esakal | खानवडीतील मुलींची शाळा कागदावरच
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma-Phule

खानवडीतील मुलींची शाळा कागदावरच

sakal_logo
By
गजेंद्र बडे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे गाव असलेल्या खानवडी (ता. पुरंदर) येथील मुलींची निवासी शाळा मागील सुमारे वर्षभरापासून जागेअभावी कागदावरच राहिली आहे. या शाळेसाठी खानवडी येथील गायरानातील तीन एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करणारा प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या शाळेच्या जागेबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला आहे.

हेही वाचा: पुण्यात संचारबंदी नाही, जमावबंदी लागू; वाचा काय आहे आदेश?

महात्‍मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने १८४८ मध्ये मुलींसाठी देशातील पहिली शाळा पुण्यात सुरू केली. यामुळे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात येता आले. फुले दांपत्याच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने महात्मा फुले यांच्या खानवडीत मुलींसाठी निवासी मॉडेल स्कूल उभारण्याचा संकल्प पुणे जिल्हा परिषदेने एक वर्षभरापूर्वीच केला आहे. अशा पद्धतीची ही पुणे जिल्ह्यातील एकमेव शाळा असणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेचेच जिल्हास्तरीय निवासी शाळेत रूपांतर केले जाणार आहे.

हेही वाचा: Pune : किरीट सोमय्यांनी घेतली जिल्हा बॅंकेकडून माहिती

केंद्रीय नवोदय विद्यालय, केंद्रीय शाळा, सातारा येथील सैनिकी शाळा आणि वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील आंतरराष्ट्रीय शाळेच्या धर्तीवर या निवासी शाळेची उभारणी केली जाणार आहे. याबाबतची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आक्टोबर २०२० मध्ये केली होती. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेशही त्यांनी दिला होता. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका पथकाने या गावाला भेट देऊन संभाव्य जागेची पाहणी केली होती.

हेही वाचा: उरुळी कांचन : ओढ्यांमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा महापूर

राज्यात सद्यःस्थितीत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाच्या निवासी शाळा कार्यरत आहेत. यापैकी काही शाळा मुलींसाठीच्या आहेत. मात्र या शाळांची अवस्था अन्य सरकारी शाळांप्रमाणेच आहे. त्यामुळे या शाळांमधून फारसे दर्जेदार शिक्षण मिळत नाही. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचीही काहीशी अशीच स्थिती झाल्याचा संदेश समाजात गेला आहे. हा संदेश खोडून टाकण्याच्या उद्देशाने तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील काही जिल्हा परिषद शाळांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील ८१ शाळांची इंटरनॅशनल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीचा (ता. शिरूर) समावेश आहे.

हेही वाचा: "मंडळांनो, यंदा गणेशोत्सवात गर्दी टाळा"

निवासी शाळेतील संभाव्य सुविधा

  • मुलींच्या निवासासाठी सुसज्ज वसतिगृह

  • जेवणाच्या सुविधेसाठी प्रशस्त भोजनगृह

  • शाळेसाठी अत्याधुनिक पद्धतीची भव्य इमारत

  • अध्ययनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

शाळेच्या जागेबाबतची माहिती

  • गट नंबर ४३ मध्ये २८ हेक्टर ७८ आर गायरान

  • या गायरानातील तीन एकर शाळेसाठी मागणी

  • जागा मागणीबाबतचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मंजूर

  • मागणी प्रस्तावास पुरंदर बिडीओंची शिफारस

  • जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

हेही वाचा: इंदापूर : 'सकाळ' माध्यम समूह हा समाजमनाचा आरसा - अंकिता शहा

"जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, निराधार आणि अत्याचारग्रस्त मुलींना या शाळेत प्राधान्याने प्रवेश दिले जाणार आहेत. लोकसहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सी.एस. आर. फंड) माध्यमातून या मॉडेल स्कूलची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. गायरान जागा मागणीबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनेही एकमताने ठराव मंजूर केला आहे. या जागेची सध्या मोजणी प्रलंबित आहे. शाळेच्या जागेबाबतचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल."

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

loading image
go to top