
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाने जोरदार हजेरी लावली. राधानगरी धरणासह तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी, धामणी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुरणी, सुरुपली बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली.
पाण्याची आवक वाढल्याने सेवाद्वार उघडले
राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने तिन्ही धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणक्षेत्रावर १७२ मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली आहे. पाण्याची आवक वाढल्याने सेवाद्वार उघडले आहे. पायथा वीजगृहातून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. यामध्ये सेवाद्वारातून आणखी एक हजार क्युसेक्स विसर्गाची भर पडली आहे. पाऊस असाच राहिल्यास यंदा लवकरच हे धरण भरण्याची स्थिती आहे.