स्कॉलर आयआयटीएन ते डॅशिंग IPS, पंकज कुमावत यांचा प्रेरणादायी प्रवास | IPS Pankaj Kumavat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPS Pankaj Kumavat
स्कॉलर आयआयटीएन ते डॅशिंग IPS, पंकज कुमावत यांचा प्रेरणादायी प्रवास

स्कॉलर आयआयटीएन ते डॅशिंग IPS, पंकज कुमावत यांचा प्रेरणादायी प्रवास

बीड : घरी गुंठाभर जमिन नाही. आजोबा गवंडी कामाबरोबरच लोकांची शेती वाट्याने करत. पुढे आई - वडिल देखील टेलरींगचे काम करत. मात्र, आई-वडिलांचे कष्ट आणि पुण्य फळाले आणि तिन्ही मुलांनी यशोशिखर गाठले. पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणावे असे दोन मुले आयपीएस आणि एक मुलगा डॉक्टर झाला. भाग्यवान आई वडिलांचेही पांग या पुत्रांनी फेडले आहेत. हा प्रेरणादायी प्रवास आहे सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत (IPS Officer Pankaj Kumavat) यांचा. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) परिविक्षाधिन अधिकारी असलेले पंकज कुमावत सध्या केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बड्या राजकीय नेत्यांच्या गुटख्याचे साठे, पत्त्याचे क्लब उद्धस्त करण्यासह जिल्ह्यातील अवैध गुटखा, क्लब, बायोडिझेल अशा धडाकेबाज कारवायांनी पंकज कुमावत चर्चेत असून सामान्यांमध्ये सध्या (Beed) त्यांची चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे. धडाकेबाज कारवायांसह त्यांचा व्यक्तीगत जीवनाचा प्रवासही खडतर आणि प्रेरणादायी आहे. राजस्थानमधील झुंझुनूचे रहिवासी असलेल्या राजेश्वरी व सुभाष कुमावत दाम्पत्याच्या चार मुलांपैकी पंकज कुमावत थोरले आहेत. त्यांचा धाकटा भाऊ अमित देखील आयपीएस (भारतीय पोलिस सेवा IPS), तर संजय डॉक्टर होऊन शल्यविशारद तज्ज्ञ (एमबीबीएस, एमएस) आहेत. त्यांना एक विवाहित बहिण आहे.(IPS Pankaj Kumavat's Inspirational Journey From Poor Family To Police Officer)

IPS Officer Pankaj Kumavat

IPS Officer Pankaj Kumavat

हेही वाचा: IPS कृष्णप्रकाश यांनी फेकला ओंडका...पोलीस-गुंडांमध्ये धुमश्चक्री

स्कॉलर स्टुडंट, आयआयटीमधून अभियंता

कुमावत कुटूंबातील चार भावंडांपैकी थोरले असलेले पंकज शालेय जीवनापासून हुशार विद्यार्थी होते. २२ डिसेंबर १९९२ ला जन्मलेल्या पंकज कुमावत यांनी २००७ साली दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळविले. २००९ साली १२ वी विज्ञान परीक्षेत त्यांनी ८९.६० टक्के गुण मिळविले. गणित विषयात रुची असलेल्या पंकज कुमावत यांनी दिल्ली आयआयटीमधून अभियांत्रिकीची डिग्री मिळविली. २०१४ साली आयआयटीमधील (IIT) अभियांत्रिकीची पदवी हाती असलेल्या पंकज कुमावत यांच्यासमोर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्यांसाठी लाल गालिचे अंथरले. त्यांनी नोएडास्थित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बिझनेस अॅनालिस्ट म्हणून नोकरीला सुरुवात केली. कंपनीने त्यांना १० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज आणि अनेक सुविधाही पुरविल्या. त्या ठिकाणी त्यांनी दोन वर्षे नोकरी केली.

हेही वाचा: MPSC विरोधात लिहाल तर...;आयोगाचा विद्यार्थांना इशारा

म्हणून सोडली दहा लाखांची नोकरी

बहुराष्ट्रीय कंपनीत बिझनेस अॅनालिस्ट म्हणून नोकरी करणाऱ्या पंकज कुमावत यांना दहा लाख रुपयांचे पॅकेज, अलिशान गाडी आणि बंगल्यासह अनेक सुविधा होत्या. नोएडासारख्या ठिकाणी शहरी लाईफ जगण्यासाठी सगळ्या बाबी त्यांच्या हाती होत्या. परंतु, सामान्यांशी कनेक्टीव्हिटी नव्हती. भारतीय प्रशासन सेवा किंवा भारतीय पोलिस सेवेत गेले तर सामान्यांसाठी काही तरी करता येते, समाज बदलता येतो, घडविता येतो, असा विचार कायम त्यांच्या मनात घोळायचा. म्हणून त्यांनी अलिशान जीवनपद्धती सोडून परीक्षेच्या तयारीसाठी २०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली.

हेही वाचा: 'UPSC' मध्ये अपयश; IAS अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच...

शिकवणी नाही, सेल्फ स्टडी अन॒ दुसऱ्याच प्रयत्नात यश

२०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची त्यांनी दिल्लीत तयारी सुरु केली. त्यांनी कुठलीही शिकवणी लावली नाही. सेल्फ स्टडी करतानाच पहिल्यांदा २०१७ साली दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेतही त्यांना यश मिळाल्याने ते मुलाखतीपर्यंतही पोचले. मात्र, निवड यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. पुढे २०१८ सालच्या परीक्षेत त्यांना ४२३ वा रँक मिळाला. त्यांना भारतीय पोलिस सेवेतील महाराष्ट्र केडर मिळाले. त्यांनी ट्रेनिंग देखील सुरु केली. नंतरही त्यांनी पुन्हा एकदा भारतीय प्रशासन सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना पुन्हा एकदा भारतीय पोलिस सेवेचेच केडर मिळाले. त्यांच्या पत्नी लांची प्रजापत या एलएलएम आहेत.

हेही वाचा: IPS अधिकाऱ्याने सांगितली अक्षय कुमारच्या 'त्या' फोटोमधील चूक

भाग्यवान माता - पित्यांचे आई वडिलांचे तिन्ही पुत्रांनी फेडले पांग

पंकज कुमावत यांच्या कुटुंबात गुंठाभरही जमिन नाही. आजोबा लोकांची जमिन वाट्याने करत. त्याच बरोबर गवंडी कामही करत. पुढे त्यांचे वडिल सुभाष व आई राजेश्वरी दोघेही टेलरींगचे काम करत. चार मुलांच्या कुटूंबाचे पालन-पोषण आणि शिक्षण करताना या दाम्पत्याला तारेवरची कसरत करावी लागली. पंकज कुमावत यांच्यासह सगळे भावंडे ही परिस्थिती जवळून बघत. अनेकदा नातेवाईकांकडून शिक्षणासाठी मदत घ्यावी लागे. पण, मुले मात्र हुशार, अभ्यासू, जिद्दी आणि कष्टाळू निघाली. म्हणतात ना पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याप्रमाणे पंकज, अमित आणि संजय या तिन्ही पुत्रांनी आई वडिलांचे पांग फेडले. दोघे भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) तर एक डॉक्टर झाला. विशेष म्हणजे लहान भाऊ अमित देखील दुसऱ्याच प्रयत्नात आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) झाले आहेत. आई - वडिलांच्या कष्टाचे आणि पुण्याईचे फळ मुलांनी यशाच्या माध्यमातून दिले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UPSCIPS
loading image
go to top