पत्रकारांनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावी: सुब्रह्मण्यम स्वामी

स्वप्निल जोगी
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे: 'सर्वसामान्य लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे कुठल्याही तत्वनिष्ठ पत्रकाराचे कर्तव्यच असते,' असे वाक्य बोलून भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पत्रकारांच्या कर्तव्याची जाणीव पत्रकारांना करून दिली. मात्र, याचवेळी 'पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांवर सरकार काय उपाययोजना करू शकेल?' या प्रश्नाचे 'पत्रकारांना सुरक्षा पुरवणे हे काम सरकारचे नाही. ही व्यवस्था पत्रकारांनी आपापल्या पातळीवर करून घ्यावी' असे उत्तर देत स्वामींनी वेळ मारून नेली.

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सोमवारी स्वामी बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते भाऊ तोरसेकर, पराग पोतदार, राजेंद्र सरग आणि देविदास देशपांडे यांना विविध विभागांतील 'देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आले. मनोहर कुलकर्णी, डॉ. शरद कुंटे आदी उपस्थित होते.

स्वामी म्हणाले, "पत्रकारिता ही चौथा स्तंभ म्हणून कुठल्याही लोकशाही राष्ट्रासाठी आवश्यक आहेच. मात्र, प्रत्येक दिल्या जाणाऱ्या माहितीत सत्य किती आहे, हेही वेळोवेळी तपासले गेले पाहिजे. असत्य आणि खोटे लोकांपुढे छापून येऊ नये, ही पत्रकारांची जबाबदारी असली पाहिजे. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरीही देशाच्या अखंडते विरुद्ध बोलणे, हे तर संविधानात सुद्धा मान्य नाही हे आपण समजून घ्यायला हवे."

लोकांना घाबरवून लोकशाही कशी टिकेल ?
लोकांना घाबरवून लोकशाही टिकू शकत नाही, असे स्वामी यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले. याच वेळी त्यांना देशातील वाढत्या झुंडशाही विषयी आणि स्वयंघोषित गोरक्षकांविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी पुन्हा एकदा 'ते गोरक्षक आमचे नाहीत' हे उत्तर दिले. मात्र, वाढत्या झुंडशाहीवर सरकार काय करेल, याचे उत्तर त्यांनी दिलेच नाही.

पत्रकारितेत यायचंय ? मग हे हवंच !
पत्रकारिता हा एक स्वतंत्र कौशल्यधिष्ठित व्यवसाय म्हणून येत्या काळात पुढे यावा. इतर क्षेत्रांत असते त्याप्रमाणे पत्रकारितेत सुद्धा पत्रकारिता न शिकलेल्याना सरसकट नोकऱ्या दिल्या जाऊ नयेत. असे केल्यासच जबाबदार पत्रकारिता पुढे येईल. वाट्टेल ते छापणे आणि वाट्टेल ते दाखवणे हे त्यामुळे थांबेल. निर्भयता आणि नियमन एकत्र असणे गरजेचे आहे, असे स्वामी म्हणाले.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news journalist Security and subramanian swamy