
पुणे - कोरोनाच्या संकटामुळे अवघा देश लॉकडाऊन झालेला असताना, शहरातील 254 युवक भटक्या कुत्र्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे आले आहेत. अगदी पदरमोड करून अन् परिचितांकडून 50 रुपयांची वर्गणी काढून हिंजवडीपासून लोणी काळभोरपर्यंतच्या कुत्र्यांसाठी हे युवक रस्त्यावर उतरले आहेत.
लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर सध्या सामसूम आहे. परिणामी भटक्या कुत्र्यांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तर, पिशवी हातात दिसलेल्या व्यक्तीवर ते हल्लाही करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन "लव्ह केअर' ग्रूपचे पियूष शहा आणि त्यांच्या मित्र परिवाराने पुढाकार घेतला आहे.
पियूश सॉफ्टवेअर डेव्हलपर असून एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. त्याने व्हॉटसअप ग्रूप तयार केला आहे. त्यात श्वानांसाठी काम करणारे 254 जण आहेत. शनिवारपासून त्यांनी या उपक्रमाला सुरवात केली आहे. परिचितांकडून किमान 50 रुपये वर्गणी त्यांनी मागितली अन् गुगल पे, फोन पे आणि पेटीएमद्वारे त्यांनी स्वीकारली. दोन दिवसांत त्यांना 9 हजार रुपये मिळाले. त्यानंतर सदस्यांनी आपआपसात वर्गणी काढून सुमारे 20 हजार रुपये उभे केले. त्यातून त्यांनी डॉग फूड विकत घेतले. प्रत्येक कुत्र्याला 100 ग्रॅम फूड ते देतात. त्यासाठी ग्रूपचे सदस्य दुचाकीवर बादली घेऊन फिरत आहेत. महापालिकेने या ग्रूपच्या सदस्यांना 50 पास दिले आहेत तर, पोलिसही सहकार्य करीत आहेत.
या ग्रूपने सदस्य राहतात, त्यानुसार भटक्या कुत्र्यांची जबाबदारी घेतली आहे. उदाः वंदना ठक्कर या वारजे भागात दररोज सुमारे 300 किलो डॉग फूडचे वाटप करतात तर, अभय मंगूल, सिद्धार्थ बाफना हे स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या कुत्र्यांसाठी दररोज 200 किलोचे डॉग फूड वाटतात. ज्या ठिकाणी डॉग फूड मिळत नाही तेथे भातात अंडी टाकून ते कुत्र्यांना देत आहेत. त्यासाठीची तयारी ते घरीच करतात, असे पियूषने सांगितले. हिंजवडीमध्येही क्लबचे सदस्य कार्यरत आहेत. दिवसातून दोन वेळा कुत्र्यांना अन्न दिले जाते, असेही त्याने सांगितले. या ग्रूपमध्ये श्नानप्रेमी आबालवृद्धांचा सहभाग आहे.
एक पोळी कुत्र्यांसाठी
ज्या भागात दाट लोकवस्ती आहे, तेथे कुत्र्यांचे फारसे हाल होत नाहीत. परंतु, फक्त इमारती आहेत, त्या भागात कुत्र्यांचे हाल होतात. अशा भागातील सदस्यांनी व्हॉटसअपवरून नागरिकांना, "तुमच्या घरातून एक पोळी, कुत्र्यांसाठी ठेवा. वाटल्यास आमच्या क्लबचे सदस्य त्या पोळ्या गोळा करतील,' असे आवाहन केले आहे. अन त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिस्किटांमुळे कुत्र्यांच्या आरोग्याला त्रास होतो, हे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे बिस्किटे आम्ही टाळतो, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.