तुळजापुरात नवरात्रोत्सवाची सांगता, होमकुडांत अजाबळी अर्पण.

जगदीश कुलकर्णी
Sunday, 25 October 2020

 
होमकुंडात अजाबळी अर्पण केल्यानंतर घटोत्थापन

तुळजापूर (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात रविवारी (ता.२५) होमकुंडात अजाबळी अर्पण करण्यात आला. त्यानंतर घटोत्थापन झाले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कोरोनामुळे यंदा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने झाला. भाविकांना दर्शनासाठी प्रवेश नव्हता. तरीही महाद्वारासमोर भाविकांची वर्दळ पहायला मिळत होती. नवरात्रोत्सवाची आज सांगता झाली. सकाळी देवीचा नित्योपचार अभिषेक झाला. सकाळी दहाच्या सुमारास सिंदफळ (ता.तुळजापूर) येथील गणपत गजेंद्र लांडगे यांनी अजाबळी आणला. दुपारी पावणेबाराच्या सुमारास मंदिरातील होमकुंडावर अजाबळीची पूजा झाली. रक्तभैरवाची पूजा करून अजाबळीस पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. जीवन वाघमारे यांच्या हस्ते धार्मिक विधी झाला. होमकुंडात अजाबली अर्पण केल्यावर मंदिरातील उपदैवतांना वस्त्र देण्यात आली. जीवन वाघमारे, गणपत लांडगे यांना मंदिर समितीतर्फे आहेर देण्यात आला. त्यानंतर घटोत्थापन झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंदिरात नैवेद्य दाखविण्यासाठी तिन्हीही पुजारी मंडळाच्या सदस्यांना पासची सुविधा होती. खंडेनवमी आणि घटोत्थापनानिमित्त भाविक दाखल झाले होते. अनेकांनी त्यांचे पारंपरिक नैवेद्य मंदिरासमोरूनच दाखविले. दरम्यान, सोमवारी (ता.२६) पहाटे तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन होणार आहे. 
तुळजाभवानी मंदिर समिती तसेच कोल्हापूरच्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सायंकाळी शस्त्रपूजन झाले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाद्वारातून दाखविले नैवेद्य 
तुळजापूर शहरातील प्रत्येक घरातून तुळजाभवानीमातेस नैवेद्य दाखविला जातो. महानवमीला सुमारे दहा हजार नैवेद्य दाखविले जातात. यंदा कोरोनामुळे मंदिरात प्रवेश नसल्याने नागरिकांनी महाद्वारातूनच नैवेद्य दाखविले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Tuljapur festival Concluding Ajabali offering Homkudan