आमदार भालके, शिंदे पहिल्या रांगेत!

अशोक मुरुमकर
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत आमदारांची बैठक 
- सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग 
- बबनराव शिंदे हे शरद पवारांच्या गाडीत 
- सोलापूर जिल्ह्यातील आमदार पवारांसोबतच! 

सोलापूर : मी पुन्हा येईन म्हणत अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने शिवआघाडीचा सत्ता स्थापनेचा डाव फसला. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक क्षणाला वेगळचं काहीतरी चित्र समोर येऊ लागले असून आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्या पुन्हा दोन देशमुखांचीच सद्दी?

भाजपचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून सत्ता स्थापनेला विरोध करणाऱ्या घडामोडींना अधिकच वेग आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालय गाठले. रविवारी मुंबईत शरद पवार व शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. त्यावेळी पहिल्या रांगेत पंढरपूरचे आमदार भारत भालके व माढ्याचे बबनराव शिंदे होते. त्यानंतर शिंदे यांना शरद पवारांनी स्वत:च्या गाडीत घेतले होते. 

हेही वाचा : अजित पवार म्हणतात, "मी राष्ट्रवादीतच, शरद पवारच आमचे नेते' 

आमदार भालके यांचे काही सांगता येईना 
आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाची विधानसभा निवडणूक सर्वांसाठीच संस्मरणीय ठरली. युती अन्‌ आघाडीच्या निर्णयापासून निकालापर्यंत आणि निकालानंतर सत्ता स्थापनेपर्यंत सर्वांचे अंदाज चुकविणारी ही निवडणूक ठरली. भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवूनही शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी मैत्री तोडली. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करूनही कोणालाच बहुमत सिद्ध करता न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी मुंबई ते दिल्लीपर्यं चर्चा सुरू असतानाच गणित जुळले आणि आता शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांची सत्ता स्थापन होणार हे निश्‍चित झाले.

हेही वाचा : साहेब बोलतात पण नेहमी खरचं..!

मात्र, मध्यरात्री समीकरण बदलले अन्‌ अजित पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाले. अजित पवारांनी ज्या आमदारांना संपर्क केल्याचा संशय असलेल्या आमदारांना शरद पवार यांनी सर्वप्रथम बैठकीला बोलावले. मात्र, बैठकीला उपस्थित राहिले असतानाही काही आमदारांचे शरीर बैठकीत अन्‌ मन मात्र दुसरीकडेच असल्याचे पाहण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरचे आमदार भालके तर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांना शरद पवार यांनी सोबतच घेतल्याचे चित्र पाहण्यात आले. भालकेंनी शरद पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादीत रहावे, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. 

हेही वाचा : "फडणवीस, अजित पवारांचे सरकार बेकायदा' 
ऑडिओ क्‍लिप व्हायरल 

एका कार्यकर्त्याने भालके यांना फोन करून "तुम्ही शरद पवार यांची साथ सोडू नका', अशी विनवणी करत असल्याची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली. मात्र, त्यातही "तुम्हाला असं का वाटले?, मी कुठेही गेलेलो नाही', असे भालके यांनी कार्यकर्त्याला सांगितले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. 

बबनराव शिंदेंना शरद पवार यांनी घेतले स्वत:च्या गाडीत 
भाजपला बहुमताचा आकडा गाठता येऊ नये, अजित पवार यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. त्या आमदारांनी कोणालाशी संपर्क साधू नये म्हणून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात असल्याची चर्चा आहे. शनिवारी माढ्याचे आमदार शिंदे एका कार्यक्रमासाठी थांबले होते. त्यातच शरद पवार यांनी आमदार बबनराव शिंदे यांना गाडीत घेतल्याने नवी चर्चा रंगू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress meeting: MLA Bhalke, Shinde in first line