उन्हातान्हाची तमा न बाळगता'त्यांचे' चालणे सुरूच...

File Photo
File Photo

ठाणे : आकाशात सूर्य आग ओकत आहे, पण त्यांचे चालणे काही थांबत नाही. मनात एकच चलबिचल सुरू आहे; कधी एकदाचे घर गाठतो. भर उन्हात रस्ता तुडवत लवकरात लवकर घर गाठायचे हीच खूणगाठ मनाशी पक्की बांधून उन्हातान्हाची तमा न बाळगता जिद्दीने मजुरांची गावाकडे पायपीट सुरू आहे. 

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. व्यवहार ठप्प आहेत. या संसर्गजन्य आजाराविरुध्द लढण्यासाठी आपण प्रत्येक जण सज्ज झालो मात्र लॉकडाऊनमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुख्य प्रश्न आहे तो स्थलांतरीत मजुरांचा. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक किंवा अन्य प्रांतातील अनेक मजूर लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अडकून पडले आहेत.

पहिल्या लॉकडाऊनच्या टप्प्यात या मजुरांचा प्रश्न जाणवला नाही. मात्र, दुसऱ्या लॉकडाऊनच्या अखेरीस जवळची पुंजी संपल्याने किंबहुना, उपासमार होऊ लागल्याने मजूर रस्त्यावर येऊ लागले. या मजुरांच्या हाताला काम नाही आणि हाती असलेले पैसे पण संपले. यामुळे आपसुकच या मजुरांचे पाय आता गावाकडे वळले आहेत.

जिल्हाबंदी असल्याने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश बंद आहे. सरकारने मजुरांना त्यांच्या-त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन, बसची व्यवस्था केली आहे. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कारण लाखोंच्या संख्येने मजूर महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात आहेत.

रेल्वे अथवा अन्य वाहनांची व्यवस्था होईल या आशेने अनेकांनी पोलिस ठाण्यासह राजकीय पक्ष, नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर परवानगी आणि वैद्यकीय अहवालासाठी रांगा लावल्या. मात्र, अद्यापी प्रवासाची तारीख कळत नसल्याने मजुरांचे लोंढेच्या लोंढे पायपीट करीत गावी निघाले आहेत. खांद्यावर, डोक्यावर बॅगा-पिशव्या तर हातात एखादी पाण्याची बाटली असा शेकडो किलोमीटरचा खडतर प्रवास सुरू झाला आहे.  

ठाणे-नाशिक महामार्गावर तसेच,घोडबंदर रोडवर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मजूर पायी निघाले आहेत. माजिवडा पुलाखाली तर शेकडोच्या संख्येने मजूर आपल्या लहानग्यांसह काही क्षणाची विश्रांती घेऊन पुढील मार्गक्रमण करताना दिसतात. 

ठाणेकर मदतीला सरसावले
शहरात सर्वच प्रकारची कामे करणाऱ्या या परप्रांतीय श्रमिकांना आपण हिणवतो. पण तरीही त्यांना आपल्यात सहभागी करून घेतो. आज त्यांना घराची ओढ लागली आहे. त्यांचा हा प्रवास अतिशय खडतर आहे. तेव्हा, आपल्याच या बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी, एखादी पाण्याची बाटली व खाऊ देण्यासाठी अनेक ठाणेकर सरसावले आहेत.

Hundreds of workers went on foot

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com