आच्छाड तपासणी नाका प्रकरणाची चौकशी भरकटणार? ठाणे आरटीओंनी माहिती देण्यास मागितली आणखी मुदतवाढ...

check post.
check post.

मुंबई : राज्य परिवहन विभागाचा आच्छाड सीमा तपासणी नाका ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत येतो. या महत्त्वाच्या सीमा तपासणी नाक्यावरून लॉकडाऊनच्या काळात गुजरात, राजस्थान या राज्यांतील खासगी बसगाड्यांमधून अवैध प्रवासी वाहतूक झाल्याचे मुंबई बस मालक संघटनेने उघडकीस आणले होते. मुंबई बस मालक संघटनेने परिवहन आयुक्तांकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी या प्रकरणात नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांना 25 जूनला चौकशीचे आदेश दिले होते. 'सकाळ'ने हे प्रकरण सातत्याने लावून धरले होते.  

लॉकडाऊनच्या काळात आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरून गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील खासगी बसगाड्यांतून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक झाली आहे. नाक्यावरील अधिकाऱ्यांनी कर न आकारता ई-पास आणि कोव्हिड-19 नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी चौकशीचा आदेशही दिला. परंतु, चौकशी अधिकाऱ्यांना अद्याप कोणतीही देण्यात आली नसून, ठाणे आरटीओंनी 15 दिवसांची मुदत मागितल्याची माहिती 'सकाळ'ला मिळाली आहे. 

या प्रकरणाचा चौकशी अहवाल 15 दिवसांत परिवहन विभागाला सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार चौकशी अधिकारी मनवर यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली. परंतु, 15 दिवसांच्या मुदतीमधील सात दिवस उलटल्यावरही चौकशी अधिकाऱ्यांना माहितीच पुरवण्यात आलेली नाही. त्याव्यतिरीक्त ठाणे आरटीओ अधिकाऱ्यांनी आरटीओ विभागातील अधिकारी सध्या कोरोनाशी संबंधित कामात अत्यंत व्यग्र आणि तणावाखाली असल्याचे कारण देत आणखी 15 दिवसांची मुदत मागितली आहे.

त्यामुळे आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरील गैरव्यवहाराची चौकशी भरकटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चौकशीच्या संदर्भातील कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देता येणार नाही, असे आच्छाड सीमा तपासणी नाका प्रकरणातील चौकशी अधिकारी दिनकर मनवर यांनी 'सकाळ'ला सांगितले. तसेच याप्रकरणी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांना फोन आणि मॅसेजकरून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सीसी टीव्ही चित्रीकरण अनुपलब्धच
आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरील 1 ते 12 जूनपर्यंतचे सीसी टीव्ही चित्रीकरण चौकशी अधिकाऱ्यांनी मागितले आहे. हे व्हिडीओ अद्याप त्यांना मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. कोव्हिड -19 ने ठाणे जिल्ह्यात थैमान घातले असून अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरील चौकशी प्रकरणात माहिती संकलित करण्यासाठी वेळ देणे शक्य होत नसल्याचे पत्र चौकशी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. 

माहिती दडवण्याचा प्रयत्न?
आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरील गैरप्रकाराची चौकशी योग्य पद्धतीने झाल्यास मोठ्या अधिकाऱ्यांचा हात उघड होण्याची शक्यता आहे. परंतु, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जवळ आल्याने हा मुद्दा सभागृहात उपस्थित झाल्यास संबंधित अधिकारी अडचणीत येतील. म्हणून माहिती दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरील प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे. चौकशीसाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- शेखर चन्ने, आयुक्त, राज्य परिवहन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com