अवैध प्रवासी वाहतूक बंद करा- सहाआसनी रिक्षा संघटनेची मागणी

संदीप जगदाळे
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पोलिस निरिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्याकडे मागणी

हडपसर वाहतूक विभाग फक्त परवाना धारक सहाआसनी रिक्षांवर कारवाई करून आमच्या संघटनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व अवैध प्रवासी वाहतूक बंद करून सर्व सामान्य कष्टकरी परवानाधारक सहाआसनी रिक्षा चालकांना न्याय मिळवून द्यावा.

हडपसर : परिसरात परवाना नसलेल्या वाहनातून हडपसर वाहतूक विभागाच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक राजरोस पणे सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जीप, टाटा मॅजीक, महिंद्रा मॅक्स, स्क्रॅप पॅगो (अॅपे) रिक्षा यांचा समावेश आहे. ही अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्यासाठी श्री चिंतामणी सहा आसणी रिक्षा संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा हडपसर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षकांना समक्ष भेटून विनंती केली. परतु त्याची ते दखल घेत नाहीत. त्यामुळे संघटनेने पोलिस आयुक्त व वाहतूक विभागाच्या उपआयुक्तांकडे लेखी तक्रार केली. याचा राग मनात धरून हडपसर वाहतूक विभागाकडून परवाना धारक सहाआसनी ऱिक्षावरच सुड बुध्दीने कारवाई सुरू केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष मोरेश्र्वर वैराट म्हणाले, परवाना धारक सहाआसनी रिक्षामध्ये शर्तीपेक्षा एक प्रवासी असेल तर लगेच त्या सहाआसनी रिक्षाचा पाठलाग करून वाहतूक पोलिस पकडतात. त्यामधील प्रवासी उतरून इतर अवैध वाहनांत पाठवून परवाना धारक सहाआसनी रिक्षांवर कारवाई केली जाते. मात्र तशा प्रकारची कारवाई परवाना नसलेल्या वाहनांवर अजिबात केली जात नाही. वाहतूक विभागाकडून दरमहा लाखो रुपयांचा हप्ता अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून वसूल केला जातो. त्यामुळे परवाना नसलेली वाहने वाहतूक पोलिसांसमोर राजसोस पणे अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता पोलिस कर्मचारी सांगतात की, त्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत.

हडपसर वाहतूक विभाग फक्त परवाना धारक सहाआसनी रिक्षांवर कारवाई करून आमच्या संघटनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व अवैध प्रवासी वाहतूक बंद करून सर्व सामान्य कष्टकरी परवानाधारक सहाआसनी रिक्षा चालकांना न्याय मिळवून द्यावा, याबाबतचे लेखी निवेदन मुख्यमंत्री, प्रधान सचिव, अप्पर पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त यांना दिले आहे. कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

याबाबत हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर म्हणाले, आम्ही नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांवर नियमितपणे कारवाई करतो. कारवाईत कोणताही दुजाभाव केला जात नाही. परवानाधारक सहाआसनी रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतील, चालकाकडे गणवेश नसेल, बॅच नसेल तर आम्ही कारवाई करतो. त्यामुळे श्री चिंतामणी सहा आसणी रिक्षा संघटनेने केलेल्या आरोपाबाबत अजिबात तथ्य नाही. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news hadapsar illegal transport six seater rickshaw