स्पायसेस ॲण्ड आयुर्वेदिक गार्डन.. भारतात कुठे आहे हे ठिकाण?

कौलारू घरं, लुंगीधारी माणसं, टपऱ्यांमधून लटकवलेले केळीचे खुंट... सारंच काही अप्रुप वाटण्याजोगं!
Kerala tourism
Kerala tourismesakal

आर. डी. शिंदे

नजर जाईल तिकडं पाणीच पाणी. लांबवरच्या नारळाच्या झाडांनी, हिरव्यागार गर्द वेलींनी व्यापलेला किनारा सूर्यप्रकाशात शोभून दिसत होता. त्या निसर्गाच्या सौंदर्याला तोड नव्हती.

एका ट्रॅव्हल कंपनीतर्फे केरळ टूर आयोजित केली होती. सकाळी पुण्याहून रेल्वेने पनवेल आणि पनवेल ते थेट एर्नाकुलम असा जवळजवळ पंचवीस तासांचा प्रवास झाला.

बॅगा ने-आणीचा वैताग सोडल्यास प्रवास सुखकर झाला. अगोदरच बुक केलेली व्हॅन रेल्वे स्थानकावर आली अन् आमचा प्रवास सुरू झाला. धावत्या व्हॅनमधून दिसणारा निसर्ग हिरवाईनं फुलला होता.

दोन्ही बाजूस उंच नारळाची सलग झाडं, केळीच्या बागा, खेटून असलेल्या लहान-मोठ्या पानांच्या वेली, पाणथळ शेती, पाण्यातून जाणारा नावाडी, कौलारू घरं, लुंगीधारी माणसं, टपऱ्यांमधून लटकवलेले केळीचे खुंट... सारंच काही अप्रुप वाटण्याजोगं! वाटेतच दुपारचं जेवण करून मुन्नारच्या दिशेनं प्रवास सुरू झाला.

पहिलं ठिकाण पाहिलं ते स्पायसेस ॲण्ड आयुर्वेदिक गार्डन. एन्ट्री फी शंभर रुपये होती. तिथं जायला घसरत्या उंच दगडी पायऱ्या होत्या. त्यात पाऊस पडून गेला होता, त्यामुळे मला ते चढणं नकोसं वाटलं म्हणून मी बाहेरच थांबलो.

बाकीचे बघून आले. तिथेच मसाले आणि साड्यांची खरेदी करून पुढे निघालो. वाटेत एका ठिकाणी उंचावरून पडणारा धबधबा पाहताना मज्जा आली. डोंगरकपारीत धुरांच्या लाटांप्रमाणे वाहणार धुकं तर लाजवाब! एव्हाना अंधार पडला होता.

आरक्षित केलेलं लॉज लवकर सापडेना. सापडलं तेव्हा तिथं गडद अंधार होता. लाईट गेले होती. लॉजही निर्मनुष्य ठिकाणी होतं, तिथं राहणं धोक्याचं वाटलं.

त्यामुळं आम्ही दुसऱ्या रिसॉर्टकडे मोर्चा वळवला. मुन्नारमध्ये आमचा मुक्काम दोन दिवस होता. दुसऱ्या दिवशीची सकाळ प्रसन्न होती.

हवेत गारवा, नजर जाईल तिकडे हिरवाई, खोल दऱ्या, आसपासची नारळाची झाडी, गर्द झाडीतून पुसट दिसणारे बंगले, डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत जणू काही भांग पाडलेले वर्तुळाकार हिवेगार चहाचे मळेच मळे... अलौकिकच होतं सारं!

Kerala tourism
Konkan Tourism : कोकणात पर्यटनाचा खजिना; रोजगार-व्यवसायाला मोठ्या संधी

दुसऱ्या दिवशी पहिलं ठिकाण पाहिलं ते म्हणजे चहाची फॅक्टरी. तिथंही तिकीट दर शंभर रुपये. तिथं दाखवलेली चहाची पाने तोडण्यापासून ते पॅकिंगपर्यंतची चित्रफीत कुतूहलानं पाहिली. तिथं फिरताना प्रत्येक ठिकाणी गाइडनं बरीच माहिती दिली.

