आयफोन : काय ती स्क्रीन, काय तो कॅमेरा, काय ती शायनिंग, ओक्केमध्ये आहे!

iphone
iphoneesakal

गोपाळ कुलकर्णी

खरंतर तो येण्याच्या आधीच लोकांनी त्याला पाहिलं होतं. औपचारिकता फक्त घोषणेची होती. अपेक्षेप्रमाणं बारा सप्टेंबरच्या रात्री त्याची उद्‍घोषणाही झाली अन् समाजमाध्यमांत प्रतिक्रियांचा अक्षरशः महापूर आला. कोणी त्याच्या रूपावर लट्टू झालं होतं तर कुणी नव्या फिचरवर फिदा झालं. त्याच्या मखमली ‘डिस्प्ले’वर आपलीही बोटं फिरावी म्हणून अनेकांचे हात शिवशिवू लागले. भारतात तो अवतरताच यूझरच्या त्याच्यावर अक्षरशः उड्या पडल्या. ‘अ‍ॅपल’ नावाचं गारुड काय आहे? याची प्रचिती पुन्हा एकदा आली. ही कथा आहे आयफोनप्रेमींची, नव्या तंत्रज्ञानाला कवेत घेऊ पाहणाऱ्या हायटेक नेटीझन्सची...

पहिलाः आयफोन घेतोयस भावा..? पेमेंट ऑप्शन म्हणून किडनी तयार ठेव.

दुसराः आयफोन घ्यायला आता किडनीदेखील पुरेशी ठरणार नाही.

तिसराः गेल्या तेरा वर्षांपासूनचा ‘अ‍ॅड्रॉईड’सोबतचा संसार मी अखेर आज मोडला. मी माझा आत्मा बिग आयफोनला विकलाय. काय ती स्क्रीन, काय तो कॅमेरा, काय ती शायनिंग, ओक्केमध्ये आहे!

iphone
Tata iPhone India : आता भारतात 'टाटा' बनवणार आयफोन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

एकीकडं ‘अ‍ॅपल’चा ‘वंडरलस्ट’ हा लाँचिंग प्रोग्रॅम सुरू असताना दुसरीकडं सोशल मीडियामध्ये मीम्सचा अक्षरशः महापूर आला होता. फेसबुक असो अथवा एक्स किंवा इन्स्टाग्राम सगळीकडं चर्चा होती ती फक्त ‘आयफोन-१५’ चीच. या स्तुतिपाठकांमध्ये कोण नव्हतं? अब्जाधीश एलॉन मस्कपासून ते काही लाखांमध्ये उलाढाल असलेल्या स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्या तरुण अभियंत्यापर्यंत... हौशी कॉलेजकुमारांपासून आताच थोडासा पैसा खिशात खुळखुळू लागलेल्या नवउद्योजकापर्यंत... बॉलिवूडच्या बड्या सिनेतारकांपासून ते कधी-मधी छोट्या पडद्यावर डोकावणाऱ्या हौशी कलाकारांपर्यंत... सगळेजण आयफोनच्या प्रेमात पडले होते. अ‍ॅडम आणि ईव्हलाही पहिल्या सफरचंदाचं कधी एवढं कुतूहल वाटलं नसेल त्यापेक्षाही अधिक उत्कंठा या अ‍ॅपलप्रेमींच्या मनात आयफोनप्रती होती.

