अजूनही सर्वसामान्य पृथ्वीवासीयांना पृथ्वी हे एक पूर्णपणे न उलगडलेले कोडे आहे

साडेचार अब्ज वर्षाच्या पृथ्वीच्या जीवनकाळात तिच्या निर्मितीपासूनच ज्या अनेक अविस्मरणीय भूशास्त्रीय घटना घडल्या, त्यांचे माणसाला आकलन व्हायलाही मोठा कालखंड जावा लागला,
Earth
Earth esakal

साडेचार अब्ज वर्षाच्या पृथ्वीच्या जीवनकाळात तिच्या निर्मितीपासूनच ज्या अनेक अविस्मरणीय भूशास्त्रीय घटना घडल्या, त्यांचे माणसाला आकलन व्हायलाही मोठा कालखंड जावा लागला, हे खरेच.

पण अजूनही सर्वसामान्य पृथ्वीवासीयांना पृथ्वी हे एक पूर्णपणे न उलगडलेले कोडे आहे आणि आपले पृथ्वीबद्दलचे ज्ञान खूपच तोकडे आहे, याचीच जाणीव या पृथ्वी परिचयातून होत गेली असेल.

डॉ. श्रीकांत कार्लेकर

नासाच्या अवकाश निरीक्षण केंद्राने ७ मार्च २००९ या दिवशी इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसदृश ग्रहांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती.

केप्लरने आपल्या सूर्यमालेपलीकडच्या सूर्यामालांमध्ये शोधलेल्या वीस बहिर्ग्रहांवर माणसाला वस्ती करता येईल अशी परिस्थिती असावी, असे लक्षात आले आहे.

गेल्या वर्षभरात पृथ्वी परिचय या सदरातून आपण पृथ्वीवरील अनेक भूशास्त्रीय घटना आणि ठिकाणांचा मागोवा घेतला. आपल्याला कळलेली पृथ्वी खूपच अनाकलनीय, विस्मयकारक आणि तितकीच सुंदर आहे, हे त्यातून लक्षात आले असेल. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात पृथ्वी ही एकमेवाद्वितीय अशी निर्मिती आहे!

आजमितीला भरपूर संशोधन होऊनही आजही पृथ्वीचा आपल्याला पूर्णपणे परिचय झालेला आहे, असे म्हणता येत नाही. हेही अर्थातच तितकेच खरे आहे!

पृथ्वीवरील सध्याच्या अनेक घटना व वैशिष्ट्ये पूर्णपणे अकल्पित आणि गूढ नाहीत. त्यामागे एक निश्चित असा आकृतिबंध आहे आणि तो पृथ्वी निर्मितीच्या आणि उत्क्रांतीच्या विविध छटा समोर आणायला उपयुक्त ठरतो आहे, हेदेखील आपण पाहिले.

साडेचार अब्ज वर्षाच्या पृथ्वीच्या जीवनकाळात तिच्या निर्मितीपासूनच ज्या अनेक अविस्मरणीय भूशास्त्रीय घटना घडल्या, त्यांचे माणसाला आकलन व्हायलाही मोठा कालखंड जावा लागला, हे खरेच. पण अजूनही सर्वसामान्य पृथ्वीवासीयांना पृथ्वी हे एक पूर्णपणे न उलगडलेले कोडे आहे आणि आपले पृथ्वीबद्दलचे ज्ञान खूपच तोकडे आहे, याचीच जाणीव या पृथ्वी परिचयातून होत गेली असेल.

पृथ्वी परिचय करून देणाऱ्या आणि हळूहळू उलगडत गेलेल्या घटनांची आणि वैशिष्ट्यांची यादी तशी खूप मोठी आहे. यातील पृथ्वीवरील भूखंड, वातावरण, तिचे चुंबकत्व, तिच्या कवचाची निर्मिती, समुद्रतळ यांबरोबरच बर्फाने कायम आच्छादित प्रदेश, पाऊस नसलेली वाळवंटे, खचदऱ्या आणि प्रवाळ भिंती अशा विविध वैशिष्ट्यांची ओळख आपण या लेखमालेतून करून घेतली.

आपल्या आकाशगंगेतील ग्रह आणि विश्वाच्या अफाट पसाऱ्यातील इतर ग्रह आणि तारे यांबद्दलचा आपला अभ्यास दिवसेंदिवस वाढतो आहे. यातून लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पृथ्वीची अद्वितीय लवचिकता! साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला.

त्यानंतरच्या काळात अंतराळातून लक्षावधी लघुग्रहांचा मारा पृथ्वीवर झाला. अनेक घडामोडींनी आणि क्रिया-प्रक्रियांनी पृथ्वीवर विविध भूरूपे, भूखंड आणि समुद्र तयार झाले.

आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासात पृथ्वीवर भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक यांसारखे अनंत आघात झाले.

अतिथंड हिमयुगे, मोठ्या प्रमाणावर झालेला जीवसृष्टीचा नाश, सदैव बदलते हवामान अशा अनेकविध संकटांना टक्कर देत पृथ्वी आजही भक्कमपणे टिकून आहे, कोट्यवधी वर्षांपासून ह्या सगळ्या बदलांशी जुळवून घेत आहे! आपली ही पृथ्वी म्हणजे एक वैश्विक आश्चर्यच आहे!