बाहेर आल्यावर अधाशाप्रमाणे वेगवेगळा चहा खरेदी केला. या प्रकल्पात टाटा समूहाची भागीदारी उल्लेखनीय आहे. पुढचा दौरा होता इको पॉइंटला.

इथलं अथांग निळ्या पाण्याचं सरोवर, किनाऱ्याकाठची गर्द झाडी, सौंदर्यात भर घालणारे पांढरे पक्षी, बोटीतून मज्जा लुटणारे हौशी पर्यटक असं मनोहारी दृश्य होतं. सरोवराच्या किनाऱ्यालगत मनसोक्त फिरण्यासाठीची पायवाट होती. एकंदरीत दिवस छान गेला.

आता आम्हाला थेक्कडीला जायचं असल्यानं आम्ही सकाळीच रिसॉर्ट सोडलं. पुढील टप्पा होता सफारीचा.

ओबडधोबड चिखलानं माखलेला रस्ता असल्यामुळं आमची व्हॅन आत जाऊ शकत नव्हती. पण त्याच ठिकाणी सफारी व्हिलेज टूरच्या बऱ्याच जीप थांबल्या होत्या.

घासाघीस करून त्यातली एक जीप ठरवली आणि सफारीला निघालो. रस्ता फारच खराब होता, बैलगाडीत बसल्यासारखे वाटू लागले. सगळेच बसल्या जागेवर डुलू लागले. ड्रायव्हर गाडी चालवता चालवता माहितीही पुरवत होता.

एका ठिकाणी थांबून त्यानं लगडलेल्या वेलचीचं झाड दाखवलं. तो चतुराईनं वळून अवघड उंच चढ चढत होता, पण आम्ही भ्यायलो होतो. वाटेत रिपल वॉटर फॉल, हॅगिंग ब्रीज पाहिला आणि मुख्य आकर्षण असलेल्या पोनमुडी धरणापाशी आलो.

हे धरण पन्नियार नदीवर आहे. हा परिसर नारळाच्या झाडांनी, केळीच्या बागांनी, औषधी- मसाल्याच्या वेलींनी फुलला होता.

स्वच्छ निळं पाणी, निळं आकाश अन् उडणारे हजारो पांढरे पक्षी... जणू स्वर्गच अवतरला होता. पाण्यापर्यंत जाताना मजा आली.

धरणाजवळच शाहरूखच्या चेन्नई एक्स्प्रेसमधला एक सीन शूट झाला होता. ते ठिकाण आता पर्यटन स्थळ झालं आहे.

Kerala tourism
Kerala Tourism: निसर्गाचं वरदान लाभलेलं पावसाळ्यातील केरळ...

हे सर्व पाहून आम्ही आमच्या जीपनं थेक्कडीला निघालो, तासाभरात पोहोचलोसुद्धा. हॉटेलमध्ये फ्रेश होऊन हिंडायला बाहेर पडलो. थोडी खरेदी करून परतलो. दुसऱ्या दिवशी अल्लाप्पुडाला (अल्लेपी) जाण्यासाठी सकाळी लवकर आवरून आम्ही तयार होतो.

बाहेर रस्त्यावर धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं, वाहनं हेडलाईट लावून धावत होती. त्याचेही फोटो काढून झाले. अल्लाप्पुडाच्या दिशेनं जाऊ लागलो, तसं डोंगराच्या रांगा मागे पडून चिखलानं माखलेली सपाट जमीन दिसू लागली.

