esakal | चिंता नको, दक्षता मात्र हवी!
sakal

बोलून बातमी शोधा

चिंता नको, दक्षता मात्र हवी!

‘कोरोना’ने जीवनाची शाश्‍वतीच हिरावून घेतली होती. सुरुवातीची ही अनिश्‍चितता आता जवळपास संपुष्टात आली आहे. तथापि, या विषाणूविरोधातील लढाई दीर्घकालीन असल्याने ‘कोरोना’ पश्‍चातची जीवनशैली तूर्त कायम ठेवणे, याला पर्याय नाही.

चिंता नको, दक्षता मात्र हवी!

sakal_logo
By
रमेश डोईफोडे

‘कोरोना’ने जीवनाची शाश्‍वतीच हिरावून घेतली होती. सुरुवातीची ही अनिश्‍चितता आता जवळपास संपुष्टात आली आहे. तथापि, या विषाणूविरोधातील लढाई दीर्घकालीन असल्याने ‘कोरोना’ पश्‍चातची जीवनशैली तूर्त कायम ठेवणे, याला पर्याय नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कोरोना’ची दहशत आता कमी झाली असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. गणेशोत्सवात रस्त्यांवर गर्दी वाढल्याने त्या काळात संसर्ग अधिक फैलावला. दिवाळीतही त्याची पुनरावृत्ती होईल किंवा कसे, याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच, हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे ‘कोरोना’ची दुसरी लाट येईल, असेही भाकीत अनेक तज्ज्ञांनी वर्तवले होते. तथापि, शहरात, राज्यात आणि देशातही हा आजार नियंत्रणात आल्याचे चित्र आज दिसत आहे. गेल्या दहा महिन्यांचा विचार करता, ही मोठा दिलासा देणारी बाब आहे.

तुम्ही पासपोर्ट काढताय? फसव्या संकेतस्थळापासून राहा सावध!

संकटावर नियंत्रण
‘कोरोना’ने जगभरात अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. त्यातही सगळ्यांत जास्त झळ पोचलेल्या देशांत भारताचा समावेश होता. त्यामुळे, जागतिक पातळीवर दुसरी तीव्र लाट येण्याची चर्चा सुरू झाली, तेव्हा अर्थातच आपल्याकडे नेमके काय होईल, याची काळजी सर्वसामान्यांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांनाच वाटू लागली. तथापि, काही देशांतील परिस्थिती अधिक गंभीर होत असताना, भारत आणि अर्जेंटिना हे सर्वाधिक बाधित देश मात्र या संकटातून बचावले आहेत. अगदी पुण्यातील ताजी आकडेवारी पाहिली, तरी पुणेकरांनी या संकटावर यशस्वीरीत्या काबू मिळविल्याचे स्पष्ट होते.

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली

रुग्णसंख्येत घट
‘कोरोना’शी लढताना जिल्ह्यातील साडेआठ हजार रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यात पुण्यातील साडेचार हजार जणांचा समावेश आहे. या आजाराने गेल्या दहा महिन्यांत किती कुटुंबांवर असह्य आघात केला आहे, हे यावरून दिसते. एक वेळ अशी आली होती, की शहरातील कोणत्याही रुग्णालयांत सहजासहजी बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांची मोठी परवड झाली. अनेकांना वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्याने जीवघेण्या विषाणूपुढे हार पत्करावी लागली. ‘कोरोना’ने दगावणाऱ्यांची संख्या प्रतिदिन नव्वदच्याही पुढे गेली होती. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत रांग लागत होती. आता ही भीषण परिस्थिती राहिलेली नाही. शहरात या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची रोजची संख्या दहाच्या आत आली आहे. जेवढे नवीन बाधित रुग्ण आढळत आहेत, त्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सध्या जास्त आहे.

शिक्षकांनंतर आता सर्वांना ड्रेसकोड; वाचा यादीत कोणा-कोणाचा आहे समावेश?