विलक्षण लवचिकता (Resilience) असलेला असा दुसरा ग्रह आपल्या ग्रहमालेत नाही.

सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेले नेमके तापमान आणि त्याची सुसह्य कक्षा (Range) यामुळेच पृथ्वी हा एक आदर्श ग्रह आहे.

पृथ्वी शुक्र ग्रहाएवढी उष्ण नाही आणि मंगळाइतकी थंडही नाही. जीवनावश्यक पाण्याचे प्रमाण पृथ्वीवर भरपूर आहे. सर्व प्रकारच्या सजीवांसाठी, पाण्याच्या गोठणबिंदूपासून उत्कलन बिंदूपर्यंत, म्हणजे शून्य अंशापासून शंभर अंशापर्यंत तापमान कक्षा केवळ इथेच उपलब्ध आहे.

सूर्यापासूनचे पृथ्वी ज्या अंतरावर आहे ते अंतर सजीवांच्या अस्तित्वासाठी आणि उत्क्रांतीसाठी अगदी नेमके आहे. हे अंतर जराही कमी जास्त झाले, तर पृथ्वीवरचे आजचे जीवन आणि पर्यावरण एका क्षणात नाहीसे होईल!

पृथ्वी स्वतःच्या कललेल्या आसाभोवती फिरते आहे. असे नसते तर तिची सूर्यासमोरची बाजू अतितप्त आणि विरुद्ध बाजू अतिथंड झाली असती.

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळेच तिच्याभोवती असलेले जीवनदायी वातावरणाचे आवरण टिकून आहे, अन्यथा सर्व जीवनावश्यक वायू अंतराळाच्या पोकळीत केव्हाच निसटून गेले असते आणि पृथ्वीवर जीवन शिल्लक राहिलेच नसते!

काही शास्त्रज्ञांच्या मते ‘पृथ्वी’सारखा ग्रह अवकाशात अन्यत्र मिळेल की नाही यापेक्षा कुठे मिळेल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे!

Earth
Earth Day 2022: जाणून घ्या पृथ्वीवरील सर्वात चमत्कारिक ठिकाणे

पृथ्वीसारखे ग्रह असतीलच याची खात्री अनेकांना आहे. अवकाशाच्या पोकळीतील अशा प्रकारच्या वीस ग्रहांवर पृथ्वीसदृश परिस्थिती असावी व ते माणसाच्या वास्तव्यासाठी योग्य असावेत, असा अंदाज नासाच्या केप्लर मिशनमधून वर्तविण्यात आला आहेच.

स्पिट्झर, हबल, केप्लर टेलिस्कोपच्या मदतीने यावर आणखी प्रकाश पडेल. अनेक ताऱ्यांभोवती फिरणारे तीन हजार पृथ्वीसदृश ग्रह आपल्याच आकाशगंगेतच असावेत, असा अंदाज केप्लर आणि हबल स्पेस टेलिस्कोपच्या निरीक्षणातून यापूर्वीच व्यक्त करण्यात आला आहे.

नासाच्या केप्लर मोहिमेतून माहितीचा प्रचंड साठा शास्त्रज्ञांच्या हाती पडला, गवताच्या गंजीतून सुई धुंडाळताना महत्त्वाचा ऐवज सापडावा तसा! माहितीच्या या साठ्यातून आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका गटाला सापडलेल्या या वीस वस्तीयोग्य ग्रहांपैकी किती माणसाला राहायला योग्य असतील आणि त्यातल्या किती ग्रहांपर्यंत जाता येईल, हे सांगणे मात्र आजही कठीण आहे.

नासाच्या अवकाश निरीक्षण केंद्राने ७ मार्च २००९ या दिवशी इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसदृश ग्रहांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत केप्लरने अक्षरशः अगणित नवीन घटनांचा शोध घेतलाय.

केप्लर यानाने आपल्या सूर्यमालेबाहेर शोधलेल्या ग्रहांपैकी त्यांच्या त्यांच्या सूर्यांभोवती फिरणाऱ्या वीस बहिर्ग्रहांवर (Exoplanets) माणसाला वस्ती करता येईल अशी परिस्थिती असावी, असे आता लक्षात आले आहे. याआधी केप्लरने एकूण २१९ बहिर्ग्रहांचा शोध घेतला होता, त्यापैकी फक्त दहा वस्ती करण्यायोग्य असावेत असा अंदाज करण्यात आला होता.

केप्लरच्या साहाय्याने एकूण १ लाख ४५ हजार ताऱ्यांची तेजस्विता (Brightness) तपासून त्या संबंधीची माहिती पृथ्वीवर पाठविली गेली. या तेजस्वितेच्या अभ्यासानंतर बहिर्ग्रहांच्या अस्तित्वाबाबत निर्णय घेतला जातो.