चोहोबाजूंनी पाणी अन् मध्यभागी घरं.. त्यात राहणाऱ्या माणसांचं जीवनमान कसं असेल? नवल वाटलं. संध्याकाळी इच्छितस्थळी पोहोचलो. इथं आम्ही बोटहाऊसमध्ये राहणार होतो.

दुमजली बोट होती. छे! बोट कसली, ही तर सर्व सोयींनी समृद्ध अशी पंचतारांकित हॉटेलमधील पॉश रूमच. बोटीवर आठ ते दहा रूम असाव्यात.

मदतीला तीनजण होते; बोट चालक, स्वयंपाकी आणि तिसरा मदतनीस. रात्रीच्या जेवणात तळलेला मासाही मिळाला.

लाटांच्या माऱ्यात बोट हलली नाही, हेळकांडली नाही तेव्हा, ‘न हिली – न डुली – न चिखी- न चिल्लायी’, या प्रेमचंद्र मुन्शीच्या एका कथेतील ओळी आठवल्या. प्रवासाची दगदग झाल्यामुळे गाढ झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशीची सकाळ प्रसन्न होती. खिडकीचा पडदा बाजूला करताच काचेतून कित्येक बोटी आसपास अगदी खेटून उभ्या असलेल्या दिसल्या. नजर जाईल तिकडं पाणीच पाणी.

लांबवरच्या नारळाच्या झाडांनी, हिरव्यागार गर्द वेलींनी व्यापलेला किनारा सूर्यप्रकाशात शोभून दिसत होता. त्या निसर्गाच्या सौंदर्याला तोड नव्हती.

ब्रेकफास्ट झाल्याबरोबर आम्ही बोटीतून निघालो. सर्वत्र अशा कित्येक लहानमोठ्या बोटी फिरत होत्या. एकजण लहान यांत्रिक बोटीतून दोन-तीनजणांना घेऊन पाणी छेदत भर्रकन जाताना दिसला. हिरव्या शेंगांच्या वेलीप्रमाणे पाण्यातल्या वनस्पतींचे पुंजके लाटांवर डुलत होते. काही मासे वरती झेप घेऊन पुन्हा पाण्यात शिरत होते.

अन्नाच्या शोधात असलेले पक्षी लागलीच वर आलेल्या माशांवर झडप घालत होते. बघताना मजा आली. पाण्याच्या मध्यभागी आलो.

नामवंत चित्रकारानं तैलचित्र रंगवावं तसा पाठीमागचा किनारा अंधुक दिसला. बघता बघता पुढील किनारा आला, तिथं बोट थांबली.

नारळ-केळीच्या झाडांनी व्यापलेला किनारा,चर्च, साधीच पण टुमदार घरं, लुंगीधारी माणसं, हौशी पर्यटक, दुकानं, हॉटेल आणि बरंच काही पाहण्याजोगं होतं.

परतीच्या फेरीसाठी बोट थोडी लांब जाऊन वळली. आदल्या सायंकाळी जिथं बोट थांबली होती, तिथं परत कधी आणि कसं आलो ते समजलंदेखील नाही.

Kerala tourism
Kerala Dog : शवागराबाहेर चार महिन्यांपासून मालकाची वाट पाहतोय 'चार्ली'; हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

इतके दिवस जो ड्रायव्हर आम्हाला साथसंगत करत होता, तो आता येईचना. का आला नाही, याच्या बऱ्याच सबबी ऐकायला मिळाल्या. त्याचा फोनही बंद होता. आधी प्रामाणिक वाटला, पण आता मात्र त्याची चीड आली.

शेवटी फोनाफोनी करून दुसरा ड्रायव्हर आला आणि काळजी मिटली. व्हॅन लांबवर उभी होती. खडकांतून तिथपर्यंत बॅगा नेताना वैताग आला. पण व्हॅनमध्ये बसताच पुन्हा हुरूप आला. एखादं गाव-शहर लागलं की उत्सुकता वाटायची.

