जरा विचार करा, ते स्थलांतरित निघून गेले तर मुंबईचे काय ?

जरा विचार करा, ते स्थलांतरित निघून गेले तर मुंबईचे काय ?

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईत अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालये, शेअर बाजारासह अनेक लहान-मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत स्थूल उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा तब्बल 14.3 टक्के आहे, पण कोरोनाचा सर्वांत मोठा "हॉट स्पॉट' हे शहर असल्यामुळे येथील अर्थकारण ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत हजारो स्थलांतरित कामगार पुन्हा त्यांच्या मूळ राज्यांत जाण्यासाठी धडपडत असून ते कोरोनाच्या भीतीमुळे परत येणार नाहीत. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

2011 च्या जनगणनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 38 लाख नागरिक-कामगार पर राज्यांतून आले. यापैकी 80 टक्के मुंबई, ठाणे आणि पुण्यात स्थायिक झाले आहेत. नऊ वर्षांत त्यांच्या स्थलांतराचे प्रमाण वेगाने वाढले. 

मुंबईतील कामगारांच्या संख्येपैकी जवळपास 18 ते 20 लाख परप्रांतीय कामगार आहेत. ते बांधकाम, नाका कामगार, ट्रक लोडर, सुरक्षा रक्षक ते कुशल कामगार म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतात. लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी यातील 30 टक्के कामगार आपापल्या राज्यांत निघून गेले आहेत. कोरोनामुळे या कामगारांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर हा स्थलांतरित कामगार परत न आल्यास मुंबईच्या अर्थव्यवस्थेचे चाक सुरू होऊ शकणार नाही. शिवाय हे शहर ठप्प होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. 

Free Free Free ! लॉकडाऊनमध्ये प्रतिष्ठित हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे मोफत ऑनलाईन कोर्स 'करोना'

विविध क्षेत्रांतील स्थलांतरित कामगारांची संख्या (अंदाजे) 

  • नाका कामगार- 4 लाख 
  • ऑटोरिक्‍शा, टॅक्‍सी- 1 लाख 40 हजार 
  • ट्रक वाहतूक, दळवळण- 3 लाख 
  • हॉटेल व उपाहारगृह- 4 लाख 
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग- 1 लाख 50 हजार 
  • रत्ने आभषणे उद्योग- 30 हजार 
  • चामडे उद्योग- 30 हजार 
  • सुरक्षा रक्षक- 1 लाख 
  • मासे विक्रेते, किरकोळ फेरीवाले- 2 लाख 
  • छोटे दुकानदार व तिथले कामगार- 1 लाख 
  • संघटित फेरीवाले- 30 हजार 


आतिथ्य सेवा क्षेत्रात परप्रांतीयांची संख्या अधिक : कोहली 

आदरातिथ्य सेवा क्षेत्रातील निवासी हॉटेलमध्ये 30 ते 60 टक्के कामगार हे परराज्यांमधील असतात. निवासी हॉटेलांमधील संघटित क्षेत्रातल्या हॉटेलांमध्ये 30 टक्के; तर असंघटित क्षेत्रातल्या हॉटेलांमध्ये 60 टक्‍क्‍यांपर्यंत कामगार परराज्यांमधील आहेत. या क्षेत्राताल कुशल, निमकुशल व अकुशल कामगारांची गरज असते व त्यातील मुख्यतः अकुशल कामगार हे बाहेरगावचे असतात. यातले अर्ध्याहून अधिक कामगार सध्याच्या स्थितीत त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे आमचेही उद्योग बंद पडले आहेत, असे फेडरेशन ऑफ हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे उपाध्यक्ष गुरुबक्षसिंह कोहली यांनी "सकाळ'ला सांगितले. 

अन्नपदार्थांची "होम डिलीव्हरी' देण्यास सरकारने आम्हाला संमती दिली आहे; मात्र त्यासाठीही आमच्याकडे कामगार नाहीत, त्यामुळे आम्हाला ते कामही करता येत नाही. आता भले 4 मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते कामगार परत येतील असे नाही. हे सर्व कामगार परत येण्यासाठी एक ते दीड महिना लागेल व आमची हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास दोन महिने तरी लागतील. त्यातच सरकार सांगत आहे, की कामगारांना काम नसले तरीही त्यांना पूर्ण पगार द्या; मात्र माझा कामगार हरयानात गावी जाऊन बसला असेल व त्याला पूर्ण पगार मिळत असेल, तर तो कशाला परत मुंबईला येईल. मी कामगारांना कामावरून काढू शकत नाही, कारण नंतर मला हॉटेल चालवण्यासाठी अपरिचित कामगारांना कामावर ठेवण्याची वेळ येईल. त्यामुळे ते टाळण्यासाठी मला आहेत ते कामगार ठेवावेच लागतील; मात्र त्यांच्या पगाराचा भार सरकारने आमच्यावर टाकला तर उद्योग मोडून पडेल व त्यातून आम्हाला उभे राहणेच कठीण होईल, असेही कोहली म्हणाले. 