Earth
Alien mock signal from Mars to Earth : मंगळावरून पृथ्वीवर मिळाला सांकेतिक संदेश

या वीस ग्रहांपैकी केओआय-७९२३.०१ असे नामकरण केलेला एक ग्रह तर आपल्या पृथ्वीसारखाच असल्याचे दिसून आले आहे.

तिथल्या एका वर्षाचे दिवसही ३९५ म्हणजे पृथ्वीवरच्या ३६५ दिवसांशी मिळतेजुळते आहेत आणि त्याचा आकारही पृथ्वीच्या आकाराच्या ९७ टक्के इतका आहे! तो ज्या सूर्याभोवती फिरतोय तो सूर्यही आकाराने, वस्तुमानाने आणि वयोमानानेही आपल्या सूर्यासारखाच आहे.

मात्र त्याचे धातुत्त्व (Metallicity) आपल्या सूर्याच्या दुप्पट आहे. धुक्याने वेढलेल्या या खडकाळ थंड ग्रहावर जीवनाचे (Life) अस्तित्व असू शकेल इतकी ऊब आणि उष्णताही आहेच.

त्यामुळेच काही शास्त्रज्ञांच्या मते या ग्रहावर माणसासारखेच किंवा आपण कल्पना करतो तसे परग्रहीय जीव (Aliens) असण्याची दाट शक्यता आहे. या ग्रहावरचे हवामान पृथ्वीवरच्या सैबेरियासारख्या टुंड्रा हवामानाशी साधर्म्य सांगणारे आहे.

केप्लर-१८६एफ हा ग्रह पृथ्वीपेक्षा जास्तीत जास्त दहा टक्के मोठा आहे, आणि तो त्याच्या ताऱ्याच्या राहाण्यायोग्य कक्षेत (Habitable Zone) आहे असे दिसते.

केप्लर-१८६एफ या ग्रहाला, पृथ्वीला सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या फक्त एक तृतीयांश ऊर्जा त्याच्या ताऱ्यापासून मिळते. हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे ५०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

Earth
Humans Disappear From Earth : पृथ्वीवरून मानव कधी आणि कसा नाहीसा होईल, शास्त्रज्ञांनी सांगितल तारीख आणि कारण

नासाच्या ट्रान्झिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइटमधील (Transiting Exoplanet Survey Satellite) डेटा वापरून, शास्त्रज्ञांनी गेल्या १० जानेवारीला टीओआय ७००ई नावाचा आणखी एक ग्रह शोधला आहे.

हा ग्रहसुद्धा त्याच्या ताऱ्याच्या राहाण्यायोग्य क्षेत्रामध्ये परिभ्रमण करत आहे. या टीओआय ७००ई पृथ्वीच्या आकारमानाच्या ९५ टक्क्यांएवढा आहे, आणि बहुतांशी खडकाळ आहे. पृथ्वीपासून ते केवळ १०० प्रकाशवर्षे दूर आहे.

यापैकी बऱ्याच ग्रहांच्या त्यांच्या स्वतःच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गती, त्यांच्यावरील तापमान, सामान्य हवामान हे पृथ्वीवरील या सर्व घटकांच्या कमीअधिक प्रमाणात सारखेच असल्याचे आढळले आहे.

त्यामुळेच दुसरी ‘वसुंधरा’ शोधण्याचे माणसाचे प्रयत्न अवकाशाच्या याच भागात फळाला येतील, असाही आशावाद आता बळावतो आहे.

माणसासारखेच असणारे किंवा आपण कल्पना करतो तसे परग्रहीय जीव शोधण्यासाठी या ग्रहांवर माणसाला अवकाशयान पाठवावे लागेल. तिथे असे जीव मिळण्याची शक्यता जास्त आहे, असाही दावा सध्या केला जातो आहे.

भविष्यात पृथ्वी माणसाच्या वास्तव्यासाठी अनुकूल राहणार नाही. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर माणसाला वस्तीयोग्य ग्रहाचा शोध घ्यावाच लागेल, असे मत पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केले होते. येत्या हजार ते दहा हजार वर्षांत पृथ्वीवर मोठे संकट येण्याची शक्यता खूपच मोठी आहे.

त्यामुळे तोपर्यंत माणसाने इतर ग्रहावर वस्ती केलेली असलीच पाहिजे. या काळात अवकाशाच्या अफाट पसाऱ्यात मानवाने वास्तव्य करण्याजोगी ठिकाणे शोधून ती राहाण्यायोग्य केली तरच मानवजातीचे अस्तित्व अबाधित राहू शकेल, असे डॉ. हॉकिंग २०१६मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी युनियनमध्ये केलेल्या भाषणात म्हणाले होते.

हॉकिंग यांच्या मताप्रमाणे जर वस्तीसाठी बाहेरच्या ग्रहांचा शोध घ्यायलाच लागणार असेल तर आज आपल्याला वस्ती करण्यायोग्य अशा किती आणि कोणत्या ग्रहांची माहिती आहे याचाही विचार यानिमित्ताने वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा सुरू केला आहे.

(या लेखाबरोबरच ‘पृथ्वी परिचय’ हे सदर समाप्त होत आहे.)

--------------

Earth
Earth : पृथ्वीने महाविस्फोटक तापमानात केला प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com