तो म्हणाला, तिने काळे कपडे घातले होते म्हणून...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

चालकाची पोलिसांनी चौकशीही केली. अपघात झाल्यानंतरही निघून गेल्याबाबत विचारल्यानंतर त्यांनी दिलेले उत्तरही अजब होते.

औरंगाबाद - वाहन चालविताना महिलेच्या अंगावर काळे कपडे होते. त्या समोर मला दिसल्याच नाही, अचानक मला खट्ट असा आवाज आला; पण काही लक्षात आले नाही व बस पुढे नेली असे चक्रावून टाकणारे वक्‍तव्य बासष्टवर्षीय चालकाने केले आहे. या चालकाच्या वाहनाखालीच कासलीवाल पूर्व येथील महिलेचा शनिवारी (ता.18) चिरडून मृत्यू झाला होता. 

अपघातात ललिता शंकर ढगे (वय 39, रा. कासलीवाल पूर्व, चिकलठाणा विमानतळासमोर) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती शंकर ढगे वाळूज एमआयडीसी एका कंपनीत  व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना कंपनीच्या बसमध्ये बसविण्यासाठी ललिता यांनी चिकलठाणा परिसरातील मुख्य रस्त्यावर दुचाकीने सोडले. तेथून त्या परत घरी गेल्या व सव्वाआठच्या सुमारास जीमला जाताना रामनगरजवळील सह्याद्री हॉस्पिटलसमोर रस्त्यावरील केबलमध्ये दुचाकीचे चाक अडकून त्या रस्त्यावर पडल्या. याच वेळेत खासगी बसने त्यांना चिरडले होते.

कुटुंबातील कर्ती महिला गेली

एका कुटुंबाची कर्ती महिला गेल्यानंतर ढगे कुटुंबावर आभाळ कोसळले. त्यांना अपघात होताच नागरिक मदतीसाठी धावले; परंतु बसचालक तेथून पसार झाला. चालक व वाहनाचा पोलिसांनी शोध सुरू केला. तेव्हा सीसीटीव्हीत बस दिसली, त्यावरून पोलिसांनी बसचालक भारत वसंतराव निंगरूकर (वय 62, रा. सिडको एन-आठ) याला ताब्यात घेतले. विशेषत: या चालकाची पोलिसांनी चौकशीही केली. अपघात झाल्यानंतरही निघून गेल्याबाबत विचारल्यानंतर त्यांनी दिलेले उत्तरही अजब होते.

फट्ट असा आवाज आला; पण मला लक्षात आले नाही की नेमके काय झाले. महिलेने काळे कपडे परिधान केले होते म्हणून मला समोर काही दिसले नाही, असे वक्तव्य त्याने केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. लोक मारतील या भीतीने चालक पसार झाला असावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या चालकाला मुकुंदवाडी पोलिासांनी मंगळवारी  (ता. 21) अटक केली आहे. 

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा..

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramnagar Accident Case Follow up