औरंगाबादेत वीज चोरीचे रिमोट रॅकेट उघड; पंधराजण ताब्यात

योगेश पयघन
शनिवार, 15 जुलै 2017

  • सात जणांना अटक पंधरा जणांची कसून चौकशी सुरु
  • रिमोटच्या साह्याने वीजचोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार
  • पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची माहिती

औरंगाबाद : वीज मीटरला हात देखील न लावता केवळ ‘रिमोट कंट्रोल’ च्या सहाय्याने ‘रिडिंग’ बंद करून अत्याधुनिक पद्धतीने वीज चोरीचा प्रकार महावितरण कंपनीच्या दक्षता व सुरक्षा पथक आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने उघडकीस आणला आहे. त्यात रिमोट तयार करणाऱ्या एका मुख्य आरोपीसह रिमोट वापरणारे सहा जणांना अटक करण्यात आली आले. मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या पंधरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती शनिवारी (ता 15) पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हर्सूल आणि सिडको परिसरात महावितरण व पोलिसांनि केलेल्या संयुक्त कारवाईत चोवीस तासात हे जाळे वाढत जात असूनयाची व्याप्ती किती आहे हे अजून सांगू शकत नाही. हर्सूल येथील किशोर रमेश राईकवार (वय ३६) हा गेल्या अनेक दिवसांपासून मीटर बंद करणारे रिमोट बनवत होता. त्याच्या कारखान्यातील साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह सुरेवाड़ी येथील प्रकाश गायकवाड (वय ४७), अनिल नवले (वय ३७), जाधववाडी येथील सुरेश हिम्मत सुरे (वय ५७), सिडको एन तेरा मधील मारोती जयराम पवार , सिडको एन अकरा येथील सदाशिब बाबुलाल राठोड, जिन्सी येथील जफर शहा अमीन शहा यांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित पोलिस ठाण्यात त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले असून, मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या संशयितांची कसून चौकशी सुरु आहे.

चिनी रिमोटची राष्ट्रीय सुरक्षेला धोका
वीजचोरीसाठी वापरले जाणारे चिनी बनावटीचे रिमोट लाखोंच्या संख्येत देशात येत आहे. राष्टीय सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला धोका देण्याचाच या रिमोटचा उद्देश आहे. रिमोट वापरणारे, विक्री करणारे व बनवणारे यांच्यावर विद्युत अधिनियमांसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. करोडो रुपयांची वीजचोरी या रिमोटच्या साह्याने होत असल्याने विकासाच्या पैशांचीच चोरी होत आहे. या रिमोटवर बंदी आणावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करणार आल्याचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी स्पष्ट केले.

प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असून, या प्रकरणामुळे किती चोरी झाली असेल हे अद्याप सांगू शकत नाही. परंतु, चोरीचा आकडा कोट्यवधींचा असण्याची शक्यता असल्याचे सांगत रिमोट लावण्यात महावितरणचे कर्मचारी सहभागी असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

दोन पद्धतीचे रिमोट
शहरात रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने मीटर बंद करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यापूर्वी मीटरमध्ये लूप टाकून अथवा सेन्सॉर बसवून वीज चोरी होत असे. परंतु, रिमोट कंट्रोलचा हा प्रकार सर्वाना आचंबित करणारा ठरला. वीज चोरीच्या या आधुनिक प्रकारात मीटरला हात न लावता रिडिंग बंद पाडले जाते. घरगुती वापरासाठी ‘सिंगल फेज’ तर बडे उद्योग व व्यावसायिकांसाठी ‘थ्री फेज’ असे मीटरचे दोन प्रकार आहेत. या सर्व मीटर्ससाठी आयएसआय दर्जाच्या साधनांचा वापर केला जातो. परंतु, अतिशय माफक दरात त्याचे रिडिंग बंद करण्याचे तंत्र काही घटकांनी इंटरनेटच्या मदतीने निर्माण केल्याचे उघडकीस आले आहे. त्याकरिता वापरलेली पद्धत सर्वाना चक्रावून टाकणारी आहे. 2013 पूर्वीच्या मीटरसाठी मच्छर मारन्यासाठी वापरनी जाणारी बॅट, एक कॅपेसिडर, एक आयसी, आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साधणाच्या साह्याने हे रिमोट तयार केले जाते. यात मीटरशी छेडछाड करण्याची गरज नाही तर 2013 नंतरच्या मिटरसाठीचे रिमोट हे चिनी बनावटीचे आहे.

मुंबईत या रिमोटची किंमत दोनशे ते अडीचशे रुपये आहे तर शहरात ते दोन हजार रुपयांपर्यंत विकले जाते. यासाठी मीटर मध्ये एक डिव्हाईस जोडावे लागते. ते डिव्हाईस मीटरमध्ये जोडण्याचे काम करणारी टोळी सध्या पोलिसांच्या रडारवर आहे.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: aurangabad news explain power stealing remote rackets