सहली बंद म्हणजे बंद; टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना पुणे पोलिसांचे आदेश

Corona_travel_abroad
Corona_travel_abroad

पुणे : कोरोना विषाणूचा प्रचार व प्रसार रोकण्यासाठी पुणे पोलिसांकडून महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना समुहाच्या स्वरुपात देशांतर्गत व परदेशातील सहली काढण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. अपवादात्मक परिस्थितीसाठी पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

याबरोबरच विमानातून आलेल्या व शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊसमध्ये उतरलेल्या परदेशी व भारतीय प्रवाशांची माहिती पोलिस, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयास कळविणे बंधनकारक केले असून याबाबतचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे दिला आहे. 

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स कंपनी, हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस आहेत. तेथे विमानाद्वारे परदेशातुन आलेले परदेशी व भारतीय प्रवासी वास्तव्य करीत आहेत. त्यामध्ये कोरोनाबाधीत देशामधून प्रवास करून आलेल्या नागरीकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी संबंधीत प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक आहे. कोरोनाबाधीत प्रवाशांना कोरोनासदृश्‍य लक्षणे आढळल्यास प्रवाशांना औषधोपचारासाठी विलगीकरण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस यामध्ये परदेश प्रवास करून आलेल्या व वास्तव्य करणाऱ्या नागरीकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. 

केंद्र सरकारने दिलेल्या सुचनांनुसार, नागरिकांनी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी देशांतर्गत व परदेशी सहल आयोजित करणाऱ्या विविध टुरीस्ट व ट्रॅव्हल्स कंपनी यांच्यावर बंधन असणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र पोलिस अधिनियम 151 बरे कलम 68 अन्वये, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेश दिले आहे.

त्यानुसार, पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स कंपनी, हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस यांनी रजिस्टर बनवून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरुन विमान प्रवास करून आलेल्या, शहरात वास्तव्यास असलेल्या परदेशी व भारतीय प्रवाशांची सविस्तर नोंदणी करावी लागणार आहे. त्याबाबतची माहिती संबंधीत पोलिस ठाणे, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांना कळवावी. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड विधान संहिता कलम 188 अन्वये शिक्षा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

याबरोबरच टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी व्यापार, औद्योगिक, सुट्टी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी समुहाच्या स्वरुपात देशांतर्गत व परदेशी सहल आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहल आयोजित करायची असल्यास त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी, असे डॉ.शिसवे यांनी दिलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे. 

''कोरोनाचा संसर्ग वाढू नये, त्यावर नियंत्रण यावे यासाठी टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स चालकांना देशांतर्गत व परदेश सहलींना मनाई केली आहे. तसेच विमानाद्वारे परदेशातुन आलेल्या प्रवासी वास्तव्यास असलेल्या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस येथून त्यांची नोंदणी करून त्यांनी ती माहिती प्रशासनाला द्यावी. तसेच परिस्थितीनुसार तज्ज्ञांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल.''
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त 

''प्रशासनाच्या निर्णयामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र या परिस्थितीमध्ये आमच्या नुकसानीपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे. प्रशासनास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. यापुढेही कोणतीही मदत करू. प्रशासनानेही त्यांच्यात समन्वय ठेवून आमच्या अडचणी समजून घ्याव्यात. त्यामुळे आमचे व ग्राहकांचे नुकसान होणार नाही.''
- निलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com