भाजपचं पुण्यात 'शतप्रतिशत'चं स्वप्न भंगलं! | | Election Results 2019

Analytical article on Pune Vidhansabha election results 2019
Analytical article on Pune Vidhansabha election results 2019

पुणे : पुणे शहरात आठपैकी दोन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्याने, भाजपचे "शत प्रतिशत' विजयाचे स्वप्न भंग पावले. भाजप सहा मतदारसंघात विजयाची घोडदौड करीत असले, तरी शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांना जोरदार टक्कर दिली. 

लोकसभा निवडणुकीत भाजपने पुण्यात सुमारे तीन लाखांचे मताधिक्‍य मिळविले होते. गेल्या निवडणुकीत भाजपने आठही जागा जिंकलेल्या, तसेच महापालिकाही त्यांच्याच ताब्यात असल्यामुळे, भाजप यावेळीही शत प्रतिशत यश पुन्हा मिळविणार, अशीच चर्चा रंगली होती. मात्र, उपनगरांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले. भाजपने सहा जागा राखल्या असल्या, तरी त्यांचे मताधिक्‍य मोठ्या प्रमाणात घटले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी कमी मते घेतली, तरी दोन-तीन मतदारसंघांत ती निर्णायक ठरली. 

भाजपला द्यावी लागली कडवी लढत 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यांमुळे वातावरण निर्मिती झाली असली, तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुड या भाजपच्या बालेकिल्ला राखतानाही अक्षरशः धाप लागली. लोकसभा निवडणुकीत भाजपचे या मतदारसंघातील एक लाखाचे मताधिक्‍य जवळपास 26 हजारांपर्यंत घटले. माधुरी मिसाळ यांनी पर्वतीत विजय मिळवित हॅट्रीक केली, तर गेली 25 वर्षे खासदार गिरीश बापट प्रतिनिधीत्व करीत असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक विजयी झाल्या. हे तीन हक्काचे मतदारसंघ वगळता अन्य तीन मतदारसंघ जिंकताना भाजपला आघाडीच्या उमेदवारांशी कडवी लढत द्यावी लागली. 

शिवसेनेला फटका 
भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपामध्ये भाजपने शिवसेनेला पुण्यात एकही जागा दिली नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन आमदार पराभूत झाले असले, तरी चार मतदारसंघांत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. एखादी जागा मिळण्याची शिवसेनेची अपेक्षा होती. सर्वच जागांवर भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागत असल्याची शिवसैनिकांत नाराजी होती. त्याचा फटका काही प्रमाणात युतीच्या उमेदवारांना बसला. पुढील महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीकोनातूनही शिवसेनेला फारसे काही हाती लागले नाही, याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. 

कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी 
कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने पहिल्यापासून थोडा जोर लावला असता, तरी आणखी किमान दोन जागांवर भाजपला हरविण्यात त्यांना यश आले असते. आघाडीचे उमेदवार जवळपास स्वबळावर लढले. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या मोठ्या नेत्यांचे फारसे दौरे झाले नाहीत. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठका, तसेच शरद पवार, अजित पवार यांच्या काही सभा वगळता त्यांच्याकडून पक्षाच्या पातळीवर मोठा प्रचार झाला नाही. कॉंग्रेसचे मोठे नेते आपापल्या मतदारसंघात अडकल्यामुळे, ते पुण्यात फारसे आले नाहीत. अशा स्थितीतही शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांनी भाजपला जोरदार लढत दिली. तेथे भाजपचे उमेदवार सुमारे पाच हजार मतांचे अधिक्‍य मिळवित विजयी झाले. 

भाजपला यश मिळाले, तरी मताधिक्‍य घटले 
चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक यांचे मताधिक्‍य 25 हजार मतांच्या आसपास आहे, तर अन्य मतदारसंघातील मताधिक्‍य तीन ते पाच हजार मतांच्या आसपास आहे. पुण्यातील लढती एवढ्या चुरशीच्या ठरतील, याचा अंदाज निवडणूक प्रचाराच्या वेळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वोलण्यातून जाणवत नव्हता. 

मनसेची वाटचाल 
कोथरूडच्या भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याने, शिंदे यांनी पाऊण लाख मतांचा टप्पा पार पडला. हडपसर मतदारसंघातही मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी 31 हजारांपेक्षा अधिक मते मिळविली. तर, कसबापेठ मतदारसंघात मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी नऊ हजार मतांच्या आसपास मते मिळविली. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या 29 वरून दोनवर आली होती. विधानसभा निवडणुकीचा फायदा मनसेला पुढील महापालिकेच्या निवडणुकीला होईल. 

"वंचित बहुजन'मुळे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अडचणीत 
वडगाव शेरी, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी प्रत्येकी दहा हजार मतांच्या आसपास मते मिळविली. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये तर वंचितच्या उमेदवारासोबतच एमआयएमच्या उमेदवाराने सहा हजार मते, तर बसपच्या उमेदवाराने दोन हजार मते मिळविली. हा सुमारे अठरा हजार मतांचा फटका कॉंग्रेसच्या उमेदवाराला बसला. खडकवासला मतदारसंघातही वंचितच्या उमेदवाराने सहा हजार मते मिळविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com