उमरगा : 'त्या' औषध विक्रेत्याचा कोरोनाने मृत्यू, तर एकोंडीतील दोघांना कोरोना 

अविनाश काळे
Sunday, 12 July 2020

शुक्रवारी (ता.१०) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका औषध विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आठ दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या एकोंडी (जहागीर) येथील व्यक्तीच्या संपर्कातील दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.

उमरगा : शहर व तालुक्यात सोळा दिवसाच्या कालावधीत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी (ता.११) रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालात सात पॉझिटिव्ह रूग्ण आल्याने बाधितांची संख्या ५६ वरून ६३ झाली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.१०) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका औषध विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आठ दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या एकोंडी (जहागीर) येथील व्यक्तीच्या संपर्कातील दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

शहर व तालुक्यात कोरोना संसर्गामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 
शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात सतरा पैकी चार पॉझिटिव्ह आले होते. त्यात पहिल्यांदाच एका खाजगी डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परिचारिकेचा एक मुलगा, कुंभारपट्टी भागातील एक सेवानिवृत्त शिक्षक तर मुरुमचा एक चहावाल्याचा समावेश आहे. दरम्यान परिचारिकेचा पती पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला होता. आता मुलासह एकाच घरातील तिघे पॉझिटिव्ह आले आहेत.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

शनिवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात औषध विक्रेत्याचा समावेश असून तो बालाजी नगर येथे रहातो. सध्या मेडिकल दुकानात त्याचा मुलगा रहात होता. प्रशासनाने या दुकानलगतचे अन्य दुकाने बंद केली आहेत. दोन जूनला सकाळी पूण्याहून गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एकोंडी (जहागीर) येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आता त्याचा एक मुलगा व दुसऱ्या मुलाच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मयताच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

बेडग्याच्या पती-पत्नीचा अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांच्या एका मुलाचा व मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते शहरातील पतंगे रोड भागात रहातात. आरोग्यनगरमध्ये भारत विद्यालयाच्या पाठीमागील रहाणाऱ्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो सारीच्या आजाराने त्रस्त होता. आरोग्यनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका ४० वर्षीय तरुणाचा अहवाल उस्मानाबाद येथून पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा तुरोरीत सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्याला चार दिवसापूर्वी उस्मानाबादला पाठविण्यात आले होते.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

दरम्यान उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर आदींनी बालाजी नगर, आरोग्य नगर भागाला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील हॉयरिस्कची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

आत्तापर्यंतची एकुण संख्या ८०
उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रूग्ण संख्या ऐंशी झाली आहे. त्यात बेडग्याच्या एका जेष्ठ नागरिकाचा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता, बलसूरच्या एका जेष्ठ नागरिकाचा लातूरला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. एकोंडी (जहागीर) च्या ५२ व वर्षीय व्यक्तीचा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता तर १० जूनला उपजिल्हा रुग्णालयात एका औषध विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या सोळा दिवसात तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान उमरगा शहरातील रुग्ण संख्या ३८ झाली असून संसर्ग वाढत चालल्याने एकुणच नागरिकांमध्ये कोरोना विषयीची भिती वाढली आहे.

संपादन : प्रताप अवचार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga medicine celler death of corona