Childhood Memory : का विस्मृतीत जातात बालपणीच्या आठवणी?

या विषयाने १९व्या शतकापासून मानसशास्त्रज्ञांना गोंधळात टाकले आहे. बालपणातील स्मृतिभ्रंश हे कोडेच नव्हे, तर विरोधाभासही आहे.
childhood
childhoodesakal

चाइल्डहुड किंवा इन्फन्टाइल अॅम्नेशिया म्हणजे आयुष्यातील पहिली दोन-तीन वर्षे आठवण्याची असमर्थता, या काळातला स्मरणशक्तीचा अभाव. या विषयाने १९व्या शतकापासून मानसशास्त्रज्ञांना गोंधळात टाकले आहे. बालपणातील स्मृतिभ्रंश हे कोडेच नव्हे, तर विरोधाभासही आहे.

डॉ. अविनाश भोंडवे

लहानपणी, त्यातही पाच वर्षांच्या आतली मुले सगळ्या बारीकसारीक गोष्टी बघत असतात. आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टी निरखून पाहत असतात, आई-बाबा आणि आजूबाजूच्या नेहमीच्या माणसांना ओळख दाखवू लागतात, जागी असताना नको इतकी सक्रिय असतात, अनेक गोष्टी का घडतात याबद्दल जिज्ञासू असतात.

रांगायला लागली की त्यांना सतत रांगायचे असते, उभी राहू लागली की उभे राहायचे असते, चालायला जमले की चालायचे असते; बोलणे, ऐकलेले शब्द बडबडणे, शिकवलेले शब्द म्हणणे याबाबत ती कमालीची मोटिव्हेटेड असतात.

हीच मुले मोठी झाली की मात्र त्यांना आधीचे काही आठवत नाही. अनुभवलेल्या गोष्टी विस्मरणात जातात. त्यांना त्यांचाच पहिला वाढदिवस आठवत नाही, दुसराही आठवत नाही.

उच्चारलेले पहिले शब्द, पहिली पावले, आवडता खाऊ, आई-बाबांसोबत केलेले प्रवास, पाहिलेली वेगवेगळी स्थळे, खूप दिवसात न भेटलेले नातेवाईक... काही काही आठवत नाही.

चाइल्डहुड किंवा इन्फन्टाइल अॅम्नेशिया म्हणजे आयुष्यातील पहिली दोन-तीन वर्षे आठवण्याची असमर्थता, या काळातला स्मरणशक्तीचा अभाव.

या विषयाने १९व्या शतकापासून मानसशास्त्रज्ञांना गोंधळात टाकले आहे. बालपणातील स्मृतिभ्रंश हे कोडेच नव्हे, तर विरोधाभासही आहे. बालपणात घेतलेल्या जीवनाच्या मूलभूत शिक्षणातून मुलांचा नाट्यमयरित्या विकास होत असतो, पण मग स्मरणशक्तीचा अभाव असताना, तो कसा काय होतो? काहीच लक्षातच राहत नसेल, तर चालणे, बोलणे, पलंगावर चढणे, खाली उडी मारणे, कपाटे धुंडाळणे, माणसे ओळखणे ते कसे काय शिकतात?

बालपणातील हा स्मृतिभ्रंश समजून घेण्यासाठी, आपले दृढ समज बदलून या गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे आवश्यक ठरते.

बालकांच्या सर्वसामान्य विकास प्रक्रियेला ‘स्मृतिभ्रंश’ असे लेबल लावून त्याचा संबंध एखाद्या आजाराशी जोडण्याऐवजी, आपला दृष्टिकोन बदलून, स्मरणशक्तीचा आरंभ कसा सुरू होतो याचा विचार करायला हवा.

स्मरणशक्तीचा श्रीगणेशा

सर्वसाधारणपणे बालकांच्या वैयक्तिक स्मरणशक्तीची पायाभरणी वयाच्या २४ ते ३६ महिन्यांच्या दरम्यान होऊ लागते. स्मरणशक्तीच्या प्रवासाच्या या प्रक्रियेचे सात घटक संशोधकांना लक्षात आले.

