप उत्कृष्ट आहेत. त्यामुळे त्याला संगीत देताना खूप आनंद वाटला, असे सांगितले. 

आशुतोष गोवारीकर म्हणाले की, चित्रपटाचे कथानक, संगीत व सिनेमॅटोग्राफी अतिशय सुंदर आहे. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय पाहून ते पहिल्यांदाच अभिनय करत आहे, असे कुठेच जाणवत नाही. हा अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com