
केवळ पोलिसांची बदनामी नको म्हणुन जर फिर्यादीची कैफीयतच पोलिस बदलत असतील तर औशात चालले आहे तरी काय?
औसा (जि.लातूर) : गेल्याच महिन्यात आजी माजी सैनिकाचे घर फोडून लाखों रुपयांचा ऐवज लुटत घरातील लोकांना गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना व या दोन्ही चोऱ्यांचा तपास लागला नसताना येथील कादरी नगरमध्ये भर दुपारी दहा वर्षांच्या मुलीच्या गळ्याला चाकु लाऊन पाच तोळे दोन ग्रॅम सोन्याचे दागिने लुटल्याची घटना सोमवारी (ता.15) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. घरात ही लहान मुलगी व तिची आईच असल्याने वॉशिंग पावडर विक्री करण्याच्या निमित्ताने आलेल्या दोन व्यक्तींनी घर लुटल्याने शहरात आता दहशत पसरली आहे. औशात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असतांना येथील पोलिस कोमात गेल्याचे दिसुन येत आहेत.
या बाबत माहिती अशी की, येथील कादरीनगरमध्ये राहणारे राम शिंदे हे व्यापारानिमित्त सोमवारी घराबाहेर होते व त्यांचे दोन मुलेही शिकवणीला गेले होते. यावेळी घरात फक्त राम शिंदे यांच्या पत्नी शीतल शिंदे व दहा वर्षांची त्यांची मुलगी शर्वरी या दोघीच होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी तरुण उज्ज्वला कंपनीचे कपडे धुण्याचे पावडर घेऊन आले आणि त्यांना पावडर घ्यावयाचे आहे का असे विचारले. त्यांनी मला पावडर नको म्हणत असतांना शितल शिंदे यांना एकाने बोलण्यात गुंतवून ठेवले तर दुसऱ्याने त्यांची नजर चुकवुन घरात प्रवेश केला व पाच तोळे दोन ग्रॅम सोने ठेवलेला डब्बा घेऊन निघुन गेला.
थोड्यावेळाने बोलत असलेला दुसरा व्यक्तीही निघुन गेल्यावर शितल शिंदे घरात आल्यावर त्यांना सोने चोरी झाल्याचे दिसुन आले. त्यांनी या बाबत शेजाऱ्यांना प्रकार सांगितल्यावर या दोघांचा शोध घेतला. परंतू ते दिसुन आले नसल्याने शितल शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात दोन व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.
फिर्याद दिली एक अन् नोंदवली एक
सदर घटनेची फिर्याद शितल शिंदे यांनी गळ्याला चाकु लावून सोने लुटल्याची दिली असतांना पोलिसांनी प्रथम खबरीत चोरट्यांनी नजर चुकवून ही चोरी केल्याचे नमुद केले आहे. पोलिसांनी ही चुकीची फिर्याद नोंदवली असुन खरी घटना माझ्या मुलीच्या गळ्याला चाकु लावून धाक दाखवुन माझे घर लुटल्याची असतांना पोलिसांनी फिर्याद वेगळी का घेतली हे मलाही समजेनासे झाले असल्याची प्रतिक्रिया राम शिंदे यांनी सकाळशी बोलतांना दिली आहे. केवळ पोलिसांची बदनामी नको म्हणुन जर फिर्यादीची कैफीयतच पोलिस बदलत असतील तर औशात चालले आहे तरी काय? असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि त्यावर मुग गिळुन बसलेले पोलिस यामुळे शहरात सध्या दहशत पसरली आहे.
वाचा मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
संपादन - गणेश पिटेकर