भारतात आयफोन आला तेव्हा खरेदीसाठी दिल्ली अन् नोएडाच्या संपन्न पट्ट्यामध्ये लोकांच्या दुकानाबाहेर अक्षरशः रांगा लागल्या होत्या. मॉल ओसंडून वाहत होते. कुणी घ्यायला आला होता तर कुणी नुसताच पाहायला. पण प्रत्येकाच्या मनात एकच आस होती. ती म्हणजे नव्या आयफोनला एकदा तरी स्पर्श करायचाच. आयफोनला आता सोन्याचा ग्लॅमर आलंय. स्टीव्ह जॉब्सनं ४७ वर्षांपूर्वी लावलेल्या या झाडाला नवं फळ लागलंच नाही, असं कधीच झालं नाही. फळं लागणाऱ्या झाडालाच लोकं दगडं मारतात, ही आपली लोक-म्हण पण इथं प्रत्यक्षात उलटं होतं. लोकं या झाडावरचं सफरचंद घेण्यासाठी अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. त्यासाठी कितीही किंमत मोजायची त्यांची तयारी असते. केवळ आयफोनच नाही तर ‘स्मार्टवॉच’, ‘मॅकबुक प्रो’, ‘होमपॉड’, ‘मॅकबुक एअर’, ‘न्यू मॅक स्टुडिओ’ या ॲपलच्या सगळ्या उत्पादनांचा ग्राहकांशी एक वेगळा अनुबंध तयार झाला आहे. तंत्रयुगातील ही एक स्मार्ट रिलेशनशिप म्हणावी लागेल.

iphone
Iphone : आयफोन युजर्सची चिंता मिटली ! आता व्हॉट्सअप चॅनल बनवता येणार .. जाणून घ्या सोप्या स्टेप्स

भावनिक ऋणानुबंधाचे दर्शन

यंदा ‘वंडरलस्ट’ची थीम हाच भावनिक बंध दर्शविणारी ठरली. ‘अ‍ॅपल’च्या स्मार्टवॉचमुळं कुणाला आपला रक्तदाब कमी झालाय हे कळलं तर कुणाची आयफोनच्या ‘इमर्जन्सी एसओएस व्हाया सॅटेलाईट’ या ऑप्शनमुळे दुर्गम भागातून सुटका होऊ शकली. यंदा या सगळ्या मंडळींनी त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करताना आपल्या जीविताचं श्रेय ‘अ‍ॅपल’च्या उत्पादनांना दिलंय. अ‍ॅपल वॉचनं स्मार्ट नेटीझनना लोकांसोबत कनेक्ट तर केलंच पण तीच आता त्यांची डिजिटल डॉक्टर देखील बनली आहे. आपल्या शरीरात नेमकी काय गडबड सुरू आहे? याची पूर्वसूचना देण्याचं काम ती करू लागली आहे. ‘वंडरलस्ट’मध्ये अशाच काही ह्यूमन इंटरेस्ट कथा दाखविण्यात आल्या होत्या.

स्मार्टफोनच्या फोल्डिंग जगात

अ‍ॅपलप्रमाणे गुगल हेदेखील स्मार्टफोन उद्योगातील आघाडीचं नाव. ‘अ‍ॅड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम’चा जन्म हा गुगलच्याच पोटात झालाय. अधिक फिचरिस्टिक होत चाललेल्या स्मार्टफोनची भविष्यातील वाटचाल एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हातात असेल यात तिळमात्रही शंका नाही. ‘सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड-४’ आणि ‘गुगल पिक्सल फोल्ड’नं यूजरना टॅब्लेट शेप जगाचा अनुभव त्यांच्या हातात आणून दिला. नव्या स्मार्ट उत्पादनांचा हा अंत असेल का? या प्रश्नावर ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिलेलं उत्तर देखील तितकंच विचार करण्यासारखं आहे. स्मार्टफोनचं हे अंतिम भवितव्य नसलं तरी त्याचा भविष्यातील प्रवास मात्र याच दिशेनं होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

वापराला नवा फिल येणार

‘एआय’च्या आगमनामुळं आता बहुतांश कंपन्या या हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरच्या विकासावर अधिक लक्ष देतील हे उघड सत्य आहे. एआय आता कोठे हळूहळू मुख्य प्रवाहात येऊ पाहतंय. त्यामुळं माणसाचा स्मार्टफोनसोबतचा संवाद अधिक नैसर्गिक होत जाईल, त्यातील तांत्रिक क्लिष्टता दूर होईल, असं सुंदर पिचाई म्हणतात ते उगाच नाही. वेअरेअबल डिव्हाइसच्या आगमनामुळं स्मार्टफोनचं महत्त्व कमी होईल, असंही नाही. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर) डिव्हाईसेसचं स्वतःचं एक वेगळं स्थान आहे. स्मार्टफोनला ते पूर्णपणे पर्याय ठरतील, असंही नाही. पण अन्य काही तांत्रिक बदलांमुळे स्मार्टफोनच्या वापराचा फिल बदलणार आहे एवढं मात्र नक्की.

