'प्रत्येक आयुक्ताने ही महापालिका प्रयोगशाळेसारखी वापरली'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे सभा तहकुब 

आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या गैरहजेरीत मंगळवार (ता. 20) सर्वसाधारण सभा तहकुब केली आहे. 

औरंगाबाद : महापालिकेत आलेल्या प्रत्येक आयुक्ताने महापालिकेचा वापर प्रयोगशाळा म्हणूनच केला. येथे आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या मनाप्रमाणेच कारभार केला आहे. आपल्याला महापालिकेची प्रयोगशाळा होऊ द्यायची नाही, एकमताने निर्णय घेऊन सभा सक्षम असल्याचे आपण दाखवून दिले पाहिजे, असे मत व्यक्त करीत महापौर बापू घडमोडे यांनी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या गैरहजेरीत मंगळवार (ता. 20) सर्वसाधारण सभा तहकुब केली आहे. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा कधी नव्हे ती वेळेवर सुरू झाली. सभेत शहरातील निधन पावलेल्या विविध मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच दहावीच्या परिक्षेत महापालिका शाळेतून पहिला क्रमांक मिळवलेल्या नारेगावच्या शाळेतील महेंद्र माणिक मोरे या विद्यार्थ्यांचे, मुख्यध्यापक व शाळेतील शिक्षक तसेच शाळा दत्तक घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर सभागृह नेता गजानन मनगटे यांनी आयुक्त सर्वसाधारण सभेला उपस्थित नसल्याबद्दल सभा तहकुब करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला. त्यास अफसरखान, गंगाधर ढगे, नासेर सिद्दिकी, नंदकुमार घोडेले, प्रमोद राठोड यांनी अनुमोदन देत सभा तहकुब करण्याची विनंती केली. 

नंदकुमार घोडेले यांनी यावेळी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती पुढच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली. 
तत्कालीन आयुक्ता ओमप्रकाश बकोरिया यांनी आपल्या कार्यकाळात विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनपेक्षित विभागात बदल्या करुन टाकल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांअभावी त्यांच्या मूळ विभागातील कामे खोळंबली आहेत, तर बदली झालेल्या विभागाचे या बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांना काम येत नाही. यामुळे विविध विभागाची कामे ठप्प झालेली आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची सभेच्या पटलावर माहिती ठेवण्यात यावी, सभेला त्यावर चर्चा करता येईल, असे घोडेले यांचे म्हणणे होते. आपल्या अधिकारातील बदल्या रद्द करण्याचे काम करण्याऐवजी आयुक्त त्याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागवत असल्याचेही समजते. घोडेले यांच्या या विनंतीची दखल घेत पुढच्या सभेत ही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
घोषणांच्या पावसात शेतकरी कोरडाच
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी

Web Title: aurangabad news commissioner used corporation as lab blames mayor