जेव्हा राज्यपाल कोश्‍यारीच घेतात शिवभोजन थाळीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी नुकतीच महाबळेश्वरला भेट दिली. यावेळी राज्यपाल यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. राज्यपालांना सातारची आठवण म्हणून प्रशासनाने  कासवरील पुष्प पठाराची फोटोफ्रेम भेट देण्यात आली. 

सातारा : केंद्र व राज्य शासनाकडून सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन विविध योजना तयार होत असतात. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका विभाग प्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केल्या. राज्यपाल कोश्‍यारी यांनी महाबळेश्वर येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये विविध विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपवन संरक्षक भरतसिंह हाडा, प्रांताधिकारी संगीता चौगुले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी शिवभोजन योजनेचा आढावा घेतांना राज्यपाल कोश्‍यारी म्हणाले, ""शिवभोजन थाळीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, लोकांच्या अधिकच्या मागणीचा विचार करून तसा प्रस्ताव पाठवावा. युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहित करून मुद्रा बॅंक योजनेंतर्गत जास्तीतजास्त वित्त पुरवठा करून उद्योजक निर्माण करावेत, तसेच सातबारा संगणकीकरणाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून, लवकरात लवकर हे काम 100 टक्के करा. महिला बचतगटांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून, दर्जेदार माल उत्पादित करीत आहे. त्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, यासाठी उपाययोजना कराव्यात.'' पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या योजनेचे काम सातारा जिल्ह्यात चांगले झाले असून, यापुढे त्याच गतीने काम करावे.

आरोग्य विभागाचा आढावा घेताना राज्यपाल श्री. कोश्‍यारी म्हणाले, ""क्षयरोग ज्या व्यक्तींना झाला आहे ती व्यक्ती घाबरून रुग्णालयात येत नाही. अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांचे समुपदेशन करून त्यांच्यावर औषधोपचार करावा.'' जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना मिळालेला निधी 100 टक्के खर्च करावा, असे सांगून, महाबळेश्वर येथील वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने, तसेच जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत मिशनमध्ये चांगले काम केल्याबद्दल राज्यपालांनी अभिनंदन करून महाबळेश्वर हे भारतातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून, अधिक पर्यटक येण्यासाठी उत्तम सोयीसुविधा पुरवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

वाचा : व्हॅलेंटाईन डे पुर्वीच त्याला जेलची हवा; गर्भ वाचला

नक्की वाचा : विद्यार्थ्यांनो या... विज्ञान विश्‍वात दंग व्हा

जरुर वाचा : साताऱ्याचे 'हे' नेते चालले पुन्हा राष्ट्रवादीत

अवश्य वाचा : सातारकर संतप्त मुलींनी युवकाला चोपले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor Bhagat Singh Koshari Visits Mahableshwar