iphone
Motorola Rollable Phone : स्मार्टवॉच विसरा, आता मनगटावर गुंडाळता येणार चक्क स्मार्टफोन; पाहा व्हिडिओ

होलोग्राफीक डिस्प्ले

या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळं यूजरना थ्री-डी होलोग्राफीक प्रतिमांशी संवाद साधता येईल, यामुळं ऑनलाइन शिक्षण, गेमिंग आणि मनोरंजन आदी क्षेत्रांचा चेहरामोहरा बदलेल. ‘एआर’ आणि ‘व्हीआर’वर आधारित अ‍ॅपसाठी हे नवं तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे.

युनिव्हर्सल वायरलेस चार्जिंग

वायरलेस चार्जिंग हे स्मार्टफोनचं भवितव्य मानलं जातं, वायरलेस चार्जिंग पक्सच्या माध्यमातून हे भवितव्य साकार होणार आहे. ‘क्यूआय स्टँडर्ड’ची वाढती लोकप्रियता लक्षात घेता भविष्यात बहुसंख्य स्मार्टफोन उत्पादक कंपन्या या मार्गावर जातील, एवढे मात्र निश्चित.

अन्य अपेक्षित बदल

एआय, एमएल तंत्रज्ञानाचा बोलबाला वाढेल

जगभर फाइव्ह-जी तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढणार

दीर्घकाळ टिकणाऱ्या पॉवरफुल बॅटरीचा वापर

रिमोट कंट्रोलसारखी क्षमता असणारे उपकरण

स्मार्टफोनमधील सुपरअ‍ॅपची क्षमता वाढणार

हेल्थ- ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा प्रभाव आणखी वाढेल

लिथियम-आयन बॅटरीला नवे पर्याय मिळणार

अ‍ॅपलचाच दबदबा का?

जगभरात अनेक बड्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांचा बोलबाला असताना अ‍ॅपलच्या आयफोनची एवढी क्रेझ का? प्रत्येकवेळी अ‍ॅपलच्या उत्पादनांच्या आगमनाची चातकासारखी वाट का पाहिली जाते? या प्रश्नांची उत्तरं त्या उत्पादनाच्या गुणवत्तेत दडली आहेत. ‘अ‍ॅपल’ने ‘आयफोन-१५’ सोबतच ‘आयफोन-१५ प्रो’, ‘आयफोन-१५ प्लस’ आणि ‘आयफोन-१५ प्रो मॅक्स’ ही सीरिजच बाजारात आणली आहे. नवीन दमदार फीचर देतानाच अ‍ॅपलने आता कार्बनमुक्त उत्पादनांच्या दिशेने निर्णायक पावले टाकण्याचा संकल्प केला आहे. हे यंदाच्या लाँचिंग प्रोग्रामचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

iphone
Mobile Phone Use In Pregnancy : गर्भावस्थेत मोबाइल फोनचा वापर करणे सुरक्षित आहे का?

