मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडली आणि बनला तहसीलदार

akshay dhakane
akshay dhakane
Updated on

भोसरी, ता. २३ ः राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या एमपीएससी परीक्षेत भोसरीतील अक्षय अशोक ढाकणे याची तहसीलदार पदी निवड झाली. घरची परिस्थिती बेताची असताना अक्षयने त्याचे वडील घरासाठी करत असलेल्या कष्टाची जाणीव ठेवत अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करून हे घवघवीत यश मिळविल्याने परिसरात अक्षयचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल अक्षयचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, संजय वाबळे, योगिता नागरगोजे आदींनी शुभेच्छा दिल्या.

अक्षयचे वडील अशोक ढाकणे एका छोट्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करीत असून आई गृहिणी आहे. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कंपनीतील कामाबरोबरच सकाळ शैक्षणिक पॅटर्नची पुस्तके विक्रीचीही कामे केली. अक्षयचे प्राथमिक शिक्षण भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयात झाले. चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीला तो पात्र ठरला होता. त्याने निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. एनटीएस परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत त्याने स्थान पटकावले व शिष्यवृत्ती प्राप्त केली होती. इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत मागास विद्यार्थ्यामधून त्याने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला. अभियांत्रिकी शिक्षण सीओईपीमधून पूर्ण करताना इलेक्ट्रिकल या शाखेतून प्रथम क्रमांक  पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले. अक्षयचा शैक्षणिक आलेख सतत उंचावत राहिला. तर काही वेळा त्याने अपयशही पचवलय.

घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांचा आर्थिक भार हलका करण्यासाठी त्याने पदवीचे शिक्षण घेत असताना इतर कामही केले. अभियांत्रिकीची पदवी घेत असताना कॅम्पस मुलाखतीमध्ये त्याची एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. पदवी मिळविल्यानंतर त्याने नोकरी जॉईन केली परंतु प्रथमपासूनच त्याला प्रशासकीय सेवेतील नोकरी खुणावत होती. चांगल्या पगाराची नोकरी सोडून अक्षयने पूर्णवेळ राज्य/केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला. त्याला पिंपरी-चिंचड महापालिकेच्या भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्राचाही फायदा झाला. दुसऱ्याच प्रयत्नात एमपीएससी मध्ये यश संपादन केले. अक्षयचा प्रवास इथेच थांबत नाही. त्याची केंद्रीय प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी प्रचंड अभ्यास करणे त्याने सुरू ठेवलंय.

अक्षयला घडवत असताना त्यांच्या आईवडिलांनी प्रचंड कष्ट घेतलेत. मुलगी डॉक्टर (डेंटिस्ट) तर मुलगा इंजिनीयर करताना त्यांना अनेक लोकांची मदत झाली. कंपनीत काम करताना विमा पॉलिसी प्रतिनिधी म्हणून काम देखील केले. समाजातील राजकीय व्यक्ती, नेते, पुढारी, त्याचे शिक्षक यांनी त्याला सर्व प्रकारे सहकार्य आणि मदत केले. आपल्या मुलाला त्यांनी प्रशासकीय अधिकारी करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले.अर्थात या सर्वात अक्षयची प्रचंड जिद्द,मेहनत आणि कष्ट करायची तयारी,यामुळे हे साध्य झाले.
हे वाचा - ​एक कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि...
प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून आज सामान्य कुटुंबातील हजारो मुले दिवसरात्र अभ्यास करीत आहे. या सर्वांना अक्षयचा प्रवास मार्गदर्शक ठरेल. अक्षय आपल्या या यशाचे श्रेय त्याच्या आईवडिलांना, सर्व शिक्षकाना,मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देतो.

प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना गोरगरीब जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचवणे व त्याची अंमलबजावणी करणे व सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडेल असे निर्णय घेण्याचे उद्दीष्ट अक्षयने बोलून दाखविले.

स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. मात्र या परीक्षेत यश मिळाले नाही तर काहीजन अपयशाने खचूनही जातात. मात्र विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना यश प्राप्त न झाल्यास प्लॅन बी सुद्धा तयार असला पाहिजे. मनात जिद्द बाळगली की कोणत्याही क्षेत्रात यश नक्की मिळते. दररोज सरासरी आठ तास अभ्यास केला. मात्र दहा वेगवेगळी पुस्तके वाचण्यापेक्षा योग्य पुस्तकाची निवड करून एकच पुस्तक दहा वेळा वाचल्यास रिविजन चांगल्या प्रकारे होते. त्याचप्रमाणे एमपीएृससीचा अभ्यास करत असताना एमपीएससीचे झालेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिका सोडविल्या.
-अक्षय अशोक ढाकणे, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com