'देवाच्या रुपात पांडुरंग भेटले आणि माझा पुनर्जन्म झाला'; दिग्दर्शक गणेश रासनेंनी सांगितला कोरोनामुक्तीचा प्रवास...

'देवाच्या रुपात पांडुरंग भेटले आणि माझा पुनर्जन्म झाला'; दिग्दर्शक गणेश रासनेंनी सांगितला कोरोनामुक्तीचा प्रवास...

मुंबई ः तब्बल एकवीस दिवस मी रुग्णालयात उपचार घेत होतो. त्याच दरम्यान अर्थात सहाव्या की सातव्या दिवशी डॉक्टरांनी माझ्या पत्नीला फोन केला आणि गणेशची प्रकृती गंभीर असून तो उपचारांना प्रतिसाद देत नाहीये. तुम्ही खंबीर राहा, असे सांगितले. मीदेखील तेव्हा मनाने पुरता खचलो होतो. माझाही हळूहळू धीर सुटला होता. काय होईल आणि काय नाही हे मलाही सांगता येत नव्हते. आई-वडील, पत्नी आणि मुलगी यांच्या आठवणींमध्ये मी ओक्साबोक्शी रडत होतो. अशा वेळी मला तेथे देवाच्या रूपात पांडुरंग भेटले. त्यांनी मायेने माझ्या पाठीवरून हात फिरविला. खरे तर अशावेळी एक रुग्ण दुसऱ्या रुग्णाला स्पर्श करीत नाही. त्यावेळी पांडुंरग माझ्या मदतीला धावले. त्यांनी मला खूप धीर दिला. 

त्यांनी माझा आत्मविश्वास वाढविला. तेव्हाच मी ठरविले की आता आपण जिद्दीने कोरोनावर मात करायची आणि आता माझा पुनर्जन्म झाला आहे. दिग्दर्शक गणेश रासने अत्यंत भावुक होऊन सांगत होता. 'अवघाची हा संसार', 'उंच माझा झोका', 'राधा ही बावरी', 'दुर्वा', 'तू अशी जवळी राहा', 'सजना', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' अशा काही मालिकांचे दिग्दर्शन गणेश रासनेने केले आहे. तो गोरेगाव येथे पत्नी राजश्री व मुलगी निधी यांच्यासह राहतो. 

22 मे रोजी गणेशला ताप आला होता. त्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. त्याने काही औषधी घेतली आणि तो बरा झाला. पण नंतर दोन-तीन दिवसांनी थ्रोट इन्फेक्शन झाले. त्यातूनही तो बरा झाला. परंतु पुन्हा तीन-चार दिवसांनी त्याला ताप आला व तोंडाची चवदेखील गेली. लगेच त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी करून घेतली. ती पॉझिटिव्ह आली आणि त्याला त्यांच्या सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पेडामकर, आमदार सुनील प्रभू आणि नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या मदतीने अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयातून तो नशीब बलवत्तर म्हणून कोरोनावर मात करून घरी परतला खरा. परंतु पांडुरंग मांजरेकर यांच्या रूपने त्याला तेथे देवदूतच भेटला.  कारण डॉक्टर्स आणि नर्सेस आपले काम करीत होतेच, पण त्याच्या शेजारी अॅडमिट असलेल्या पांडुरंग मांजरेकर यांनी त्याला खऱ्या अर्थाने बळ दिले. गणेशमध्ये नवी उमेद त्यांनी जागविली. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी लहान भावासारखी त्याची काळजी घेतली. 

गणेश म्हणाला, की मला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. अंगात त्राण नसल्याने आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, हेदेखील मला समजत नव्हते. खूप अशक्तपणा जाणवत होता. मला सातव्या मजल्यावर नेण्यात आले आणि माझ्यावर लगेचच उपचार सुरू झाले. तेथेच माझी भेट पांडुरंग मांजरेकर यांच्याशी झाली. ते तेथे इलेक्ट्रिशियनचे काम करतात. त्यांचा रिपोर्ट दोन वेळा पॉझिटिव्ह आला होता. ते आपला रिपोर्ट कधी निगेटिव्ह येणार याची वाट पाहात होते. परंतु माझ्यासाठी ते देवदूतच ठरले. कारण त्यांनी मला तेथे ज्या प्रकारे मदत केली, ती मी आयुष्यभर विसरूच शकत नाही. माझ्या आई-वडिलांनी आषाढी एकादशीला पंढरीची वारी दरवर्षी पायी केली. त्यांची ती पुण्याई मला या वेळी कामाला आली. पांडुरंग मांजरेकर यांना देवानेच माझ्या मदतीला पाठविले आहे, असे मला वाटले. अगदी टॉयलेटला नेण्यापासून ते जेवण भरविण्यापर्यंत त्यांनी मदत केली. 

एकदा तर ऑक्सिजन घेताना मला खूप त्रास होत होता. तेव्हा पांडुरंग साहेब उठले आणि त्यांनी पाहिले तर छोट्या मेटलच्या पाईपातून येणारा ऑक्सिजनचा फ्लो बरोबर येत नव्हता. लगेच ते डॉक्टरांकडे गेले. पण डॉक्टर व नर्स पीपीई किट घातले नसल्यामुळे लगेच येऊ शकत नव्हते. मग चपळाईने पांडुरंग यांनी दुसऱ्या रुममधील ऑक्सिजन युनिट आणले आणि काय चमत्कार, शंभर टक्के फ्लो सुरू झाला आणि माझा जीव वाचला. पांडुरंग मांजरेकर यांची मला मोलाची मदत झाली, त्यांनी केवळ धीरच दिला नाही तर मला खूप मोठा आधार दिला. छोट्या -मोठ्या गोष्टींमध्ये मला त्यांनी खूप मदत केली. त्यांचा तसेच डॉक्टर्स, नर्सेस तसेच त्यांची मोलाची साथ लाभली. त्या सगळ्यांचे मी आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. मला असे वाटते की कोरोनासारख्या आजारामध्ये पांडुरंग मांजरेकरसारखी माणसे सगळ्यांना भेटावीत.  

मराठी कलाकारांचेही मानले आभार...
कोरोनामुळे रुग्णालयात असताना रोहिणी हट्टंगडी, सुबोध भावे, शशांक सोळंकी, वीरेंद्र प्रधान, सारिका निलाटकर, सचित पाटील, स्पृहा जोशी, श्वेता पेंडसे, पंकज विष्णू, निनाद वैद्य, सागर तळाशीकर, पूजा नायक, सागर देशमुख, विवेक लागू, कविता लाड, महेंद्र कदम आदी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील मंडळींनी मला फोन करून माझ्या तब्येतीची वारंवार चौकशी केली. त्यांचेही मनापासून आभार.
-----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com