गाफिलपणातून चुका
‘कोरोना’ चाचण्यांची संख्या आता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आजार वेळीच निदर्शनास येत येऊन, तत्काळ उपचार होत आहेत. रुग्णालयात जागा मिळेल की नाही, हा प्रश्‍न राहिलेला नाही. मुख्य म्हणजे चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आलेल्यांपैकी बव्हंशी रुग्ण घरीच विलगीकरणात राहून खडखडीत बरे होत आहेत. हा आजार अचानक उद्‌भवला, तेव्हा सर्वच जण गाफील होते. ही अभूतपूर्व परिस्थिती कशी हाताळायची, याचा पूर्वानुभव नसल्याने वैयक्तिक आणि प्रशासकीय पातळीवर प्रारंभी अनेक चुका झाल्या. ‘मास्क’, शारीरिक अंतर, स्वच्छता, सॅनिटायझर यांविषयी जागरूकता निर्माण होण्यासही विलंब लागला. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे शहर व जिल्ह्यात साडेआठ हजार जणांचा ओढवलेला मृत्यू!

परिपूर्ण सज्जता
या महासंकटाने सर्वांनाच मोठा धडा दिला आहे. त्यामुळे यापुढे खरोखरच दुसरी लाट आली, तरी तिचा सामना करण्याची जय्यत तयारी झालेली आहे. महापालिकेच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले ‘जंबो हॉस्पिटल’, शहरांत ठिकठिकाणी उभारण्यात आलेली ‘कोविड केअर सेंटर’, विलगीकरण कक्ष, रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांचे लोकप्रतिनिधी, विविध संस्था-संघटनांच्या वतीने झालेले मोफत वाटप, चाचण्यांसाठी किटची मुबलक उपलब्धता, लोकांतील वाढती जागृती... ही सज्जता ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत नक्कीच निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, ‘कोरोना’ प्रतिबंधक लशी लवकरच उपलब्ध होतील, अशी सुचिन्हे आहेत.

Video : पुण्यातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच; महापौरांचा मोठा निर्णय 

मानसिक स्वास्थ्यावर परिणाम
या आजारामुळे आता जणू जगबुडी जवळ आली आहे, या चिंतेने ग्रासलेल्यांसह सर्वांनाच या सुधारलेल्या परिस्थितीमुळे हायसे वाटत असेल. ‘कोरोना’ने शारीरिक हानीबरोबरच लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम केला आहे. अनेकांनी आपल्या चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला म्हणून हाय खाल्ली. केवळ या तणावामुळे कित्येकांची प्रकृती अधिक बिघडली. हा ताण असह्य झाल्याने काहींनी आजाराचा सामना न करता आत्महत्येचा मार्ग पत्करला. प्रसार माध्यमे, समाज माध्यमे यांवर नकारात्मक बातम्यांचा भडिमार सातत्याने होत राहिल्याने निराशेचे मळभ सगळीकडे दाटून आले. त्यातून बाहेर पडणे, हे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्याइतकेच महत्त्वाचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवीन जीवनशैली अपरिहार्य
मधुमेहासारखा आजार पूर्ण बरा कधी होत नाही; पण औषधे, योग्य आहार, व्यायाम, तणावरहित दिनक्रम यांआधारे त्यावर नियंत्रण ठेवता येते. ‘कोरोना’चा सामना करतानाही सध्या तरी आपणास हीच पथ्ये पाळावी लागणार आहेत. या आजाराची तीव्रता कदाचित कमी होत जाईल; परंतु तो जगातून कधी संपुष्टात घेईल, याचे उत्तर कोणाकडेही नाही. लस लगेच उपलब्ध झाली, तरी तो रामबाण उपाय नाही. तिचा प्रभाव किती काळ राहील, हे प्रत्यक्ष अनुभवानंतरच स्पष्ट होणार आहे. आणि एकदा लस घेतली की कायमस्वरूपी शंभर टक्के सुरक्षितता मिळेल, अशी हमी संबंधित कंपन्यांनीही दिलेली नाही. त्यामुळे ‘कोरोना’ने जी नवीन जीवनशैली स्वीकारण्यास आपणास भाग पाडले आहे, ती यापुढेही निमूटपणे अमलात आणणे याला पर्याय नाही. या पार्श्‍वभूमीवर, ‘चिंता नको; पण दक्षता हवी’ हे सूत्र केव्हाही उपकारच ठरेल!

Edited By - Prashant Patil

loading image