
बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा एन्काउंटर करण्याची सुपारी मला मिळाली होती, असा दावा निलंबित व वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे.
याबाबतचा व्हिडिओ कासले याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वाल्मीक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला पाच, दहा कोटींपासून ५० कोटी रुपयांपर्यंतची सुपारी होती, असा दावाही त्याने केला आहे.
सायबर पोलिस ठाण्यात नेमणूक असताना तपासाच्या नावाखाली गुजरात राज्यात जाऊन दबाव टाकून पैसे मागितल्याचा व्हिडिओ समोर आल्याने रणजित कासले याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर महिनाभरापासून तो अनेक वादग्रस्त वक्तव्ये, आरोप करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत आहे.
आता कासलेने वाल्मीक कराडचे एन्काउंटर करण्याची सुपारी होती, असा दावा एका व्हिडिओतून केला आहे. त्यात ‘यावर मी म्हणालो, हे पाप माझ्याकडून होणार नाही. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करू शकतो. याच्यामध्ये दम आहे, म्हणून मला ऑफर होती’, असे म्हणताना तो दिसतो.
‘पोलिसांची चार लोकांची टीम आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक होते. बैठकीत विचार केला जातो, काय करायचं. त्यानंतर पाच-सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते, ती घटनास्थळी जाते, जशी अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेली असेल. एक अधिकारी, दोन अंमलदार, हवालदार अशी टीम असते’, असेही कासलेने या व्हिडिओत म्हटले आहे.
कासलेवर ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा
बीड - पोलिस दलातून निलंबित केल्यानंतर सतत सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य, आरोपांचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या रणजित कासलेवर ‘अॅ्ट्रॉसिटी’नुसार गुन्हा नोंद झाला आहे. लातूर लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या प्रकरणात येथील वकील भगवान कांडेकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कासलेच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कासलेवर गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.