अग्निहोत्रींनी आता अमिताभवर घेतलं तोंडसुख, म्हणाले,'हे तर माफिया,यांनी...' Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri says,nepotism came after 2000 in bollywood,  involved amitabh bachchan name.

अग्निहोत्रींनी आता अमिताभवर घेतलं तोंडसुख, म्हणाले,'हे तर माफिया,यांनी...'

Vivek Agnihotri: 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडनंतर सुरु झालेलं नेपोटिझमचं वादळ काही थांबायचं नाव घेईना. त्या एपिसोडमध्ये कंगना रनौतनं करण जोहरला नपोटिझमला प्रोत्साहन देणारा म्हणत जवळ-जवळ धारेवर धरलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत नेपोटिझम या मुदद्द्यावर काही ना काही वाद छेडलेला पहायला मिळतो.

आता फिल्ममेकर अग्निहोत्री यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं आहे की,''२००० सालानंतर बॉलीवूडमध्ये नेपोटिझमला सुरुवात झाली. तोपर्यंत नपोटिझम नावाचं वादळ शिरलंच नव्हतं इंडस्ट्रीत''. विवेक अग्निहोत्री म्हणाले,''श्रीदेवी,अमिताभ आणि जितेंद्र हे देखील आऊटसाइडर होते. पण त्यांच्या मुलांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर यांनी आपापसात मिळून माफिया गॅंग बनवली आणि नेपोटिझमला पोसलं''. (Vivek Agnihotri says,nepotism came after 2000 in bollywood, involved amitabh bachchan name.)

विवेक अग्निहोत्री स्वतःला बॉलीवूडचा भाग मानतच नाहीत. ते नेहमीच आपल्या ट्वीट्समध्ये करण जोहरसारख्या काही लोकांवर आपला राग काढताना दिसतात. ब्रुट इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, ''मला वाटतं की २००० साला पूर्वीपर्यंत बॉलीवूड एकदम वेगळं होतं. इथे बरेचसे लोक आऊटसाइडरच होते. यामधले बरेचसे २००० सालापर्यंत मोठे स्टार्स बनले. त्यानंतर जेव्हा त्यांची मुलं इंडस्ट्रीत आली तेव्हा त्यांनी आपला चमू बनवला,आणि मग या माफिया गॅंगनं आपल्या मुलांसाठी बाहेरुन येणाऱ्यांसाठी इंडस्ट्रीत अडचणी निर्माण करायला सुरुवात केली. यांना बाहेरुन येणाऱ्यांची काय अडचण होते मला माहीत नाही,यांच्यामुळेच आउटसाइडर्स इंडस्ट्रीत खूप अडचणींचा सामना करतात''.

विवेक यांनी सांगितलं की,''२००० नंतर बॉलीवूडमधल्या कुटुंबानी बाहेरुन येणाऱ्यांसाठी या इंडस्ट्रीचे दरवाजे बंद केले. इथल्या मेकर्सनी हुशार कलाकारांना बर्बाद करायचा जणू वीडाच उचलला. एका डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो हे खूप सहज घडतं,काही करावं लागत नाही. पण बॉलीवूडमध्ये हे असं घडत असल्यानं अनेक अयोग्य कलाकार इथे काम करतायत,कलेचा दर्जा घसरतोय आणि चांगल्या कलाकारांना मागे रहावं लागतंय''.

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले,''अमिताभ बच्चन,धर्मेंद्र,जितेंद्र,राजेश खन्ना,शत्रुघ्न सिन्हा,गोविंदा सगळेच आऊटसाइडर होते. श्रीदेवी,माधुरी दिक्षितही बाहेरच्या होत्या. हे सगळेच यशस्वी झाले. पण मग यांची मुलं आली, निर्माते,दिग्दर्शकांची मुलं आली,मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, पण जेव्हा अयोग्य गोष्टींना महत्त्व दिलं जातं तेव्हा मात्र राग येतो''.