नफावसुलीमुळे निर्देशांकांत अल्प घसरण

नफावसुलीमुळे निर्देशांकांत अल्प घसरण
Published on

नफावसुलीमुळे निर्देशांकांत अल्प घसरण

‘सेन्सेक्स’ ११४ अंशांनी, तर ‘निफ्टी’ ३१ अंशांनी खाली


मुंबई, ता. १९: जागतिक अस्थिरता संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जागतिक शेअर बाजारातही आज प्रतिकूल वातावरण होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण दिसून आली. शेअर बाजारांची सुरुवात किंचित नफा दाखवत झाली. मात्र, सकारात्मक संकेत नसल्याने हळूहळू वरच्या पातळीवर नफावसुली झाली आणि निर्देशांक घसरत गेले. दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ११४.१९ अंशांनी घसरून ७५,२००.८५ अंशांवर, तर ‘निफ्टी’ ३१.९५ अंशांनी घसरून २३,६१८ अंशांवर स्थिरावला.

आज आयटी शेअरमध्ये चांगली खरेदी झाली. आयटी शेअर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढले. सरकारी बँकांचे शेअरही आज वाढले. पण दुसरीकडे खासगी बँकांचे शेअर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने निर्देशांकांना फार नफा दाखवता आला नाही. आज एकूण सर्व शेअरपैकी २०४७ शेअरचे भाव वाढले, तर १५२६ शेअरचे भाव कमी झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकदेखील एक टक्क्याच्या आसपास वाढले. यावर्षी जगात पावणेतीन लाख टन साखर टंचाई भासणार असल्याचे इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनने जाहीर केल्यामुळे भारतात साखरेचे भाव वाढून साखरनिर्मिती कंपन्यांना त्याचा फायदा होईल, असे सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले.
‘सेन्सेक्स’मध्ये आज इन्फोसिस पावणे पाच टक्के, तर एचसीएल टेक आणि टेक महिंद्र अडीच टक्के वाढले. टीसीएसदेखील दोन टक्के वाढला. त्याखेरीज एटर्नल अडीच टक्के वाढला आणि स्टेट बँक, ट्रेंट, पॉवरग्रिड, एनटीपीसी या शेअरचे भावही वाढले. दुसरीकडे कोटक बँक दोन टक्के घसरला, टायटन आणि अल्ट्राटेक सिमेंट दीड टक्के घसरले. अदानी पोर्ट, एअरटेल, सन फार्मा, इंडिगो, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, बीईएल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या शेअरचे भावही घसरले. 

कोट .......
परदेशी वित्त संस्था खरेदी करीत असल्या, तरी रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाचे वाढते भाव यामुळे शेअर बाजारात अजूनही चढ-उतार येतील. ‘निफ्टी आयटी’ दोन दिवसात पावणे सहा टक्के वाढला असून, निकाल चांगले आल्यामुळे औषध निर्मिती कंपन्यांवरही गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.
-सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com