कार्बन न्यूट्रल उत्पादनांच्या दिशेनं

जगातील सर्वच देशांना वाढत्या वैश्विक तापमानाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. बड्या वित्तीय संस्था या क्लायमेट रिस्कचा गांभीर्याने विचार करत असताना ‘अ‍ॅपल’सारखी भविष्यवेधी कंपनी त्यात मागे राहिली असती तरच नवल. नव्या अत्याधुनिक उत्पादनांसोबतच आता अधिक कार्बन न्यूट्रल होण्याचा संकल्प ‘अ‍ॅपल’च्या व्यवस्थापनाने केलेला दिसतो. यासाठी कंपनीचे व्यवस्थापन भविष्यातील पर्यावरणपूरक बदलांकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहते? याचा अभ्यास करणे अधिक समर्पक ठरेल. अ‍ॅपल पार्कमध्ये टिम कूक यांना ‘मदर नेचर’नं विचारलेले प्रश्न आणि त्याला त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली उत्तरे ही कंपनी भविष्यात नेमक्या कोणत्या दिशेने चालली आहे? हे दाखवून देतात. प्रत्यक्ष उत्पादनांची निर्मिती, पुरवठा साखळी आणि उत्पादनाचे जीवनचक्र हे सगळं कार्बनमुक्त करण्याचं कंपनीनं ठरविलं आहे. कार्बनमुक्त उत्पादनांसाठी ‘अ‍ॅपल’नं २०३०चं लक्ष्य निर्धारित केलं आहे. उत्पादनांच्या नव्या सीरिजमध्ये याचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. कंपनी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत उत्पादनांच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणार आहे. अ‍ॅल्युमिनिअम, कोबाल्ट आणि सोन्यासारखे घटकदेखील रिसायकलिंगच्या माध्यमातून मिळविण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.

इकोफ्रेंडली मेसेज लक्षात घ्यावा

‘अ‍ॅपल’च्या नव्या स्मार्टवॉचमध्ये (सीरिज-९) फाईनवुव्हन मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. स्वच्छ ऊर्जेसाठी अ‍ॅपल चीन आणि सिंगापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करते आहे. उत्खनन, निर्मिती, वाहतूक आणि रिसायकलिंग अशा सगळ्याच टप्प्यांवर कार्बन न्यूट्रल भूमिका अंगीकारण्यात येणार आहे. कंपनीच्या क्युपर्तिनो येथील मुख्यालयातून हळूहळू प्लॅस्टिक आणि कातड्याची (लेदर) उत्पादने हद्दपार होणार आहेत. त्याची जागा ‘फाईनवुव्हन मटेरिअल’पासून तयार करण्यात आलेली उत्पादने घेणार आहेत. अ‍ॅपल ‘वॉच अल्ट्रा- २’ मध्ये ९५ टक्के हे रिसायकल करण्यात आलेले टिटॅनियम वापरण्यात आले आहे. याआधी पूर्णपणे शुद्ध टिटॅनियमचा वापर केला जात असे. पुरवठा साखळीतील भागीदार कंपन्यांना विश्वासात घेऊन ‘अ‍ॅपल’ने या दशकाच्या अखेरपर्यंत कार्बन उत्सर्जन हे ७५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्धार केला आहे.

अ‍ॅपल’चं हे स्मार्ट इकोफ्रेंडली स्वप्न लोभसवाणं असलं तरीसुद्धा ते सामान्यांच्या आवाक्यात आलं तर अधिक चांगलं होईल. एवढं मात्र नक्की. आयफोनवर जीव ओवाळून टाकणाऱ्यांनी ‘वंडरलस्ट’चा हा इकोफ्रेंडली मेसेज लक्षात घेणं गरजेचा आहे, कारण ते उद्याचे भविष्य आहे.

-----------

iphone
Cyber Security: ‘ओटीपी’च्या संगे, ‘पासवर्ड’ भंगे, धोका हा तरंगे, इंटरनेटी..!!

उत्पादनांची वैशिष्ट्ये

आयफोन-१५

आकार ः १४७.६ mm x७१.६ mm x ७.८० mm

वजनः १७१g

डिस्प्लेः ६.१-inch OLED

रेझोल्यूशनः २५५६ x ११७९ pixels

चीपसेटः A१६ Bionic

मागचा कॅमेराः ४८MP main, १२MP ultrawide

फ्रंट कॅमेराः १२MP

स्टोरेजः १२८GB, २५६GB, ५१२GB

आयफोन- १५ प्रो

आकारः १४६.६ mm x ७०.६ mm x ८.२५ mm

वजनः १८७ g

डिस्प्लेः ६.१-inch OLED

रेझोल्युशनः २५५६ x ११७९ pixels

चिपसेटः A१७ Pro

मागील कॅमेराः ४८MP wide, १२MP ultra-wide, १२MP telephoto with ३x optical zoom

पुढील कॅमेराः १२ mp

स्टोरेजः १२८GB, २५६GB, ५१२GB, १TB

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com