विकसनशील मेंदू ः माणसाच्या मोठ्या मेंदूच्या बाह्य थराला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतात. त्यात मोठ्या प्रमाणात मज्जापेशी असतात. जन्मल्यानंतर पहिल्या दोन वर्षांमध्ये कॉर्टेक्समध्ये मज्जापेशींची संख्यात्मकवाढ वेगाने होऊन तो परिपक्व होऊ लागतो. या दरम्यान विजेच्या तारांना जसे इन्सुलेशन असते, तसे मायलिनेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे, मायलिन आवरण म्हणून ओळखला जाणारा विद्युत इन्सुलेशन थर, अॅक्सॉन या शेपटीसारख्या दिसणाऱ्या मज्जापेशींच्या भागावर तयार होतो. या दरम्यान मोठ्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस नावाच्या एका विभागाद्वारे स्मृतींची निर्मिती आणि मेंदूच्या कॉर्टेक्समध्ये स्मृतींची साठवण सुरू होते.

मज्जापेशी एकमेकांना जोडलेल्या असतात. दोन मज्जापेशी जिथे जोडल्या जातात. त्याला सायनॅप्स म्हणतात. मायलिनेशन प्रक्रियेत कॉर्टेक्स आणि हिप्पोकॅम्पसमधल्या मज्जापेशींची नव्याने जोडणी होते, जुन्या कनेक्शनच्या जागी नवीन जोड येतात. आणि मज्जापेशींची वाढ होताना, प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या कनेक्शनच्या जागी नवे सायनॅप्स तयार होतात. याचा परिणाम जीवनाच्या सुरुवातीच्या आठवणींमध्ये व्यत्यय येण्यात होतो.

लहान मुलांना त्यांचे सुरुवातीचे बालपण आठवते, ते मज्जापेशी पक्व होण्याआधीचे. अडीच वर्षांच्या मुलांना सहा महिन्यांपूर्वीच्या घटना सहजपणे आठवतात, पण त्यानंतर दोन वर्षांनी त्या घटना त्यांना आठवत नाहीत.

childhood
Shreyas Talpade Health Update : श्रेयसच्या प्रकृतीबाबत पत्नी दीप्तीनं केलं आवाहन, 'तुम्ही फक्त...'

लक्षात ठेवण्यास शिकणे ः अगदी छोट्या मुलांना गोष्टी लक्षात ठेवण्यात अजिबात रस नसतो. ते फक्त त्यांचे दैनंदिन जीवन जगत असतात. मात्र, सभोवतालच्या मोठ्या लोकांशी संवाद साधताना, “हे काय आहे? ते काय आहे?” असे विचारत त्यांना गोष्टी लक्षात

ठेवणे शिकवले जाते. पालक जेव्हा “काल आपण कोणाकडे गेलो होतो?” किंवा “काल तुला अमुक तमुकने काय दिले?” असे विचारून त्यांच्या आठवणी जाग्या करून देत राहतात, तेव्हा त्या मुलांना जाणीव होते, की लक्षात ठेवणे हे या मोठ्या लोकांसाठी महत्त्वाचे आहे, आणि आपण त्याचा सराव करून ते शिकायला हवे.

महत्त्वाच्या ठळक गोष्टी जाणून घेणे ः बालकांच्या जीवनातील नवनवीन आणि परिणामकारक घटनांकडे त्यांच्या स्मृती आकर्षित होत असतात. आघात, आनंद, रागावणे अशा घटना त्यांना एकप्रकारे धडा शिकवतात. महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आणि सामान्य व दैनंदिन कोणत्या हे अगदी लहानपणी समजत

नसते. त्यामुळे जेव्हा लहान मुले नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेचे वर्णन करतात, तेव्हा मोठ्या माणसांच्या दृष्टीने त्या ‘किरकोळ’, ‘जनरल’ असतात, फारशा लक्षात ठेवण्याजोग्या नसतात.

