बातमी महत्त्वाची : स्वत: सिलेंडर आणताय, तर रिबेट नक्की मागा!

Gas_Cylinder
Gas_Cylinder

पुणे : नागरिकांनो, तुम्ही गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाऊन सिलेंडर घेणार असाल, तर तुम्हाला एजन्सी धारकाने 26 रुपये 50 पैसे एवढी सूट (रिबेट) दिली पाहिजे. त्यांच्याकडून सिलेंडर घेताना त्यांना या नियमाची आठवण करून द्या आणि हे रिबेट नक्की त्यांच्याकडे मागा.

कोरोनामुळे गॅस सिलेंडर वितरणावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी घरपोच सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहक एजन्सीच्या कार्यालयासमोर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होत प्रकार पाहायला मिळत आहे. गॅस एजन्सीचे चालक हे घरपोच सेवा देणारे कर्मचारी कोणाच्या कोणाच्या कोणाच्या कोरोना आजाराच्या भीतीमुळे गैरहजर असल्याचे सांगत आहेत. परिणामी गॅस सिलेंडर घरपोच मिळेल की नाही याची धास्ती घेऊन नागरिक स्वतः सिलेंडर घेऊन एजन्सीकडे जात आहेत.

अनेकजण एजन्सीच्या गोडावूनमधून दुचाकी-चारचाकी गाड्यांमधून सिलेंडर आणताना दिसत आहेत. भारत पेट्रोलियम चे प्रादेशिक अधिकारी सौरभ मुखर्जी यांनी सिलेंडर हा घरपोच देण्याची जबाबदारी एजन्सीची आहे, असे स्पष्ट केले आहे. तरीही आज बिबवेवाडी कात्रज आणि शहरातील अन्य भागात सिलेंडर घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी एजन्सीच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती.

गॅस कंपन्यांच्या नियमानुसार नागरिक स्वतः वापरलेला सिलेंडर एजन्सीच्या गोडाउनमध्ये जाऊन जाणार असेल, तर त्या नागरिकाला प्रति सिलेंडर 26 रुपये 50 पैसे सूट देणे एजन्सी धारकाला बंधनकारक आहे. मात्र, ग्राहकाने एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाऊन हा सिलेंडर घेतला पाहिजे, असे बंधन आहे.

... तर दहा रुपये सूट द्या!

गॅस वितरण संघटनेचे उपाध्यक्ष श्री खंडाळकर म्हणाले, "सध्याच्या स्थितीत घरपोच सेवा देणारे कर्मचारी संख्येने कमी झाले आहेत. तरीही घरपोच सेवा देण्याची आम्ही काळजी घेत आहोत. ग्राहक गोडावूनपर्यंत आल्यास 26 रुपये 50 पैसे रिबेट द्यावे लागते, पण त्यांना गोडाऊनपर्यंत येऊ न देता एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी गॅस सिलेंडर बदलून दिला जात आहे. आम्ही याठिकाणी गाडी पाठवत असल्याने त्याचा खर्च येतो, पण ग्राहकाला आम्ही घरपोच सेवा सध्या पुरेशा प्रमाणात देऊ शकत नसल्याने गॅस एजन्सी धारकांनी मोकळा सिलेंडर बदलण्यासाठी घेऊन येणाऱ्या ग्राहकांना किमान दहा रुपये सूट द्यायला हवी."

अधिक माहितीसाठी संपर्क : 
गॅस वा जीवनावश्यक वस्तू विषयक तक्रारीसाठी जिल्हा प्रशासनाचे क्रमांक :
9420756760 (अमर रसाळ),
9823149176 (दीपक वजाळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com