एकेकाळी दहा हजारांसाठी आत्महत्येची वेळ; आता कोटींची उड्डाणे ! 

beed dcc bank.jpg
beed dcc bank.jpg

बीड : ‘साहेब दवाखान्यात आई अॅडमिट आहे, खात्यावरचे दहा हजार रुपये द्या, मुलीचा हुंडा द्यायचाय, लग्न मोडेल, ठेवीचे पैसे द्या म्हणत हेलपाटे, विनवण्या, डोळ्यांतून आश्रु आणि फाशी घेईन, असा उद्वीग्न इशारा. पण, आर्थिकदृष्ट्या कोलमडलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सामान्य ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नव्हती. साधारण २०११ ते २०१५ या काळातील हे सर्वसाधारण चित्र. 

मात्र, मार्च अखेरीच्या बँकेच्या आर्थिक ताळेबंदावर नजर टाकली असता आणि व्यवहार पाहताना आता हे चित्र पुर्णपणे पालटल्याचे दिसत आहे. ग्राहक, खातेदार व ठेवीदारांचा पुन्हा विश्वास संपादन करण्यात बँकेला यश आले असून आता बँक पुर्णत: सक्षमपणे उभी असल्याचे अध्यक्ष आदित्य सारडा म्हणाले.

२०११ च्या सुरुवातीपर्यंत बँकेचे चित्र चांगले होते. मात्र, काही कारणांनी बँकेची आर्थिक घडी इतकी विस्कटली कि आता बँक बुडाली असेच चित्र निर्माण झाले. सामान्य लोक ठेवीसाठी चकरा मारत, रडत, शिव्या घालत, फाशी घेण्याची धमकी देत पण तिजोरी मोकळी असल्याने काही इलाज नव्हता.
दरम्यान, २०१५ मध्ये झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तत्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने विजय मिळविला. मे महिन्यात आदित्य सारडा अध्यक्ष आणि गोरख धुमाळ उपाध्यक्ष झाले. संचालक मंडळातही ऋषीकेश आडसकर, बाबरी मुंडे, नितीन ढाकणे असे अनेक तरुणच. पण, मे २०१५ ते आजघडीपर्यंत बँक ताळ्यावर आणून ताठ कण्याने उभी करण्यात यश आले आहे. 

विशेष म्हणजे हक्काच्या दहा हजार रुपयांच्या रकमेसाठी ज्या बँकेत जेरीस यावे लागत होते ती जिल्हा बँक आता शेकडो कोटींच्या गोष्टी करत आहे. नुसत्या तोंडी गोष्टीच नाहीत तर आर्थिक ताळेबंदातील आकडे बोलत आहेत. बँकेने राज्य सहकारी बँकचे साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज फेडले असून मागेल त्या ठेवीदाराला हवी तेव्हा रक्कम दिली जात असल्याचे आदित्य सारडा म्हणाले. 

उलट विविध गुंतवणूकीतून ११६ कोटी रुपयांचा नफा मिळविला असून पीक कर्जही उद्दीष्टापेक्षा दहा कोटी रुपयांनी (११० कोटी) अधिक वाटप केल्याचे श्री. सारडा म्हणाले. मागच्या तुलनेत तब्बल दोन लाख ९८ हजार खातेदारांची वाढलेली संख्याच बँकेवरील ग्राहक, ठेवीदारांचा विश्वास वाढल्याचा ठोस पुरावा असल्याचेही आदित्य सारडा म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळतात. त्यामुळे गुंतणूक कुठे व कशी करायची हा बँकेचा अधिकार आहे. बँक चालविण्यासाठी पैसा तर उभा करावा लागेल, असेही आदित्य सारडा म्हणाले. 

म्हणून बसली बँकेची आर्थिक घडी
शेतकऱ्यांना वाटप केलेल्या पीक कर्जावरील व्याज परताव्याच थकलेला होता. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून बँकेला तब्बल १११ कोटी रुपयांचा परतावा भेटला. तसेच, पीक विमा, दुष्काळी अनुदान, कापूस नुकसान भरपाई अनुदान यातून २६५३ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वाटपासाठी भेटली. तसेच विमा भरण्यासाठीचे कमिशन यातूनही काही रक्कम भेटली. शेतकऱ्यांचा एक रुपयाही वाटपाचा ठेवला नाही. मात्र, या रकमेचे योग्य नियोजन बँकेची आर्थिक घडी बसण्याच्या कामी आले. तसेच महायुती सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या महत्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून बँकेला पाचशे कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली आहे. त्याचाही बँकेला मोठा फायदा झाला. 

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

असा झाला फरक 
पुर्वी २९२ कोटी रुपये असलेली राखीव निधीची रक्कम आता ६७९ कोटी रुपये आहे तर राज्य बँकेचे ३२२ कोटींचे कर्जही फेडले. गुंतवणूकीचा आकडाही २३९ कोटींवरुन २९७ कोटींवर गेला असून कर्जाची रक्कम १२४८ कोटींवरुन ९६२ कोटींवर खाली आणण्यात यश मिळविल्याचे आदित्य सारडा म्हणाले. खातेदारांची संख्या आठ लाख ८८ हजारांवरुन आता ११ लाख ८६ हजारांवर तर पुर्वी २.२२ टक्क्याने वजा असलेला नफा आता ४४.४६ टक्के आहे. सीआरएआर व नेटवर्थमध्येही वाढ झाल्याचे आदित्य सारडा म्हणाले.


बॅंकच्या कामगिरीवर एक नजर 

- शेतकऱ्यांची बँक पुन्हा ताठ कण्याने उभारतेय
- राज्य बँकेचे ३५० कोटींचे कर्जही फेडले
- गुंतवणूक ५८ कोटींनी वाढवून ११६ कोटींचा नफा  
- व्याज परताव्यातून मिळाले १११ कोटी रुपये
- सामान्यांना मागताच ठेवीची रक्कम
- अनुदान - विम्याचे २६५३ कोटी शेतकऱ्यांना वाटप
- मार्च अखेर १६९० कोटींचे खेळते भांडवल
- तीन लाखांनी वाढली खातेदारांची संख्या


नेत्या पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन आणि संचालक मंडळाची साथ तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळे आम्ही पुन्हा खातेदारांचा विश्वास जिंकू शकलो. शेतकऱ्यांची बँक पुन्हा उभा करता आल्याचे समाधान आहे.
- आदित्य सारडा, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com