

वेण्णा नदीचे अस्तित्व धोक्यात
महाबळेश्वरमध्ये पात्रातच टाकली शेकडो टन माती; प्रशासनाचे दुर्लक्ष
महाबळेश्वर, ता. ९ ः महाबळेश्वरची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वेण्णा नदीचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. वेण्णा लेकला वळसा घालून जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील नवीन पुलाच्या कामासाठी केलेले उत्खनन आणि त्यानंतर नदीपात्रातच टाकलेली शेकडो टन मातीमुळे नदीचा श्वास गुदमरला आहे. पावसाळा उंबरठ्यावर असतानाही माती उचलण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे वेण्णा नदीचे उगम पात्रच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली असून, परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.
वेण्णा धरणाच्या बंधाऱ्याजवळ बायपास रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी काढलेली माती पावसाळ्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल, असे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, पावसाळा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक असतानाही अद्याप माती उपसण्याच्या कामाला साधी सुरुवातही झालेली नाही. माती नदीपात्रातच पडून राहिल्याने पावसाच्या पहिल्याच सरींसोबत ती वाहत जाऊन नदीचे पात्र बुजण्याची दाट शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने नदीच्या उगमस्थानावर ‘पूर नियंत्रण रेषा’ निश्चित करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी हे काम रोखून धरले आहे. नदीचे पात्रच शिल्लक राहिले नाही, तर पूररेषा कोठून आखणार? असा सवाल शेतकरी करीत आहेत. नदीपात्रातील माती काढून नदीचे संरक्षण करा आणि मगच तांत्रिक कामांकडे वळा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीपात्रातील शेकडो टन माती आधुनिक यंत्रसामग्री वापरून उचलण्यात यावी. पुलाच्या कामामुळे अडथळा ठरलेले मातीचे ढिगारे हटवून नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा. प्रशासनाने पुढील आठवड्यात कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वेण्णा लेक ते लिंगमळा या दरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटर परिसरातील शेती पूर्णपणे वेण्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. नदीपात्र मातीने भरले, तर नदीचे पाणी नैसर्गिक प्रवाहातून न जाता आजूबाजूच्या शेतात शिरणार आहे. यामुळे केवळ पिकांचेच नुकसान होणार नाही, तर शेतजमीनही नापीक होण्याचा धोका आहे.
कोट :
नदी वाचली, तरच शेती वाचणार आणि शेती वाचली, तरच शेतकरी जगणार आहे. प्रशासनाने त्वरित ही माती उचलली नाही, तर आम्हाला आमच्या हक्कासाठी आणि नदीच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.
- शरद बावळेकर, शेतकरी
26B05155, 26B05156
महाबळेश्वर ः वेण्णा नदीपात्रात टाकलेली माती. (अभिजित खुरासणे : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.