प्रॅक्टीकलच्या गुणांची किमया न्यारी...दहावीच्या निकालाची गगनभरारी..!

practical mark.jpg
practical mark.jpg

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल १८.२० टक्क्यांनी वधारला आहे. सर्व विषयासाठी विद्यार्थ्यांना मिळालेल्या अंतर्गत गुणांने (प्रॅक्टीकल) ही किमया केली असून यामुळे निकालाने गगनभरारी घेतल्याचे दिसत आहे. याचा परिणाम शाळांचाही निकालही कमालीचा वधारला असून राज्यात दहावीचा शून्य टक्के निकालांच्या शाळांची संख्या बोटावर मोजण्याइतपत कमी झाली आहे.

दहावी परीक्षेसाठी सन २००९ पासून सर्व विषयांसाठी अंतर्गत मुल्यमापनाची परीक्षा घेण्यात येते. यात प्रत्येक विषयासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा मंडळाकडून तर २० गुण शाळेकडून देण्यात येत होते. दहा वर्ष सुरू असलेल्या गुणांच्या खेळांतून केवळ पासांची फळी तयार होत असल्याची भावना निर्माण झाली. यामुळे मार्च २०१९ च्या परीक्षेपासून मंडळाने अंतर्गत गुणांचा फंडा बऱ्यापैकी कमी केला. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाची (सीबीएसई) बरोबरी करण्याच्या प्रयत्नांतून गेल्यावर्षी मंडळाने केवळ गणित आणि विज्ञान या दोनच विषयासाठी अंतर्गत मुल्यमापनाची अर्थात प्रात्यक्षिक (प्रॅक्टीकल) परीक्षा घेतली. दोन्ही विषयासाठी लेखी परीक्षा ८० गुणांची तर प्रॅक्टीकल परीक्षा २० गुणांची घेतली. याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास झाले. राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के एवढा कमी लागला होता. मागील दहा वर्षाच्या तुलनेत हा निकाल सर्वात कमी होता.

यामुळे सीबीएसईची बरोबरी बाजूला ठेवत राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे यंदाच्या परीक्षेपासून सर्व विषयांसाठी अंतर्गत मुल्यमापन सुरू केले. यात भाषा विषयासाठी तोंडी तर सामाजिक शास्त्रे, गणित व विज्ञान तंत्रज्ञान विषयासाठी अंतर्गत मुल्यमापनाची परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक विषयाच्या अंतर्गत २० गुणांवर शाळेची मक्तेदारी आली आणि सर्वच विद्यार्थ्यांना सढळ हातांने गुण मिळाले. 

यासोबत कोरोनामुळे रद्द झालेल्या भुगोल विषयाला सरासरी गुण मिळाले. पाच विषयात पडलेल्या गुणांच्या सरासरीनुसार भुगोल विषयाला गुण देण्यात आले. मंडळाने हा फार्म्युला शेवटपर्यंत बदलला नाही. भुगोलाच्या गुणांचा निकालाच्या वाढीला आधार मिळाला. यामुळे यंदाच्या निकालात भरीव वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत १८.२० टक्क्यांनी निकाल वाढला आहे. वाढलेला निकाल हा अंतर्गत मुल्यमापनाच्या २० गुणांचाच असून वाढलेल्या निकालावर या गुणांचांचा प्रभाव दिसून येत आहे.

शाळांचाही निकाल वधारला
अंतर्गत मुल्यमापनाच्या गुणांमुळे यंदा शाळांचा निकालाही वाढला असून राज्यात शून्य ते दहा टक्के निकाल लागलेल्या केवळ २८ शाळा पुढे आल्या आहेत. दहा ते २० टक्के निकालाच्या चार, २० ते ३० टक्के १९, ३० ते ४० टक्के ३४, ४० ते ५० टक्के ८६, ५० ते ६० टक्के १५४, ६० ते ७० टक्के ३२७, ७० ते ८० टक्के ८८८, ८० ते ९० टक्के दोन हजार ८१३, ९० ते ९९.९९ टक्के नऊ हजार ८५७ तर १०० टक्के निकालांच्या शाळांची संख्या आठ हजार ३६० आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com