दक्षिण महाराष्ट्र : पूरग्रस्तांनी निवडले महाआघाडीचे उमेदवार!

निखिल पंडितराव
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

स्थानिक प्रश्‍नांना न भिडलेली युती, मतभेद व मनभेद आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बालेकिल्ला टिकविण्यासाठी राबविलेली प्रभावी यंत्रणा आणि मोदी-शहांचा करिष्मा न चालणे, यामुळे दक्षिण महाराष्ट्रात आघाडीच बळकट असल्याचे सिद्ध झाले.

दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने मोठी मुसंडी मारली, मतदारांनी युतीची वाताहत केली. काँग्रेस-राष्ट्रवादी एकदिलाने लढली, तर युतीमध्ये मनभेद, संघटनात्मक बांधणीची कमतरता, पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांना फटका बसला.

सातारा आणि सोलापूरमध्ये महायुतीने गड राखला. साताऱ्यात भाजपने यंदाच्या निवडणुकीत आपले खाते उघडले. दोन जागांवर आघाडी घेतली. सोलापुरात भाजपने चार जागांवर आघाडी घेतली. दक्षिण महाराष्ट्राचा विचार करता एकीकडे महाआघाडीची मुसंडी, तर दोन ठिकाणी त्यांनी आपले गड राखल्याची स्थिती आहे.

- विदर्भ : फडणवीस, गडकरींसारखे नेते असूनही भाजपची कामगिरी खालावली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा करिष्मा चालला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अजूनही दक्षिण महाराष्ट्रावर पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले. दिल्ली ते गल्लीपर्यंत महायुतीचा विजयाचा वारू त्यांनीच दोन जिल्ह्यांत रोखून दाखविला. दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी पिचला होता. साखर पट्ट्यात शेतीचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. महापुरानेही शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी कोल्हापूर व सांगलीत पुन्हा आघाडीलाच पसंती देत युतीबद्दलची नाराजी व्यक्त केली.

कोल्हापुरात शिवसेना-भाजपला संघटनात्मक बाबीत फटका बसला. भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात, असे चित्रही काही मतदारसंघांत दिसले. त्यामुळेच भाजपचा व्हाईटवॉश जिल्ह्यातून झाला. भाजपला अंतर्गत राजकारणाचाही फटका बसला. आपल्यापेक्षा पक्षात आलेले वरचढ होऊ नये, म्हणून पक्षांतर्गतच छुपी हातमिळवणी काही ठिकाणी होती.

- उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या मतातही मनाेमिलन I Election Result 2019

पहिल्यांदाच अपक्षांनी मुसंडी मारली. काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मंत्री प्रकाश आवाडेंनी अपक्ष रिंगणात उतरून भाजपचे सुरेश हाळवणकरांना चारीमुंड्या चीत केले. राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी शिरोळमधून अपक्ष म्हणून विजय मिळवला. जिल्ह्याचा विचार केल्यास या निवडणुकीत आघाडीने सहा जागांवर विजय मिळवला तरी आवाडे आणि यड्रावकर हे आघाडीचेच असल्याने आठ जागांवर बाजी मारून 2014 चा वचपा काढलाय.

सांगलीत भाजप नेत्यांचा गाफीलपणा त्यांनाच नडला, शिवाय अतिआत्मविश्‍वासाने त्यांच्या युतीचा घात केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मोठ्या ताकदीने 'कमबॅक' केले. शिराळ्यात राष्ट्रवादीच्या मानसिंराव नाईक यांनी 'कमबॅक' केले; तर जतमध्ये भाजपच्या बंडखोरीचा फटका बसला. केवळ सांगली आणि मिरज येथेच भाजप आणि विटा-खानापूरमध्ये शिवसेनेच्या अनिल बाबरांनी गड राखला. अन्य पाचही जागांवर महाआघाडीने मुसंडी मारली. जिल्ह्यात काँग्रेसचे विश्‍वजित कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आघाडीसाठी केलेले प्रयत्न सफल ठरले.

- उदयनराजेंच्या पराभवातही तीन सत्ते I Election Result 2019

सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. साताऱ्यात मोदी आणि शहांच्या सभा होऊनही मतदारांनी महायुतीला पूर्णतः स्वीकारले नाही. राष्ट्रवादीच्या 2014 मध्ये पाच जागा होत्या. या वेळी राष्ट्रवादी 3, भाजप आणि शिवसेना प्रत्येकी दोन आणि काँग्रेस एका जागेवर विजयी झाली. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विजय भाजपसाठी महत्त्वाचा आहे.

सोलापुरात पक्षांतराच्या कोलांटउड्या मोठ्या प्रमाणात होत्या. दिलीप सोपल, रश्‍मी बागल, सुधाकर परिचारक यांच्यासारख्यांना मतदारांनी नाकारले, पक्षांतर केलेल्यांनाही नाकारले. सोलापूर जिल्ह्यात भाजपने गतवेळेपेक्षा जागा दुप्पट करण्यात यश मिळविले आहे. भाजपच्या चिन्हावरच रयत क्रांती आणि रिपब्लिकन पक्ष या दोन जागा अधिक झाल्या आहेत.

2014 ची स्थिती :- 

पक्ष कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर
शिवसेना 6 1 1 1
भाजप 2 4 0 2
काँग्रेस 0 1 2 3
राष्ट्रवादी काँग्रेस 2 2 5 4
शेकाप 0 0 0 1

2019 ची स्थिती :-

पक्ष कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर
शिवसेना 1 1 2 1
भाजप 0 2 2 4
काँग्रेस 4 2 1 1
राष्ट्रवादी काँग्रेस 2 3 3 3
जनसुराज्य पक्ष 1 0 0 0
अपक्ष 2 0 0 2

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about results of South Maharashtra in Vidhan Sabha 2019 election written by Nikhil Panditrao