मल्याळी भाषेत लिहिलेलं काही समजत नव्हत. रस्त्यात एका देखण्या हॉटेलात दुपारच जेवण झालं. जवळजवळ दोन अडीच तासांनी सव्वापाचच्या सुमारास पूवरमध्ये नेय्यर बॅक वॉटर क्रूझिंगसाठी पोहोचलो.

दोन्ही बाजूला घनदाट वेलींनी वेढलेल्या इवल्याशा नागमोडी कालव्यातून बोट जाऊ लागली. न समजणाऱ्या अशा हिंदीतून गाइड कम बोट चालक माहिती देत होता, ‘ये जहरीला पेड देखो । वो वनस्पती दवा के वास्ते अच्छी है । सामने नारीयल के पेड फेमस है, ये केला बाग देखिये..।’

अचानक कालव्यातून जणू समुद्रात शिरल्यासारखं वाटलं. गाइड सांगत होता, ‘सामने देखो, एलिफंट रॉक... बाये तरफ का पानी दर्या में मिलता है...’ वगैरे वगैरे.

आम्ही मात्र सर्वत्र पसरलेले पाणी, किनाऱ्यालगतची उंच नारळाची, केळीची झाडं पाहण्यात दंग होतो. पाण्यावर सूर मारून मासे पकडणारे पक्षी काही औरच. सूर्यास्ताला दहा-पंधरा मिनिटं होती. आकाश सप्तरंगानी रंगलं होतं.

त्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर दिसणाऱ्या माणसांच्या काळसर प्रतिकृती म्हणजे फ्रेम करण्याजोगं चित्रच! तिथं आमची बोट थांबली. चपला बोटीतच ठेवून मऊ सोनेरी वाळूतून अनवाणी चालताना एक वेगळाच आनंद मिळाला.

Kerala tourism
Keral floods: भारत आभारी आहे, केरळसाठी परदेशी मदत नाकारली...

बीचवर आलो. समुद्राच्या महाकाय लाटा किनाऱ्याला धडकत होत्या. इथला निसर्गाच्या सान्निध्यातला सूर्यास्त देखणाच होता. अंधाराची चाहूल लागली तसे आम्ही बोटीच्या दिशेने निघालो. नावाडी गायब झाला होता.

चिखलाने, वेलींनी माखलेला उभा चढ धोकादायक होता. घसरून पाण्यात पडण्याचा धोका होता. मी, राहुल, कुमार वर गेलो.

एकमेकांचे हात धरत तिघांनी मिळून साखळी केली अन् महिलांना अक्षरशः वरती ओढत सुखरूप आणलं. असे अडथळे आले तरी ही बोट सफारी न विसरता येण्याजोगी अशीच होती.

अर्ध्या तासात त्रिवेंद्रमला आलो, मुक्काम तिथंच होता. तिथलं जगप्रसिद्ध पद्मनाभन मंदिर पाहून पुढील प्रवासाला निघालो. वाटेतच चहा, नाश्ता झाला.

दुपारचं जेवण करून एर्नाकुलमच्या दिशेनं निघालो. रस्त्यात लू लू या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अतिभव्य चकचकित आणि तोबा गर्दी असलेल्या मॉलला भेट दिली. तिथं मसाले घेतले.

एर्नाकुलममध्ये आमचा शेवटचा मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे परतीच्या प्रवासाला लागतो.

आमच्या बजेटमध्ये, मोजक्या सहकारी प्रवाशांसह झालेली ही ट्रिप डोळ्यांचं पारणं फेडणारी अशीच होती. केरळचा चतकोर भागच आम्ही पाहिला असावा.

संपूर्ण केरळ पाहायला, निसर्गाचा आनंद लुटायला तीन-चार महिनेसुद्धा कमीच पडतील!

-------------------------

Kerala tourism
Anurag Kashyap: कमल हसन नंतर आता अनुरागची The Keral Story वर टीका, म्हणाला.. एक निव्वळ राजकीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com