दोन ते तीन लाख कामगार गावी गेले : कलंत्री 

मुंबई- ठाणे- नवी मुंबई परिसरात चार ते पाच लाख निमकुशल व अकुशल कामगार हे बाहेरच्या राज्यांमधील आहेत. सध्याच्या स्थितीत त्यातील एक लाख कामगार बाहेरगावी गेल्याचे अधिकृतपणे सांगितले जात आहे. आता हे सर्व जण परत येण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील व त्या काळात उद्योग-व्यापाराच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होईल, असे ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी "सकाळ'ला सांगितले. 

लोडिंग, फॉरवर्डिंग, व्हॅल्यू चेन सप्लाय, मदतनीस, अन्य लहानमोठी किरकोळ कामे, कंपन्यांमधील हमाल, सफाई कर्मचारी, देखभाल करणारे कर्मचारी, खानपान सेवा सांभाळणारे कर्मचारी, वाहनचालक-क्‍लीनर अशी कामे हे परगावचे मजूरच सांभाळतात. त्यांच्या जीवावर अनेक उद्योग चालत असल्याने हे चक्र लवकर सुरू होईल याची काळजी सरकारने घ्यावी; अन्यथा हे चक्र उशिरा सुरू झाले तर नंतर पावसाळा असल्याने सगळी घडीच विसकटेल असेही कलंत्री म्हणाले. 

कामगारच हजर नाहीत : मंडलेचा 

आयात-निर्यात वा अन्य जीवनावश्‍यक वस्तूंचा व्यापार सुरू करायचे आज सरकारने ठरवले तरीही कामगारच नसल्याने आमच्यासमोर अनंत अडचणी आहेत, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड अग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी "सकाळ'ला सांगितले. आज कामगार नाहीत त्यामुळे कंटेनरची वाहतूक होत नाही. बंदरावर माल चढवणे-उतरवणे यावर ताण आला आहे, असेही ते म्हणाले. 

उपाहारगृहांमधील चार लाख कामगार गेले : शेट्टी 

मुंबईच्या परवानाधारक 16 हजार उपाहारगृहांमध्ये सुमारे पाच लाख कामगार आहेत. त्यातील चार लाख कामगार बाहेरगावी निघून गेले असावेत, असा अंदाज असल्याचे हॉटेलचालकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी "सकाळ'ला सांगितले. यापैकी बहुतेक कामगार हे महाराष्ट्राच्याच ग्रामीण भागातील आहेत; तर अनेक जण बाहेरच्या राज्यांतून आले आहेत. 

सध्या मुंबईत जेमतेम शे-सव्वाशे उपाहारगृहे सुरू असून त्यापैकी बहुतेक जण ऑनलाईन पोर्टलवरून ऑर्डर स्वीकारत आहेत. कोरोनाचा सर्वांत मोठा फटका हॉटेल इंडस्ट्रीलाच बसला असून लॉकडाऊन उठल्यावर एकदोन महिन्यांनी सगळे सुरळित होईल असे वाटते; मात्र नंतर पावसाळा तोंडावर असून लोकांच्या मनातील भीती जाईल का, हीच भीती आमच्यापुढे असल्याचेही ते म्हणाले. 
 

ट्रक-टॅक्‍सीचालकही गेले 

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरात चार ते पाच लाख ट्रकचालक असून त्यापैकी दीड लाख चालक गावी गेले; तर उरलेले विविध ठिकाणी अडकून पडल्याची माहिती ट्रकचालक संघटनेचे नेते बालमलकितसिंह यांनी दिली; तर मुंबईतील पावणेदोन लाख टॅक्‍सीचालकांपैकी 80 टक्के टॅक्‍सीचालक उत्तर भारतीय असून त्यापैकी 20 हजार चालक गावी गेले आहेत; तर बाकीचे येथेच अडकून पडले आहेत, असे टॅक्‍सीचालक संघटनेचे नेते क्वाड्रोस यांनी सांगितले. 

रिक्षाचालक व फेरीवाले मुंबईतच : शशांक राव 

मुंबईत सुमारे अडीच लाख रिक्षा मालक-चालक आहेत; तर तीन लाख संघटित फेरीवाले आहेत. यापैकी जेमतेम 10 टक्के लोक मुंबई सोडून गेले आहेत. कारण यापैकी बहुतेकांची घरे-कुटुंबे येथेच आहेत. मुलांच्या परीक्षा, रिक्षांसाठी घेतलेली कर्जे, सुरू असलेला धंदा, भाड्याने घेतलेली घरे यामुळे मुंबई सोडून बाहेर जाणे त्यांना परवडणारे नाही, असे कामगार नेते शशांक राव यांनी "सकाळ'ला सांगितले. 

मुंबई, ठाणे, पालघर परिसरात सहा लाखांच्या जवळपास नाका कामगार आहेत. त्यापैकी परप्रांतीय कामगारांची संख्या पाच लाख एवढी आहे; तर राज्यभरात एक कोटी 25 लाख नाका कामगार आहेत. हे सर्व कामगार सध्या मुंबईत अडकले आहेत. लॉकडाऊन उठल्यावर हे कामगार आपल्या राज्यात परतल्यास आणि कोरोनाची भीती बघता यातील बहुतांश कामगार मुंबईत परत येणे कठीण आहे. - ऍड. नरेश राठोड, अध्यक्ष, भारतीय सेवा नाका कामगार संघटना

what will happen to mumbai if migrant workers leaves mumbai due to covid19  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com