घुसखोरी केलेल्या दोन बांगलादेशींना कारावास, लातूरच्या महिलेशी होते संपर्कात.

court_7_0.jpeg
court_7_0.jpeg

लातूर : कोळपा (ता. लातूर) येथील एका महिलेशी व्हॉट्सॲपवरून संपर्कात येऊन तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशाने बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या दोघांना येथील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्ष तीन महिने कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील दहशतवाद विरोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक उमेश कदम यांना (ता. सात जुलै २०१८) ला कोळपा येथे दोन बांगलादेशी नागरिक आल्याची माहिती मिळाली होती. तातडीने त्यांनी तेथे जाऊन छापा टाकला. त्यात कबीर रजाउल ऊर्फ शहाबुल्ला (वय २६) व मोहम्मद मुरनावत हुसेन दिनार (वय २२, रा. फेनी दि. चतुग्राम, बांग्लादेश) हे तेथे मिळून आले होते. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतात येण्याकरिता लागणारी कोणतीही कागदपत्रे नसल्याचे दिसून आले होते.

त्या दोघांना ताब्यात घेऊन येथील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१७/२०१८ कलम तीन सह सहा पारपत्र (भारतामध्ये प्रवेश) नियम १९५०, सहकलम ३ (१) परकीय नागरिक आदेश १९४८, सह कलम १४ ए (६) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोघेही अनधिकृतरीत्या भारतात घुसखोरी करून आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मुख्य न्याय दंडाधिकारी के. एम. कांयगुडे यांनी या दोघांना दोन वर्ष तीन महिने कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

कोळपा येथील एका महिलेशी हे दोघे व्हॉट्सॲपवर संपर्कात आले होते. त्यानंतर या महिलेशी लग्न करण्याच्या उद्देशाने त्यांनी बांगलादेशातून भारतात घुसखोरी केली होती; तसेच त्यांच्याकडे बांगलादेशी चलनही आढळले होते. यात पोलिसांनी त्यांच्याकडून विविध आधारकार्ड, पॅनकार्ड, कागदपत्रे, मोबाइल्स तपासात जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात १३ साक्षीदार तपासण्यात आले. पुराव्यावरून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले होते. न्यायालयाने कोर्ट साक्षीदार म्हणून एक साक्षीदार तपासला होता. त्यानंतर या दोघांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तरोणे यांनी केला होता. न्यायालयात पोलिस उपनिरीक्षक कदम, सहायक पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव, महिला पोलिस उपनिरीक्षक अनिता इटुबोने, पोलिस शिपाई राजेश कंचे, सुहास जाधव, वाजीद चिखेल यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणी अभियोग पक्षाचे कामकाज सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती जे. यू. पवार यांनी पाहिले. 

(संपादन-प्रताप अवचार)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com