महत्त्वाची बातमी: कपाशीत ५० टक्के घट का येते, जाणून घ्या कारणे, अन या वापरा पद्धती

Cotton
Cotton

औरंगाबाद: मराठवाड्यात कपाशीचे जास्त क्षेत्र आहे. त्यापैकी एकट्या औरंगाबाद जिल्ह्याच्या जवळपास साडेसात लाख हेक्टरपैकी साधारण ४ लाख हेक्टरवर कपाशी लागवड केली जाते. कपाशी नगदी पिक असल्याने कोरडवाहू क्षेत्रातही या पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा असतो, असे असले तरी वर्षानुवर्षे कपाशी पिकांत प्रामुख्याने नियोजनाच्या अभावामुळे ५० टक्के घेट येत असल्याचे शास्त्रज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे.

यंदा कपाशीतील घट न येण्यासाठी विशेष  काळजी घेण्याची गरज शेतकरी, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.देवगाव (ता. पैठण) येथील प्रयोगशील शेतकरी  दिपक जोशी यांच्या मते कापूस लागवीडपासून ४० दिवसात तणनियंत्रणच होत नाही. सगळीकडे एकाच लागवड झाल्याने एकाच वेळेस तणांचा प्रादूर्भाव होतो, अशावेळेस साहजिक सर्वच शेतकऱ्यांना एकाच वेळेस मजूर मिळत नाही.

अर्थात पीक जावळात असताना योग्य वेळेस तण नियंत्रण करावयास हवे. कपाशी लागवड करतानाच लगोलग मागून मुख्यत्वेकरुन कृषी विद्यापीठांनी शिफारशीत पेन्डाॅमिथिलीन या तणनाशक औषधाची फवारणी करायला हवी,  मात्र ही फवारणी लागवडीनंतर आणि उगवणीपूर्वी फवारणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. सु. बा. पवार यांच्या मते औरंगाबादचे कपाशी लागवडीचे क्षेत्र जरी चार लाख हेक्टरवर असले तरी त्यापैकी हलक्या जमिनीचे क्षेत्र ३० टक्के आहे.

अशा जमिनीत कपाशी लागवड करु नये. करतच असाल तर १५० ते १६० दिवसांचा कालावधी असणारे वाण कोरडवाहू मध्ये लावावे. बागायती क्षेत्रात कपाशी लागवड करत असाल १७० ते १८० दिवसांचे वाण निवडावे. लागवडीदरम्यान शिफारशीनुसार बेसल डोस द्यायलाच हवा. बरेच शेतकरी उघड्या रानात  खत टाकतात, त्याऐवजी मातीआड टाकणे गरजेचे आहे.

असे करा एकात्मिक व्यवस्थापन
एकरी झाडांची शिफारशीनुसार कोरडवाहूसाठी (साधारण ४ बाय दीड फूट अंतर) आणि बागायतीसाठी (पाच बाय एक किंवा सहा बाय एक) या अंतरावर कपाशी लागवड करावी. एकात्मक किड व्यवस्थापन हे शिफारशीनुसार किडींची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी.

यामध्ये सापळा पिके लावणे, निंबोळी अर्क फवारणी, पिवळे व निळे सापळे, कामगंध सापळे, जैविक कीडनाशक वापरावेत. सर्वात शेवटी रासायनिक किटकनाशक वापरावीत. ९० टक्के कापूस कोरडवाहू असल्याने सप्टेंबर नंतर पाते बोंड फुले लागलेली असतात, अशा वेळी संरक्षित पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक असते. पातेगळ झाल्यास बोंडात रुपांतर होत नसल्याचेही डाॅ. पवार यांनी सांगितले.

तृण आणि पिकांची लागते स्पर्धालागवडीपासून साधारण ४५ दिवसांत कपाशीला पाते (ज्याचे नंतर बोंड होते) लागते. चाळीस दिवसात जर तण वाढले तर ते पिकाच्या वाढीसोबत स्पर्धा करते. अर्थात ते पिकाला  हानीकरकच आहे. यामुळे वाढीवर परिणाम होतो, त्याचे गणित उत्पादनाशी होते.

शिफारशीनुसारच द्या खते

लागवडीबरोबर १०:२६:२६ यासारखे कोणतेही मिश्रखत द्यावे. (मिश्र खत पिकाला लागू होण्यासाठी साधारण २५-३० दिवस लागतात) या खतामुळे पाते अधिक बळकट होण्यासाठी ताकद  मिळते. पातेगळ होण्याच्या काळात हे मिश्रखत झाडाला बळकटी देण्याचे काम करत असल्याने पातेगळ होत नाही. दरम्यान तणनाशकाचा वापर केल्याने हे खत पिकांला पूर्ण ताकद देते.

कोरोनासारखंच पिकांचही असतं.
शेतकरी जोशी सांगतात की, जर आपण हेल्दी राहिलो तर कोरोनाही काही करु शकत नाही, कपाशीचही तसंच असतं, झाडाचं बाळसं पक्क हवं. कपाशी पिक जर हेल्दी राहिलं, तर ओघाने तुमचे उत्पादन वाढते, इम्यूनिटी वाढते, त्यामुळे पिकांचे इतर रोगही कमी होतात. जसं सरकार कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार क्षमता वाढवा असं सांगत आहे, तसंच वनस्पती, पिकांचंसुद्धा आहे. याच काळात झाड सक्षम झालं तर (४० दिवसात फूटभर) पिक उत्पादनात नक्कीच फरक पडतो असंही श्री. जोशी सांगतात.

सध्या  ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी कापूस लागवड करत आहेत, मात्र साधारणपणे तीन ते चार इंच किंवा ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय (जमिनीत पुरेशी  ओल  झाल्याशिवाय) कपाशी लागवड करु नये. विद्यापीठाने शिफारश केलेल्या तणनाशकाची फवारणी करावी.
- डाॅ. सुर्यकांत पवार, सहयोगी संचालक, तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com