गणेशोत्सवासाठी मंडप बांधताना दडपशाहीने वारंवार वृक्षतोड

संजीत वायंगणकर
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

अशाप्रकारची वृक्षतोड चुकीची आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन आयुक्तांना योग्य कारवाई करण्यास भाग पाडू.
- राजेंद्र देवळेकर, महापौर.

डोंबिवली - आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मंडप बांधताना आड येणारा वृक्ष तोडल्याची घटना समोर आल्याने पर्यावरणप्रेमी डोंबिवलीत आज अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कायद्याचे बंधन व धाक न राहिल्याने दडपशाहीने वारंवार वृक्षतोड होताना आढळत आहे. एकीकडे वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करून मोहीम राबवत आहे.

स्वयंसेवी संस्था पर्यावरण रक्षणासाठी अहोरात्र झटत असताना शहरात जुन्या मोठ्या झाडांची विनाकारण होणारी कत्तल हि अत्यंत खेदजनक आहे. डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळून स. वा. जोशी विद्यालयाकडे जाणाऱ्या नेहरु रोडवर आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या नेहरु रोडा व्यापारी मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवासाठी रस्त्यावर मंडप ऊभारणी करीत असताना आड येणारे मोठे झाड बुंध्यापासून तोडण्यात आले आहे.

हे कृत्य कार्यकर्त्यांनी केले का मंडाप ठेकेदाराने हे समजू शकले नाही कारण या वृक्षतोडीची बातमी पसरल्यावर सर्व कार्यकर्ते भूमीगत झाल्याने संपर्क होऊ शकला नाही. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख संजय जाधव यांना विचारले असता आज सुट्टी असल्याने याबाबत मी काही सांगू शकत नाही असे सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: marathi news mumbai ganesh festival tree cutting for pandals