कोरोनाच्या कहरात ‘त्या’ ३८ व्हेंटीलेटरवरुन पालकमंत्री-भाजपात रंगला श्रेयवाद 

beed.jpg
beed.jpg

बीड : कोरेाना विषाणूचा जिल्ह्यात कहर वाढत आहे. अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, लोखंडीचे कोविड रुग्णालय व बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पीटल या ठिकाणी कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी पीएम केअर मधून जिल्ह्याला ३८ व्हेंटीलेटर्स मिळाले आहेत. व्हेंटीलेटर्स कोणामुळे भेटले यावरुन पालकमंत्री व भाजपमध्ये श्रेयवाद रंगला आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे व्हेंटीलेटर्स भेटल्याचे पत्रक त्यांच्या कार्यालयातून देण्यात आले. मात्र, पीएम केअरमधून भेटलेल्या व्हेंटीलेटर्सचे फुकटचे श्रेय पालकमंत्र्यांनी घेऊ नये, त्याऐवजी आपली धमक जिल्ह्याला पिक विमा कंपनी आणण्यात दाखवावी, असा टोलाही भाजपने लगावला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिल ठिकाणी जाऊन या व्हेंटीलेटर्सची पाहणीही केली. 

मुंडेंमुळे सिव्हीलला २१ तर स्वारातीला १७ व्हेंटीलटर्स
अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात १७ व्हेंटीलेटर्स मिळाले. यामुळे येथील आरोग्य सुविधांत सुधारणा होत आहे. हे व्हेंटीलेटर्स धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळाल्याचे पत्रक त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिले. त्यानंतर गुरुवारी जिल्हा रुग्णालयाला १२ व लोखंडीच्या कोविड रुग्णालयाला नऊ असे २१ व्हेंटीलेटर्स धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळाल्याचा दावा पत्रकात करण्यात आला. पालकमंत्री मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेस बळकटी देण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला अधिकाधिक सुविधा व यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात पालकमंत्री अग्रेसर असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष अतिदक्षता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. अंबाजोगाईत प्रयोगशाळा व प्लाझ्मा थेरपी सेंटर देखील त्यांच्यामुळे मंजूर झाल्याचे पत्रकात म्हटले आहे.

खासदार मुंडे यांच्यामुळे व्हेंटीलेटर्स : आमदार मुंदडा

बीड जिल्ह्यात कोरोना कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून अशा रुग्णांवरील उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून  जिल्ह्याला ३८ व्हेंटीलेटर मिळाले. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्हेंटीलेटरसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्यामुळेच व्हेंटीलेटर्स मिळाल्याचे केजच्या आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या.

अत्यावस्थ कोरोना प्रभावित रूग्णांना उपचारासाठी व्हेंटीलेटरची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार मुंडे यांनी जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयातून मुबलक व्हेंटीलेटर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पंतप्रधानांकडे केली होती. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात १२, अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाला १७ व लोखंडी सावरगावच्या रूग्णालयात नऊ व्हेंटीलेटर देण्यात आल्याचे मुंदडा म्हणाल्या. दरम्यान, नंदकिशोर मुंदडा, सारंग पुजारी, संतोष लोमटे, वैजीनाथ देशमुख आदींनी या व्हेंटीलेटर्सची पाहणीही केली. 

व्हेंटीलेटर्स पीएम केअरमधूनच; पालकमंत्र्यांनी फुकटचे श्रेय लाटू नये : मस्के

कोरेानाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने पंतप्रधान सहाय्यता निधीतून जिल्ह्यासाठी ३८ व्हेंटिलेटर प्राप्त झाले. कोरोना विषाणूच्या परिस्थितीत केंद्र सरकारकडून उत्तम आरोग्य सुविधेसाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात येत आहे. याचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला. त्यांनी आपली धमक जिल्ह्यात पिक विमा कंपनी आणण्यासाठी दाखवावी, असेही श्री. मस्के म्हणाले. 

केंद्र सरकारच्या सुविधा आणि पुरवठा केलेल्या उपकरणावर आपली स्वतःची पाठ थोपटून घेण्यात पालकमंत्री मशगुल आहेत. फुकटचे श्रेय घेण्यासाठी पालकमंत्र्यांची झेप अनाठायी आहे. शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यास तयार नाहीत, बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली, युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे, कर्जमाफीसाठी शेतकरी चिंतातुर आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

ज्या जिल्ह्याला पिक विमा कामासाठी गौरवण्यात आले त्याच जिल्ह्याला आज पीक विमा कंपनी मिळत नाही अशा अनेक समस्यांना जिल्ह्यातील जनता तोंड देत असताना पालकमंत्री मात्र दुर्लक्ष करून फुकटचे श्रेय घेत असल्याचेही राजेंद्र मस्के म्हणाले. दरम्यान, श्री. मस्के यांच्यासह विक्रांत हजारी, भगीरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, सुनील मिसाळ, बबलु ढाकणे, स्वप्नील कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी यांनी या व्हेंटीलेटर्सची पाहणी केली.

संपादन : प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com