साहेब ! खरीप ही संपला, अजून ही पीककर्ज मिळेना; उमरग्यातील शेतकऱ्यांची आर्तहाक !   

crop loan.jpg
crop loan.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची सर्वाधिक फरफट झाली. त्यात खरिप हंगामातील उत्पन्नही राम भरोसे झाले. हंगामाच्या प्रारंभी पीक कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयकृत बँकाची चालढकल सुरु होती. प्रशासनाने वेळोवेळी सुचना दिल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू झाली.

२३ सप्टेंबर पर्यंत तालुक्यातील तेरा हजार ४८६ शेतकऱ्यांना ८५ कोटी ९३ लाख ८८ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यातील नऊ हजार ७५१ शेतकऱ्यांना ५१ कोटी ४८ लाख ९७ हसार रूपयाचे कर्ज नूतनीकरणाच्या प्रस्तावातुन मंजूर झाले आहेत. तर अजूनही तालुक्यातील अनेक शेतकर्यांना पिककर्ज मिळाले नसून साहेब, खरीप ही संपला अजूनही पिककर्ज मिळेना, अशी आर्त विनवणी बॅंक अधिकार्यांकडे  करत असल्याचे चित्र आहे. 

तालुक्यातील एकुण शेती क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र खरिप हंगामातील पीकाचे असते त्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे अर्थ गणीत असते. यंदा लॉकडाउनमुळे शेतकरी अडचणीत आला. शेतकऱ्यांना जुन पूर्वी अथवा त्यानंतर वेळेत पेरणीसाठी पीक कर्जाची आवश्यकता असते. पेरणीच्या खर्चाचे मेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे असताना खरीप पेरणीसाठी मिळणारे पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. हंगाम संपत आला तरी कांही राष्ट्रीयकृत बँका जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.

१३,४८६ शेतकऱ्यांना ८५ कोटी ९३ लाख पीक कर्ज वाटप
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शहर व तालुक्यातील अठरा राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ति बँकेच्या चौदा शाखेच्या मार्फत कर्जवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गटसचिवाकडे पीककर्जाचे प्रस्ताव सादर करण्याची सुविधा करण्यात आली आहे. पडताळणीनंतर प्रस्ताव बँकाकडे जात आहेत. २०१९-२००० खरिप पिक कर्जासाठी भारतीय स्टेट बँक उमरगा मुख्य शाखेतून एकही  रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले नाही. तशी माहिती उपलब्ध आहे. भारतीय स्टेट बँकने (शिवाजी चौक शाखा) नवीन ३३६ तर नूतनीकरणाचे तेरा प्रस्ताव मंजूर करून दोन कोटी ९५ लाख ३७ हजार रुपये मंजूर करण्यात आले. भारतीय स्टेट बँकेच्या गुंजोटी शाखेतून नवीन १६७ तर नूतनीकरणाचे पन्नास प्रस्ताव मंजूर करून दोन कोटी दोन लाख रुपयाचे कर्ज देण्यात आले. भारतीय स्टेट बँकेच्या मुरुम शाखेतून नवीन ३६० तर नूतनीकरणाचे ८९ कर्ज प्रस्तावावर मंजूर करून सहा कोटी पन्नास लाख अठरा रुपयाचे कर्ज देण्यात आले. 

भारतीय स्टेट बँकेच्या दाळींब शाखेतून नवीन ३५९, नुतनीकरणाचे ४२ कर्ज प्रस्तावासाठी तीन कोटी ३७ लाख रुपये, बलसूर शाखेत नवीन ३२८, नुतनीकरणाच्या तीन कर्ज प्रस्तावासाठी तीन कोटी ३२ लाख ४३ हजार रुपयाचे कर्ज वितरीत करण्यात आले. माडज शाखेतून नवीन ३९७, अकरा नूतनीकरण सभासदासाठी तीन कोटी ७२ लाख कर्ज मंजूर करण्यात आले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या उमरगा, मुरुम व येणेगुर शाखेतुन नवीन एक हजार ५९७ तर नूतनीकरणच्या ७१३ प्रस्तावासाठी एकूण २७ कोटी ६९ लाख ७४ हजाराचे पीककर्ज मंजूर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उमरगा, तुरोरी, गुंजोटी, आलूर व नाईचाकूर शाखेतुन नवीन एक हजार ५२५ तर नूतनीकरणच्या एक हजार २४५ प्रस्तावासाठी एकूण २२ कोटी २६ लाख ७७  हजाराचे पीककर्ज मंजूर करण्यात आले आहे. आर.बी. एल. बँकेमार्फत नवीन ३०, नुतनीकरणाचे नऊ प्रस्तावासाठी ७७ लाख आठ हजाराचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या चौदा शाखेत  नवीन ९४ आणि नुतनीकरणाच्या सात हजार ६२० सभासदासाठी २८ कोटी ३६ लाख २९ हजार रुपयाचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.  दरम्यान आय. सी.आय. सी. आणि एच.डी.एफ.सी उमरगा शाखेतून एकही कर्ज प्रस्ताव मंजूर नाहीत. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com