या वयातल्या मुलांना मोठ्या माणसांच्या जगातल्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आणि किरकोळ कोणत्या हे उमजत नाही. मुलांच्या दृष्टीतून सर्वच गोष्टी नवख्या असतात. पण मोठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी त्यांना फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवून सांगायच्या याची त्यांना समज येईपर्यंत काही वर्षे निघून जातात.

स्वत्वाची संकल्पना आत्मसात करणे ः लहानपणातल्या हरवलेल्या स्मृती तशा ‘आत्मचरित्रात्मक’ स्मृती असतात. त्या घटनांचा आपणही एक भाग आहोत यांची जाणीव त्या वयात झालेली नसते. त्याकरिता लागणारी स्वतःच्या अस्तित्वाची संकल्पना, आपणही एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहोत याची जाणीव तोवर त्यांना झालेली नसते. त्यामुळे बालपणीच्या या घटनांमधली त्यांची उपस्थिती त्यांना आठवत नाही.

मुले जसजशी मोठी होत जातात आणि जसजशा नवनव्या स्मृती जमा होऊ लागतात, तसतशी त्यांची स्वतःबद्दलची जाणीव आणि त्यातून येणारी आत्मचरित्रात्मक स्मृती अधिक विस्तृत आणि मजबूत होते. केवळ स्मृतीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकत नाहीत, तर त्यांच्या उमलत्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव स्मृतींवर पडत असतो. त्यातूनच त्यांच्या आत्म-संकल्पनांना आधार देणाऱ्या आठवणी अधोरेखित होत जातात.

childhood
Mobile Phone Addiction: तुमचं मूल ३ तासांपेक्षा जास्त वेळ Mobile वापरतंय तर वेळीच व्हा सावध...अन्यथा जडतील हे आजार

जीवनकथनातल्या समर्पक आठवणी ः प्रौढांना आपल्या जीवनातला महत्त्वाचा काळ आणि त्यातले टप्पे हे स्मृतींच्या एखाद्या मालिकेसारखी आठवतात. यामधून एकेक घटना आठवण्याची सहजसोपी पद्धत निर्माण होते आणि पुढील काळात त्या स्मृती ‘आठवणे’ सुलभ होते. त्यातून प्रत्येक व्यक्तीची एक प्राथमिक जीवन कथा तयार होते. आयुष्यात घडणाऱ्या घटना संज्ञानात्मक प्रणालीमध्ये आतबाहेर होत राहतात, त्यातल्या काही स्मृतींमध्ये स्थिर होतात तर बऱ्याच गळून जातात.

खूप छोट्या मुलांमध्ये साधारणपणे स्वतःची अशी जीवनकथा नसते, परंतु अतिविशेष प्रकारची घडलेली एखादी घटना त्यांच्या कायमची लक्षात राहते. उदाहरणार्थ, लहान भावंडाचा जन्म, त्यांना स्वतःला हॉस्पिटलमध्ये भरती केले जाणे. अशा घटना दुसऱ्याच वर्षाच्या आत घडलेल्या असल्या, तरी अनेक वर्षे आठवत राहतात.

माहितीवरील प्रक्रिया ः लहान वयात मुलांना मिळणाऱ्या माहितीवर; संकेतबद्ध होणे, साठवणे आणि पुन्हा मिळवणे अशा चौकटीत प्रक्रिया होते. मूळ माहिती ज्या पद्धतीने संकेतबद्ध केली जाते ती पद्धत माहिती पुन्हा मिळवण्याच्या पद्धतीशी जर जुळली, तरच स्मरणशक्ती कार्य करते आणि स्मृतीतील घटना आठवतात. अर्भकावस्थेत आणि बाल्यावस्थेत सांकेतिक संदर्भात साठवली जाणारी स्मृती पुनर्प्राप्त करताना, लहानपणातले सांकेतिक संदर्भ पुन्हा तयार होत नाहीत. परिणामतः बाळ मोठे झाल्यावर पुनर्प्राप्ती संकेत कार्य करत नाहीत आणि बालपणातल्या आठवणींना तिलांजली मिळते.

