सोलापूर महापालिका क्षेत्रात नवीन रिक्षांचीच होणार नोंदणी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 19 जुलै 2017

विद्युत उर्जेवर चालणाऱ्या रिक्षांना दरदर्शिका (मीटर) असल्याशिवाय परवाने दिले जाणार नाहीत. या संदर्भात राज्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या अधीन राहून परवाने द्यावेत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

पेट्रोल, एलपीजी अथवा विद्युत उर्जेवरचे बंधनकारक

सोलापूरः राज्याच्या नवीन धोरणानुसार महापालिका क्षेत्रामध्ये नवीन ऍटो रिक्षांचीच नोंदणी केली जाणार आहे. उर्वरीत क्षेत्रात परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या जुन्या रिक्षांची नोंदणी करता येईल. गृह विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.

राज्यातील ऑटोरिक्षा, टॅक्‍सी परवान्यावरील बंधन गेल्या 17 जून रोजी उठविण्यात आले आहेत. त्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या अहवालानुसार शासनाने नवीन धोरण निश्‍चित केले आहे. राज्यात यापुढे तीन चाकी, तीन आसनी, ऑटो रिक्षा व टॅक्‍सी परवान्यासाठी अटी निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

अर्जदाराकडे परिवहन संवर्गातील ऑटोरिक्षा, टॅक्‍सी चालविण्यासाठी कॅब बॅज असणे आवश्‍यक आहे, अर्जदाराला पोलिसांकडून चारित्र पडताळणीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे, अर्जदारास शासकीय किंवा खासगी क्षेत्रात काम करीत नसल्याचे, तसेच त्याच्या नावे ऑटोरिक्षा किंवा टॅक्‍सीचा परवाना नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरात सीएनजी, एलपीजी अथवा विद्युत उर्जेवर चालणारी ऑटोरिक्षा असणे आवश्‍यक आहे. इतर महापालिका क्षेत्रात पेट्रोल, एलपीजी अथवा विद्युत उर्जेवरील रिक्षा चालणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात नोंदणी होणाऱ्या टॅक्‍सी केवळ पेट्रोल व सीएनजी इंधनावर अथवा विद्युत उर्जेवर चालणाऱ्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. भविष्यात शासनाने निश्‍चित केल्यास परवानाधारकास टॅक्‍सी अथवा ऑटो रिक्षामध्ये जीपीएस, जीपीआरएस व आरएफआयडी टॅग बसवणे बंधनकारक असणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: solapur news solapur municipal area and Registration only new rickshaw