दहा लाख शेतकरी तुरुंगात जाण्याचे इच्छापत्र सादर करणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

  • शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ राज्यभर छेडणार आंदोलन 
  • किसान मंच राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत निर्णय 

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमुक्‍तीसह, विविध जीवनमरणाच्या मागण्यांवर येत्या सात डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन छेडले जाणार आहे. त्यासाठी सात नोव्हेंबरपासून सात डिसेंबरपर्यंत राज्यभरातून जवळपास दहा लाख शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरूद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर व शांततेच्या मार्गाने प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना तुरूंगात जाण्याचे इच्छापत्र सादर करतील असा निर्णय किसान मंचच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. 

शेतकरी, शेतमजूरांच्या न्याय हक्‍कासाठी लढा देण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यसमितीची बैठक रविवारी (ता.5) औरंगाबादेतील भानुदास चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत अध्यक्षीय भाषणातून शेतकरी, शेतमजूरांच्या आंदोलनाच्या दिशेविषयी किसान मंचचे निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी आंदोलनाची पुढील दिशा विषद केली. या बैठकीला शेतमजूर प्रतिनिधी आमदार जयदेव गायकवाड, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्‍वर टेंभूर्डे, किसान मंच कार्यकारी सदस्य प्रमुख किशोर माथनकर, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शंकर गोडसे, मानवेंद्र काचोळे, शेतकरी जागर मंच प्रमुख प्रशांत गावंडे, भारत कृषक समाजाचे अविनाश आदिक, स्वाभीमानी संघटनेचे गजानन अमदाबादकर, माजी आमदार वसंत बोंडे, खेमराज कौर, दत्ता पवार, शिवाजी बनकर, प्रा. मारोती जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

धोंडगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसह इतर जिव्हाळ्याच्या विविध मागण्यांवर विविध संघटनांची आंदोलने केली. विरोधी पक्षाकडूनही विधीमंडळात आवाज उठविला गेला. न्यायालयीन लढा अशा वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होउनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे शासनाच्या धोरणाविरूद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर मार्गाने माझी तुरूंगात जाण्याची तयारी असल्याचे इच्छापत्र राज्यभरातील जवळपास दहा लाख शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देतील असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित झालेल्या किसान मंचमधील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ निर्णायक लढा उभारण्याची इच्छा व्यक्‍त केली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad marathi news 10 lac farmers ready to go in jail