महामार्ग नव्हे मृत्यूचा सापळा, जागोजागी खड्डे अन् असुरक्षितता!

umraga news.jpg
umraga news.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केलेले चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम अजूनही अर्धवटस्थितीत आहे. महामार्गावरील गावात सूरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान महामार्गावर निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने वारंवार महामार्गावर खड्डे पडत आहेत, त्याच्या दुरुस्तीला विलंब केला जातोय. येळी, शिवाजीनगर तांडा, दाळींब, येणेगुर या गावाजवळील महामार्गावरील खड्डे मृत्युला आंमत्रण देत आहेत. 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार यांचा दुर्लक्षितपणा आणि लोकप्रतिनिधीचे अप्रत्यक्ष पाठबळ यामुळे महामार्गावरील असूरक्षितता धोकादायक ठरत आहे. उस्मानाबाद जिल्हयातील हद्दीतील खानापूर पासुन महाराष्ट्र-कर्नाटक सिमेपर्यंतच्या शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणाच्या कामाची मूळ किंमत ९२२ कोटी आहे. चौपदरीकरणाच्या कामाबाबतच्या सर्वे २०११ पासून सुरू झाला होता. २०१३ मध्ये कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सोलापूरच्या एसटीपीएल कंपनीने कामाचा ठेका घेतला. शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणासाठी जवळपास तीनशे हेक्टर जमिन संपादित करण्यात आली. २०१६ मध्ये कामाची मुदत संपल्याने भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, कंपनीने कामासाठी आलेल्या अडचणीचे विवेचन उत्तरादाखल महामार्गाकडे सादर केले होते. गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम मुदतवाढ मिळाल्यानंतर डांबरीकरणाचे काम मात्र जवळपास पूर्ण झाले आहे. मुरूम मोड, आष्टामोड, जकेकूर चौरस्ता येथील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. सूरक्षिततेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी उपाययोजना नसताना सहा महिन्यापूर्वी इटकळ व तलमोड गावाजवळील दोन टोलनाक्यावर कर वसूली सुरू आहे. 

महामार्गावर अनेक अडथळे !

चौपदरीकराचे डांबरीकरण झालेले असले तरी महामार्गावर अनेक ठिकाणी अडथळे कायम आहेत. कांही ठिकाणी नव्याने झालेले काम उखडल्याचा प्रकार दिसून येत आहे. आष्टामोडवरील पुलाचे काम अर्धवट स्थितीत लटकले आहे. येणेगुर गावात सूरक्षिततेच्यादृष्टीने काम झालेले असले तरी गावाजवळच उखडलेल्या रस्त्याचे नव्याने काम केले जात नाही. मुरूम मोडवरील उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. दाळींब, येळी गावातही सूरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. धोकादायक ठिकाण असलेल्या बलसुर मोड येथे भूयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची मागणी करूनही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडुन दखल घेतली गेली नाही. ऐन महामार्गालगत असलेल्या जकेकुर गावातही सुरक्षित मार्ग नसल्याने अपघात होताहेत. जकेकूर - चौरस्ता येथील उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. मुळजमोड वरील उड्डाणपुलाचे काम अजुनही पूर्ण झालेले नाही. महामार्गावरील हॉटेल सोनाई समोरून बाह्य वळण रस्ताकडे व शहराकडे जाणाऱ्या मार्गावरील कॉर्नर धोकादायक बनले आहे.

भागिरथी हॉटेलजवळ संपणाऱ्या बाह्यवळणाठिकाणीही योग्य उपाययोजना नसल्याने या ठिकाणी अपघात होताहेत. दाबका ग्रामस्थांनी भूयारी मार्ग अथवा उड्डाणपुल करण्याच्या मागणीसाठी रस्त्याचे काम अडवले होते मात्र सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करता दडपशाहीने डांबरीकरणाचे काम आटोपण्यात आले. मुळजमोडवरील उड्डाणपुलाचे काम अजुनही पूर्ण झालेले नाही. दरम्यान ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळे अपघात वाढले असताना नागरिकांच्या जीवन मरणांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या संबंधित कंपनी व प्रशासनाबद्दल वहानधारक व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असुन अनेकांच्या नशीबी अंपगत्व आले आहे.

"राष्ट्रीय महामार्गावरील गावासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गाची व्यवस्था केली गेली नाही. बलसूरमोड तर अपघाताचे केंद्र आहे, नेहमी रहदारीचा हा मार्ग आहे. उड्डाण पुल, भुयारी मार्ग करण्याची मागणी अनेक वेळा केली, परंतु याची दखल घेतली जात नाही. महामार्गावरील खड्याची वेळेवर दुरूस्ती केली जात नाही. -
प्रा. सुरेश बिराजदार,  जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com