सीतेची अग्निपरीक्षा घेणारा राम महापुरुष कसा? : प्रतिभा रानडे 

Osmanabad News
Osmanabad News

संत गोरोबाकाका साहित्यनगरी, उस्मानाबाद : "माझा देवावर विश्वास नाही. हिंदू धर्मातले देव एकमेकांशी भांडले. राम आणि श्रीकृष्ण ही महाकाव्यातील माणसे आहेत. ते देव नाहीत. सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा राम महापुरुष कसा?'' असा रोकडा सवाल ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी केला. 

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दासू वैद्य, सारंग दर्शने यांनी प्रतिभा रानडे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, काबूल येथील लेखनप्रवासाबबात सखोल चर्चा केली. 

माणसाने धर्माचा बडेजाव केला, पण संस्कृती धर्माहून श्रेष्ठ आहे. हिंदू हा धर्म नाही, तर ती संस्कृती आहे. निसर्गाची पूजा करणे हा सगळ्यात मोठा धर्म आहे. पण आज धर्माचा वापर सत्तेवर येण्यासाठी, भांडणे करण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी केला जात आहे, असे परखड मत प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केले. 

मुस्लिम महिलांच्या प्रश्नांशी कशा जोडल्या गेल्या, याबाबत प्रतिभा रानडे म्हणाल्या, "काबूलमध्ये असताना तेथे दारूबंदी होती. त्यामुळे तेथील मंडळी आमच्या घरी येऊन मद्यपान करायची. यासाठी मी त्यांना अट घातली, की तुम्ही येताना तुमच्या बायकांना येथे घेऊ या. तसे त्यांनी केले. तेव्हा प्रथम या मुस्लिम महिलांशी हितगुज करायची संधी मिळाली. मी एकदा बुरखा घातला, तेव्हा मुस्लिम महिलांचे मन कळाले.'' 

"दिल्लीत राहत असताना अमृता प्रीतम यांच्याशी भेटण्याचा योग आला. भेटीनंतर आमचा स्नेहबंध जुळला. मी अमृता प्रीतम यांच्या "बंद दरवाजा' पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला. एकदा अमृता प्रीतम म्हणाल्या, तुम तो हिंदू है; तो तुम मुस्लिम स्त्री के लिए क्‍यों लढ रही हो? तेव्हा, हिंदू असो की मुस्लिम, ख्रिश्‍चन, सर्व जगातील स्त्रिया सारख्याच आहेत. त्यांची दुःखं सारखी असतात, असे मी त्यांना म्हणाले. त्यावर अमृता प्रीतम यांनी मला "बुरख्याआडच्या स्त्रिया' पुस्तक लिहायला प्रोत्साहन दिले,'' असे प्रतिभा रानडे यांनी सांगितले. 

दुर्गाबाईंशी स्नेह कसा जुळला याबद्दल प्रतिभा रानडे सांगतात, "मुंबई आकाशवाणीवर दुर्गाबाई यांची मुलाखत घेण्यास सांगितली. तेव्हा दुर्गाबाईंनी प्रतिभा रानडे मुलाखत घेत असल्यास मी देईल, असे सांगितले. ही मुलाखत रेखा माजगांवकर यांनी ऐकली. ती खूप छान झाली, असे त्या म्हणाल्या. मग दिलीप माजगांवकर यांनी मला या मुलाखतीचे पुस्तक लिहिण्यास सांगितले. त्यातून दुर्गाबाईंशी एैसपैस बोलण्याची संधी मिळाली. मुंबईमध्ये एशियाटिक ग्रंथालयामध्ये दुर्गा भागवत यांच्याशी माझी पहिली भेट झाली.'' 

दुर्गाबाईंशी झालेल्या वादावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, "स्त्रीमुक्तीवरून वाद झाले. दुर्गाबाई म्हणाल्या कशाला हवी स्त्री मुक्ती? सर्वसामान्य स्त्रियांच्या मनातील वेदना जाणून घेण्यासाठी ती आवश्‍यक आहे, असे मी त्यांना समजावून सांगितले. पण नंतर स्त्रीमुक्ती चळवळीचे स्वरुप बदलले. दुर्गाबाई यांनी स्त्री मुक्ती चळवळीबाबत परकोटीची भूमिका घेतली. ती मला पटली नाही.' 

फैजबद्दल त्या म्हणाल्या, की फैज मार्क्‍सवादी होता. फैज आपल्याला कळलाच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

नागरिकत्व कायदा योग्यच, 
परंतु लोकांना विश्वासात घेतले नाही 

नागरिकत्व कायदा जगात अनेक देशांमध्ये आहे. आपल्याकडेही नागरिकत्व कायदा आणला, तो योग्य आहे. नागरिकत्व कायदा लागू करताना त्याबद्दल लोकांना विश्वासात घेऊन तो समजावून सांगणे आवश्‍यक होते. हा कायदा भारतात लागू करताना सरकारने लोकांना विश्वासात घेतले नाही. आपण लोकशाहीत आहोत; तेव्हा नवीन कायदा करताना लोकांपर्यंत व्यवस्थित पोहचवणे गरजेचे आहे. परंतु आपल्याकडे तसे झाले नाही. त्यामुळे या कायद्याचा वापर आज धर्म, आर्थिक आणि सत्तेसाठी केला जात आहे, असे स्पष्ट मत प्रतिभा रानडे यांनी मांडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com