childhood
लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

भाषा विकासामुळे स्मरणशक्तीचा विकास स्मृतीची रचना आणि त्यांचा अन्वयार्थ भाषेतून लावला जातो. त्यामुळे भाषा शिकण्यापूर्वी साठवलेल्या आठवणी वेगळ्या पद्धतीने समायोजित केल्या जातात आणि त्या पुनर्प्राप्त करणे अधिक कठीण जाते. स्मरणशक्तीचा आरंभ भाषेच्या सुरुवातीसोबत होतो. बहुसंख्य संशोधक मानतात, की स्मृती निर्मितीसाठी भाषा आवश्यक असते.

अन्य काही संशोधकांच्या मते, स्मरणशक्तीचे आयोजन आणि समर्थन भाषेमुळे नक्कीच होते. परंतु, दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणी तयार करण्यासाठी आणि त्यांची पुनर्प्राप्ती करण्यासाठी भाषा आवश्यक नसते. दीर्घकाळ विसरलेल्या आठवणी, विशिष्ट गंध, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा छायाप्रकाशाचा खेळ. आवडती रागदारी अशा आठवणी भाषाविरहित संकेतांद्वारे मिळवता येतात.

childhood
Child Mental Health : सोशल मीडियावर तुमची मुलं किती वेळ घालवताय? 76% टक्के मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

स्मरणशक्तीचा प्रारंभ

बालकांच्या सुरुवातीच्या काळात मेंदूच्या कॉर्टेक्सची वाढ सुरू होते. एखाद्या विजेच्या उपकरणातील तारांचे जटिल जाळे विजेचा प्रवाह जसा क्षणार्धात एकीकडून दुसरीकडे नेते तसेच, मज्जातंतूंच्या मायलिनेशनमुळे घडणाऱ्या घटना मज्जातंतूद्वारे स्मृतिकेंद्राकडे वाहून नेल्या जातात. यामुळे-

  • कॉर्टेक्स आणि हिप्पोकॅम्पस विशिष्ट संज्ञानात्मक माहिती गोळा करून साठवू लागतात,

  • मुलांमध्ये स्वत्वाची भावना विकसित होऊ लागते,

  • घटना, वस्तू, माणसे, अन्नपदार्थ अशा अनेक गोष्टींबाबत शिकणे आणि ते लक्षात ठेवणे; म्हणजेच स्मृती महत्त्वाची आहे हे मुलांना जाणवू लागते.

  • विशिष्ट घटनेची आठवण धुंडाळली जाते,

  • ‘लक्षात ठेवण्यासाठी’ स्वतःच्या नव्या पद्धती शिकून त्या लागू केल्या जातात

  • आयुष्यातील घटनांची जीवन कथा तयार केली जाते,

या सर्व शारीरिक, वैचारिक, तार्किक, काल्पनिक, शैक्षणिक वगैरे घडामोडींच्या संयोजनातून स्मरणशक्तीच्या कार्याला हिरवा झेंडा मिळतो. सुरुवातीच्या स्मरणशक्तीचे पुनरावलोकन करत राहिल्याने पुढील जीवनात त्या आठवत राहायला मदत होते. बालपणातील स्मृतींना पुन्हा उजाळा देत राहिल्यास बालपणीचा स्मृतिभ्रंश कमी होऊन स्मरणशक्तीच्या विकासाचा आरंभ होतो, तसेच पुढील आयुष्यात स्मृती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

--------------------

childhood
International Childhood Cancer Day: लहान मुलांच्या कर्करोगात वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com